कोरंबी ग्रामसभेच्या वतीने वन-वनवा प्रतिबंधक अभियान

37

✒️संजय बागडे(प्रतिनिधी नागभीड)

नागभीड(दि.20फेब्रुवारी):- तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी कोरंबी हे गाव सभोवताल संपूर्ण जंगलाने वेढले आहे. गावाच्या चहूकडे उंच डोंगर रांगांनी येथील निसर्ग नेहमीच खुलून दिसते. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील वनवा गावापर्यंत कधीही पोहोचून मोठी हानी करू शकतो याची प्रचिती मागच्या उन्हाळ्यात येथील लोकांना आली आहे. मागच्या उन्हाळ्यात अगदी दुपारच्या सुमारास वनव्याची आग अगदी गावाजवळ पोहोचली होती. ही आग आटोक्यात आणण्यासाठी गावकऱ्यांची चांगलीच तारांबर उडाली आणि बरेच कष्ट उपसावे लागले होते. सुदैवाने त्यावेळी होणारा अनर्थ टळला मात्र तसा प्रसंग परत ओढवू नये. वणाचे संरक्षण संवर्धन करावे या उदात्त हेतूने कोरंबी ग्रामसभेने वन वणवा प्रतिबंधक अभियान सुरू केले आहे.

कोरंबीच्या सभोवतालचे जंगल घोडाझरी वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्रालगत येत असल्याने वनविभाग नेहमीच दक्ष असते मात्र तरीही काही ठिकाणी वनवा लागत असल्याचे निरीक्षणात आल्याची माहिती वनविभागाने सभा घेऊन लोकांना दिली. त्यावर ग्रामसभेत गांभीर्याने विचार करून जंगलात पाळी-पाळी ने गस्ती करणे व श्रमदानातून फायर लाईनचे काम करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय गावाने सामूहिकपणे घेवून लागलीच कार्यवाही सुरू केली. दुसऱ्या दिवशी सामूहिक व हक्क व्यवस्थापन समितीच्या वतीने गस्त व श्रमदानाचे नियम ठरऊन नियोजन तयार केले ते ग्रामसभेत मंजूर करण्यात आले. त्यानुसार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 पासून प्रत्येक दिवशी पाच कुटुंबाचे पाच पुरुष पाळीपाळीने जंगलात गस्त करीत आहे.

कोरंबीच्या पश्चिमेला बरीच उंच पर्वतरांग/डोंगर आहे त्या पलीकडे लगतच काही गावे आहेत तिकडून वनवा कोरंबीकडे येऊ नये म्हणून डोंगर माथ्यावर फायर लाईन तयार करण्यासाठी दिनांक १६ व १७ फेब्रुवारीला संपूर्ण दिवसभराचे श्रमदान करण्यात आले यामध्ये प्रत्येक कुटुंबातील सुमारे 90 व्यक्ती सहभागी झाले होते. सकाळी 8 वाजता पिण्याचे पाणी, आग विझविणयासाठी झाडाच्या फांद्या इत्यादी साहित्य सोबत घेऊन सर्व ग्रामस्थ श्रमदानासाठी निघाले व आपले काम आटोपून सायंकाळी 5 वाजता सर्व परत आले. या दोन दिवसाचे श्रमदानातून सुमारे ५ ते 7 किमी. ची फायर लाईन तयार करण्याचे काम येथील लोकांनी केले आहे. दरम्यान सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती च्या मार्फत नास्ता म्हणून मुरमुरे व पोह्याचा कच्चा चिवडा सर्वांना दिला गेला.

आग प्रतिबंधासाठी लोकांचे हे योगदान खूप मोलाचे आहे. कारण वनवा प्रतिबंधक हे वनविभागाचे काम आहे. मात्र आपण ग्रामवासियाची सुद्धा जबाबदारी आहे. असा आदर्श कोरंबी येथील ग्रामस्थांनी आपले कर्तव्य बजावून सर्वांपुढे निर्माण केला आहे. या श्रमदान मोहिमेत वनविभागाचे काही स्थानिक कर्मचारी सुद्धा सहभागी झाले होते. वनवा प्रतिबंधक अभियान ही कोरंबी गावाची संकल्पना इतरही गावांनी अनुसरावी. असे अभियान राबविणारे गावांना वनविभागाने प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यामुळे लोकसहभागाने वणवा प्रतिबंध करणे शक्य होईल.