शिवसेनेची बिकट वाट

154

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिवसेनेतून बाहेर पडलेल्या ४० आमदारांच्या गटाला दिले.आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे खरेखुरे शिवसैनिक म्हणून मिरवत असताना एका ताकदवर शक्तीच्या आडोशाने लपतछपत हे घडत गेले आणि शिवसेनेचे लचके तोडणारे प्रसन्न झाले.त्यावर अतिशय गंभीर आणि धीरोदात्तपणे व्यक्त झालेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र सूचकपणे हा लढा खऱ्या अर्थाने कोणाविरुद्ध आहे, हे सांगत आहेत.

शिवसेना फोडणाऱ्यांविरोधात आग त्यांच्या डोळ्यात दिसत आहे, तर त्यांचे पाठीराखे खंबीरपणे त्याच्यामागे उभे आहेत. कोणेएकेकाळी महाराष्ट्रात युतीच्या आणाभाका घेत धाकटा भाऊ थोरला भाऊ करत शिवसेनेचा खांदा वापरणाऱ्यानी केसानी गळा कापल्याच्या भावना व्यक्त होत असल्यास नवल काय? महाराष्ट्रात प्रबोधनाची मोठी परंपरा आहे. सत्यशोधक चळवळीच्या झंझावाती कार्यपद्धतीत अनेक ब्राम्हणेतर मुखंडं तावूनसुलाखून निघाले.ब्राम्हणेतर चळवळीत मोठा दबदबा असलेले प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे प्रबोधन चळवळीतील अमूल्य रत्न. त्यांनीच शिवसेना हे नाव सुचवले,असे आता पुढे येऊ लागले. यावरून शिवसेनेच्या जन्माचा हेतू ध्यानात येतो, शिवसेनेतून फुटलेल्यांपेक्षा फोडणाऱ्यांना अधिक नीटपणे समजलेला असणार. शरद पवारांना त्यांच्या मातोश्रींचा राजकीय वारसा आहे.

शारदाबाई पवार ह्या राजर्षी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग मध्ये राहून शिकल्या, पुण्यातील सेवासदन मधून शिक्षण घेतले. पुणे लोकल बोर्ड च्या एकमेव महिला राखीव जागेवर त्या अविरोध निवडून आल्या. लहानपणापासून शाहूमहाराज,ब्राम्हणेतर चळवळीचा प्रभाव त्याच्यावर होता. तोच वारसा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जपला.म.गांधींच्या नेतृत्वातील तत्कालीन कॉंग्रेसला सत्यशोधक चळवळीतून उदित ब्राम्हणेतर पक्षाने कॉंग्रेसला जनाधार मिळून दिला. त्यामुळे टिळक युगापर्यंत कॉंग्रेस म्हणजे शेटजी भटजी लाटजींचा पक्ष अशी कॉंग्रेसची असलेली प्रतिमा बदलून कॉंग्रेसला व्यापक जनाधार मिळू लागला.महाराष्ट्रात कॉंग्रेसचे नेतृत्व दीर्घकाळ ब्राम्हणेतर करत आहेत. अशी कॉंग्रेस सोबत घेऊन महाविकास आघाडीचा प्रयोग ब्राम्हणेतर राजकारण भक्कम करते.शिवराय फुले शाहू आंंबेडकरांच्या महाराष्ट्रात ब्राम्हणेतर राजकारणाचा वारू सुसाट वेगाने निघाला असताना आणि देशात महाराष्ट्र अव्वल होऊ पाहत असताना,तो वारु थोपवण्यासाठी कासावीस झालेली पेशवाईची प्रियकर चांडाळचौकडी महाराष्ट्राने पाहिली.

