प्रधानमंत्री नळावरच्या भांडखोर बाईसारखे बोलतात तेव्हा !

36

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

परवा देशाचे प्रधानमंत्री नरेद्र मोदी यांनी संसदेत बोलताना, “गांधी घराणे नेहरूंचे का नाव लावत नाही. नेहरू महान होते तर त्यांचे नाव का पुढे चालवत नाहीत ?” असे सवाल करत गांधी घराण्याची व राहूल गांधींची खिल्ली उडवली. त्यांचे हे वक्तव्य हास्यास्पद व बावळटपणाचे होते. हे वक्तव्य करत असताना त्यांच्या चेह-यावरचे हावभाव अतिशय किळसवाणे होते. अशा उकापाकळ्यात त्यांना असलेला रस पाहून अस्वस्थ झालं. देशाचा प्रधानमंत्री अशा पध्दतीचे बोलू शकतो, तो इतक्या खालच्या स्तरावरती जाऊ शकतो ? हेच त्रासदायक आहे. देशाच्या प्रधानमंत्र्याने गंभीरपणे बोलावे असे देशात अनेक प्रश्न असताना हे महाशय, “तुम्ही गांधी ऐवजी नेहरू हे नाव का लावत नाही ? असं जोरजोरात विचारतात आणि त्यांच्या मागे बसलेली मुर्खांची, लाचारांची व चमच्यांची फौज दात काढते, बाकं वाजवते याचे दु:ख होते. यापुर्वी अटलजी संसदेत बोलायचे तेव्हा अख्खी संसद कान देवून ऐकायची. विरोधकही दाद द्यायचे.

अवघा देश कौतुकाने ऐकायचा. अटलजींनी इंदीरां गांधींचा दुर्गा म्हणून उल्लेख केला. नेहरूंच्या, इदीरां गांधी व राजीव गांधींच्या कामाचा संसदेत गौरव केला. त्यांनी कधीच, तुम्ही नव-याचे आडनाव का लावता, बापाचे का लावत नाही ? असा सवाल केला नाही. ते कधी व्यक्तीगत प्रश्न, कौटूबिक विषय संसदेत घेवून आले नाहीत.

राहूल गांधी यांनी संसदेत बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गौतम अदानीच्या व्यक्तीगत संबंधाचा उल्लेख केला होता. अदानी कमी काळात कसे मोठे झाले ? त्यांनी काय केले ? त्यांची इतक्या झपाट्याने प्रगती कशी झाली ? तसेच अदानी आणि हिडेनबर्गचा रिपोर्ट यावर राहूल गांधी बोलले होते. त्यांनी प्रधानमंत्र्यांना आरोपीच्या पिंज-यात उभे केले होते. राहूल गांधींच्या मुद्यांना प्रधानमंत्री काय उत्तर देतात ? याकडे देशाचे लक्ष लागले होते. ते काय बोलणार ? काय सांगणार ? अदानी व त्यांच्या संबंधाबाबत काय खुलासा करणार ? अदानीबाबत काय घोषणा करणार ? याची उत्सुकता होती. अख्ख्या संसदेचे व देशाचे लक्ष त्यांच्याकडेच होते. हे महाशय बोलायला उभे राहिले पण बोलताना नळावर पाण्यासाठी भांडता भांडता व्यक्तीगत उका-पाकाळ्या काढणा-या भांडकुदळ बाईसारखे भासले. नेहरूंच्या पिढीने काय आडनाव लावावे ? कुणाचे नाव चालवावे ? हा त्यांचा व्यक्तीगत विषय आहे.

