डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महिला शक्तीवर प्रचंड विश्वास होता – बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये

29

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.24फेब्रुवारी);–डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का पुणे येथे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती आणि महिला संविधान परिषद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आणि स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाताई सोनावणे होत्या. दिपप्रज्वलन करून बार्टी महासंचालक आयु. धम्मज्योती गजभिये सरांनी परिषदेचे उदघाटन केले.

आज आपल्या सर्व माता भगिनींना मोकळा श्वास घेता यावा अशी परिस्थिती उपलब्ध आहे. पूर्वीच्या काळात जेव्हा महिलांना समाजात दुय्यम स्थान होते त्याही काळात बाबासाहेबांनी महिलांना चळवळीत प्राधान्याने स्थान दिले होते आणि अडाणी , अशिक्षित असणाऱ्या माता भगिनींना घेऊन उच्चविद्या विभूषित, विश्वरत्न माणसाने महिला परिषदेचे आयोजन केले होते. समाजात महिलांच्या माध्यमातून चळवळीला दिशा देण्याचे काम बाबासाहेबांनी केले कारण बाबासाहेबांना महिला शक्तीवर प्रचंड विश्वास होता असे मत त्यांनी व्यक्त केले. बार्टी संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना आहेत. त्या योजना महिलांनी जाणून घेऊन त्या गरजू , वंचित महिलांपर्यंत पोहचल्या पाहिजे यासाठी जागृत असले पाहिजे आणि तसे प्रयत्न महिला वर्गानी केले तर संस्थेच्या योजना लाभ वंचित महिलांना घेता येईल आणि आजच्या महिला परिषद आयोजन करण्याचा उद्देश सफल होईल.

महिला परिषदेत महिलांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. प्रा. सुरेखा भालेराव नागटिळक, प्रा. ज्योतिताई धुतमल पंडित,ऍड. मनीषा महाजन ,डॉ. विद्या राईकवार वक्त्या परिषदेला लाभल्या. परिषदेचे सूत्र संचलन शीतल गायकवाड, फाल्गुनी सोनावणे, साक्षी कांबळे, दीक्षा सोनकांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे, नालंदा फाउंडेशन चिंचवड, भारतीय बौद्धजन विकास समिती आणि बार्टीच्या कर्मचारी आयु. सुनंदा गायकवाड यांनी अथक परिश्रम घेतले.