शिवसेना पक्ष फोडून सत्ता पालटवून मिंध्यांना पुढे करुन दुय्यमत्व स्विकारणे शिखंडीच्या पाखंडी सोयऱ्यांनाच का जमते? याचे उत्तर त्यामागील दडलेला त्यांचा सनातन स्वार्थ समजून घेतला तर कळेल. शिवसेनेवर आघात करुन सत्ता येणेच पुरेसे नाही तर महाविकास आघाडीने पकडलेली ब्राम्हणेतर राजकारणाची लय बिघडवणे, ब्राम्हणेतर राजकारण खतम करुन फुटीरतावाद्यांच्या मदतीने चोरपावलांनी पेशवाई आणणे, शिवसेनेवरील कुरघोडीमागील ही खरी गोम आहे.

मंडलनंतरच्या काळात प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य वाढू लागले.त्यामुळे भारतीय राजकारणात आघाडीच्या राजकारणाने सत्ता प्रभावित केली. द्विपक्षीय सांसदीय राजकारणाची भलावण करणारे उच्चजातवर्णीय नेतृत्व आणि प्रसारमाध्यमातील चाणाक्ष मंडळी दोनच प्रबळ राष्ट्रीय पक्ष असावेत म्हणून डिंडीम बडवत असताना अनेक राज्यात प्रादेशिक पक्ष आणि स्थानिक नेतृत्व यांची मूळं घट्ट होत होती.स्वातंत्र्यप्राप्तीतरही ओबीसी दलित आदिवासी यांना पुरेसे नेतृत्व आणि प्रतिनिधित्व मिळत नसल्याने प्रादेशिक पक्षांच्या स्वरूपात ब्राम्हणेतर नेतृत्व विकसित होत गेले. मंडल आंदोलनाने ओबीसी राजकीय नेतृत्व विकसित झाले. लालू्प्रसाद, मुलायमसिंग,शरद यादव, देवेगौडा, करुणानिधी, चंद्राबाबू नायडू,नितीश कुमार, छगन भुजबळ, अर्जुनसिंग,सिताराम केसरी इ.नेते प्रभावी ठरत असताना एनडीएच्या प्रयोगातून अनेक प्रदेशात मित्रपक्ष शोधत शिवसेनेसारखा अनेक प्रादेशिक पक्षांचा वापर झाला.

आज शिवसेनेची जशी गत केली त्यापेक्षा वेगळी एनडीएच्या घटकपक्षांची अवस्था दिसत नाही.नवाश्मयुगातील गावांच्या भोवती असलेल्या संरक्षक भिंतींचे आणि खंदकांचे पुरावे मिळाले आहेत. पूर, जंगली जनावरे,तसेच गुरे चोरून नेणारे बाहेरचे लोक यांच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी या भिंती बांधल्या जायच्या.मानवाची ती रानटी अवस्था होती. आजच्या नागरी समाजात देखील मानव सुरक्षित नाही.नैसर्गिक आपत्ती, जंगली जनावरे यांच्यापेक्षाही माणसांपासून माणूस सुरक्षित राहिला नाही. त्यातही स्वदेशीय स्वधर्मीय म्हणता येईल, अशी ही माणसाची जात्यांध नवी हावरट जमात धुडगूस घालून राजकीय व्यवस्थेत गब्बर बनू पाहत आहे.नैतिक,न्यायिक,सांविधानिक,मानवी मूल्यांच्या भिंती लांघून मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे.माणसं, पक्षनाम, पक्षचिन्ह चोरीला जात आहे.

विरोधी पक्षांच्या जीवावर उठलेले एकचालकानुवर्ती नेतृत्व मित्रपक्षांशी गरज सरो अन् वैद्य मरो,या अलंकृत कृतघ्न मूल्यांनी शोभूनच दिसावेत. शिवसेनेचे नामोनिशाण मिटवण्यासाठी चाललेला महाएपिसोड बघता हे ध्यानात येते.सत्ताविरोधकांना धडकी भरवून, मित्रपक्षांना बगलेत मारून ठेवणे अशा दुष्क्रुत्यांचा सामुहिक प्रतिकार केल्याशिवाय गत्यंतर नाही.

✒️अनुज हुलके(मो:-9823883541)