मुळातच भारतीय विवाह पध्दतीनुसार, हिंदू धर्म पध्दतीनुसार नांंदायला गेलेली मुलगी बापाचे नाहीतर नव-याचे नाव लावते. तिला झालेल्या मुलांनाही तेच नाव लावले जाते. मोदींच्या आईनेही बापाचे नव्हेतर नव-याचेच नाव लावलेले आहे. मोदीनींही आईच्या वडीलांचे किंवा मामाचे नाव लावलेले नाही. त्यांनी त्यांच्याच बापाचे नाव व आडनाव लावले आहे. त्याच पध्दतीने इंदीरा गांधीनीही नव-याचे नाव व नव-याचेच गांधी हे आडनाव पुढे लावले. तेच नाव सोनिया, राहूल व प्रियांका यांनीही पुढे लावले आहे. यात विशेष असे काय नाही. त्यांनी गांधी नाव बापाचे आहे म्हणूनच लावलेले आहे. त्यांनी नेहरू हे नाव टाळलय असेही नाही आणि ते नाव लावायचा संबंधही येत नाही. पण नसलेल्या मुद्द्याला मुद्दा करत मुळ विषयाला बगल देण्याची संघी चलाखी मोदींच्या अंगात खोलवर मुरलेली आहे. त्याचा प्रत्यय त्या दिवशी आलाच. राहूल गांधींना किंवा गांधी घराण्याला प्रश्न विचारणा-या मोदींनी काही प्रश्न स्वत:लाही विचारावेत. त्याची उत्तर देशाला द्यावीत. स्वत:चे लग्न झालेले असताना ते देशापासून लपवून का ठेवले ? निवडणूक आयोगाच्या अर्जात खोटी माहिती का दिली ? सन्यस्त जीवनाचे ढोंग का रचले ? या प्रश्नांची उत्तर मोदींनी देशाला जरूर द्यावीत. राजीव गांधींनी इटलीच्या पोरीशी लग्न केले. ती परदेशी पोरगी बायको केली, ती घरी आणली. तिला गांधी घराण्याने सुन म्हणून सन्मानाने वागवले. त्यांनी तीला लपवली नाही, दडवून ठेवली नाही. उजळ माथ्याने सुन म्हणून स्विकारली. छाती पिटून, छाती बडवून संसदेत व्यक्तीगत उका-पाकाळ्या करणा-या मोदींनी स्वत:ची पत्नी का लपवली ? याचे उत्तर देशाला द्यावे. ते देताना छाती नाही बडवली तरी चालेल.

राहिला विषय नेहरू मोठे आहेत की छोटे आहेत ? याचा. पंडीत नेहरू आज हयात नाहीत. त्यांच्यावर सतत गरळ ओकत बसण्यापेक्षा नेहरूंनी प्रधानमंत्री म्हणून जेवढे काम केले तेवढे तरी मोदींनी करावे. वारसा सांगायचा विषय असेल तर मोदींनीही गोळवळकर, हेडगेवारांचा, सावरकर आणि नथूराम गोडसेचा सांगावा. मोदी प्रधानमंत्री म्हणून ज्या ज्या वेळी जगात जातात त्या त्या वेेळी जगाच्या मंचावर कधीही गोळवळकर, हेडगेवार, सावरकर किंवा नथूराम गोडसेचे नाव घेत नाहीत. तिथे गेल्यावर ते नेहमी गौतम बुध्द, महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचेच नाव घेतात. चुकूनसुध्दा त्यांनी गोळवळकर आणि हेडगेवारांचे नाव घेतलेले नाही. देशात त्यांचा पक्ष व त्यांचे लोक हेडगेवार, गोळवळकर व नथूराम यांचा सतत उदोउदो करत असतात. मोदींचे हेडगेवार, गोळवळकर खरच महान आहेत तर जगाच्या विचारपीठावर त्यांची नावे मोदी का सांगत नाहीत, का घेत नाहीत ? त्यांनीही त्यांचा हा वारसा जगाला ओरडून सांगावा ना. पण मोदी ते सांगताना दिसत नाहीत. स्वत: दुटप्पी वागताना दिसतात पण जे वागत नाहीत त्यांना मात्र ते प्रश्न करतात.

देशाच्या प्रधानमंत्र्याने संसदेत काय बोलावं ? कसं बोलावं ? याचा आजवरचा एक मापदंड आहे. आजवर कुणीच त्याला धक्का लावलेला नाही. पण विद्यमान प्रधानमंत्र्यानी ही मर्यादा व परंपरा निकालात काढली. छाती पिटून पिटून या मर्यादेला फाट्यावर मारले. नळावरच्या सुमार भांडकुदळ बाईसारखे तद्दन फालतू विषय बोलत देशासमोरचे गंभीर प्रश्न व विषय निकालात काढले. त्यावर काहीच बोलले नाहीत. कुठल्यातरी भंणगाने असे वागले असते तर काही वाटले नसते पण देशाचा प्रधानमंत्री असे वागतो व बोलतो हे दु:खद आहे. मोदींनी देशाला नोटबंदीचा हिशोब द्यावा. त्यावर बोलावे. ती फसली की यशस्वी झाली ? ते सांगावे. २०१४ च्या प्रचारात ज्या महागाईवर भर देत प्रचार केला ती महागाई आटोक्यात आणली, कमी केली ? ते सांंगावे. शेतक-याच्या स्वतंत्र बजेटचे काय झाले ? ते ही सांगावे ? परदेशातला काळा पैसा कुठपर्यंत आलाय ? ते ही सांगावे. असे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. छप्पन इंच वाल्या बहाद्दराने या सर्व प्रश्नांची उत्तर अशीच छाती पिटून द्यावीत इतकेच.