मेहरूण येथील राज प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

69

🔸आत्मविश्वास, परीश्रम, सदाचार, विधायक स्पर्धा, विनम्रता ही विद्यार्थ्यांच्या यशाची पंचसूत्री आहे – विजय लुल्हे [ भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख ]

✒️विशेष प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

जळगांव(दि.21फेब्रुवारी):- ” ध्येयनिष्ठ आत्मविश्वास, अखंड परीश्रम , नैतिक सदाचार , विधायक स्पर्धा व विनम्रता ही विद्यार्थ्यांच्या यशाची पंचसूत्री आहे ” असे प्रतिपादन भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी केले.मेहरूण येथील राज प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे शुक्रवार दि.१७ फेब्रुवारी २०२३ रोजी महापौर जयश्रीताई महाजन यांच्या अध्यक्ष्यतेखाली भावपूर्ण निरोप देण्यात आला.त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना विजय लुल्हे बोलत होते.

व्यासपीठावर महापौर जयश्रीताई महाजन ( म.न.पा.जळगाव ), मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील,विकास नेहेते, ज्येष्ठ शिक्षिका सरला झांबरे,विकास नेहेते, संदिप खंडारे सर उपस्थित होते. पुढील मार्गदर्शनात विजय लुल्हे यांनी यश – अपयश या नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रथितयश मान्यवरांनाही प्रसंगी अपयश येते.अपयशाला सुसंधी समजून अदम्य जिद्द व नवचैतन्याने सामोरे जात प्रतिभावंत ऐतिहासिक यश मिळवून आपले सामर्थ्य सिद्ध करतात. शिक्षण,कला,संगीत, क्रीडा व अन्य क्षेत्रातील प्रतिभावंतांचे समयोचित उदाहरणे देऊन लुल्हे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. सरोज पाटील, वर्गशिक्षक विकास नेहेते यांनीही मनोगत मांडले. अध्यक्षीय मार्गदर्शनात महापौर जयश्रीताई महाजन म्हणाल्या की, ” विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध व्यक्तींचा आदर्श कायम समोर ठेवून जिद्दीने यश मिळवावे. नेत्रदिपक यश मिळवून शाळेचा व कुटूंबाचा नावलौकिक तुम्ही वाढवा. ” असे आवाहन केले .परीक्षा काळात अभ्यासाचे काटेकोर नियोजन व कार्यवाही बाबत महत्वपूर्ण टिप्स दिल्या. निरोप देण्याने आपले नाते कधी संपत नाही तुम्ही केव्हाही मार्गदर्शन घेण्यासाठी हक्काने येवू शकता.तुमच्या अडचणी सर्व शिक्षक प्रयत्नपूर्वक सोडवतील असेही जयश्री ताईंनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिले. प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मान्यवरांनी केले.केवल ठाकरे व हर्षल मिस्तरी यांनी स्वागतगीत सादर केले.

सालाबादप्रमाणे जय दुर्गा ग्रुप मेहरुणचे संस्थापक डॉ.सुनीलभाऊ महाजन यांच्या प्रेरणेने दहावीच्या विद्यार्थ्यांमधून अभ्यासू व अष्टपैलू विद्यार्थी / विद्यार्थीनीला पुरस्कार देण्यात येतो.सन २०२२ / २३ शैक्षणिक वर्षाचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार कु.प्रिया मराठे हिस महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते देण्यात आला.पुरस्कारात आकर्षक गौरव चिन्ह व ” ताई मी कलेक्टर व्हयनू ” हे प्रेरक आत्मचरित्र देण्यात आले.बहुगुणी विद्यार्थीनी हुमेरा अन्सारी हिस मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रेरणादायी ग्रंथ व बुके देऊन सत्कार करण्यात आला.

निरोपार्थी विद्यार्थ्यांतर्फे प्रिया ठाकरे मनोगतात म्हणाली की शाळेत शिक्षकांनी केलेले संस्कार व लावलेली शिस्त आम्हाला आयुष्यात दीपस्तंभसमान मार्गदर्शक आहे.हुमेरा अन्सारी विद्यार्थिनीने शेरोशायरी करीत कार्यक्रमात रंगत आणली.मयूर निकम,केवल ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी भावोत्कट प्रसंगातून शिक्षक प्रफुल्ल नेहते यांची शिस्तप्रियता, विकास नेहेते यांचा प्रेमळपणा व सरोज पाटील यांचा वक्तशीरपणाचा गुणगौरव केला. भावुक आणि गंभीर झालेल्या वातारणात बदल आणण्यासाठी आशालता महाजन मॅडम यांनी हसत खेळत आशयपूर्ण साभिनयाने फिशपाँड वाचन करून विद्यार्थ्यांना प्रफुल्लित केले ! सर्वाधिक फिशपॉन्डस् मयुर निकम याला पडल्याने तो फिशपॉन्ड हिरो झाला !

वातावरण निर्मितीनंतर सरोज पाटील यांनी मार्गदर्शन केले.इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक विकास नेहेते यांनी मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना सांगितले की,” दोन वर्षांनी तुम्ही मतदान करणारे सुजाण नागरिक होणार आहात त्यामुळे आता तुम्ही हुल्लडबाजी कमी करून सद्वर्तनाने सामाजिक व कौटुंबिक जबाबदारीही घेतली पाहीजे.” सूत्रसंचालन शिक्षक प्रफुल्ल नेहते व आभार प्रदर्शन विकास नेहेते यांनी केले.कार्यक्रमास शिक्षक सुशील सुरवाडे, विजय चौधरी शिक्षकेतर कर्मचारी अमृत नेहेते यांसह नव्वद टक्के विद्यार्थी उपस्थित होते.संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देऊन निरोप देण्यात आला.