हरवलेला बॉयफ्रेंड

32

एका बागेत एक सुंदर मुलगी
हुंदके देत रडत बसलेली
केस विस्कटलेले
चेहरा सुजलेला
तिला खूपच दुःखात पाहून
मी जवळ जाऊन विचारलं
ताई काय झालं?..का रडतेय..?

ती म्हणाली
दादा माझा ‘बॉयफ्रेंड’ हरवलाय ओ
कुठे गेलाय काहीच कळत नाही
मला सापडतच नाहीय.

मी म्हणलं
ताई काळजी करू नकोस,
असेल इथंच कुठेतरी असेल

सकाळी सकाळी तो
भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असेल
तिथंच तो कट्टर हिंदू झाला असेल
तसाच मग तो
मातोश्रीवर गेला असेल
मराठीचा गर्व बाळगत
खऱ्या हिंदुत्वाच्या शोधात
गुवाहाटीला गेला असेल
झाडी, डोंगर आणि हाटील बघून
जरा मोहरला असेल
पण,
पन्नास खोके….. पन्नास खोके ….
या घोषणा ऐकून गोंधळला असेल

कारवाईच्या भीतीने
तो कमळाच्या फुलात लपला असेल
कमळाच्या पाकळ्यानी
त्याला आवळून आवळून
त्याचा पार रस काढला असेल

सगळा रस निघून गेल्यावर
त्याला आपला देश आठवला असेल
मग हळूच तो
भारत जोडोच्या यात्रेत सामील झाला असेल
घाबरत घाबरतच
डरो मत ….डरो मत ….च्या घोषणा देत असेल
चालून चालून तो थकला असेल

थकलेला देह घेऊन
तो घड्याळाच्या काट्याजवळ आला असेल
पावसात भिजलेला नेता
त्याला भावला असेल
पण तिथल्या गर्दीत
त्याला त्याची जागा सापडत नसेल

कुठेच जागा मिळत नाही
म्हणून तो चिडला असेल
विद्रोही बनला असेल
अन्याया विरुद्ध बंड करण्यासाठी
निळा झेंडा घेऊन
आर पी आय मध्ये आला असेल
पण तिथल्या
अध्यक्षाच्या कविता ऐकून ऐकून
पार वेडा झाला असेल

एकजुटीचं वेड लागून
तो बहुजन झाला असेल
बहुजनांची सत्ता यावी
असं त्याला वाटलं असेल
म्हणून मग तो
वंचित मध्ये आला असेल
पण,
तिथं नेमकं वंचित कोण..?
हेच त्याला कळत नसेल

वैतागून त्याने राजकारण सोडलं असेल
स्वतःचा शोध घेण्यासाठी
एखाद्या बाबाच्या आश्रमात गेला असेल
गुरुजीच्या नादाला लागून
गड किल्ले पाहत असेल
सुष्माचं भाषण ऐकत असेल
इंदूरीकरच्या कीर्तनाला बसला असेल
व्हाट्स अप वर रमला असेल
फेसबुकवर आभाळ हेपलत असेल
इंस्टावर रिल बनवत असेल
कुठं कमेंट करत असेल
कुठं लाईक करत असेल

सगळं करून झाल्यावर
तो नितीन चंदनशिवे ची कविता वाचेल
तो चंदनशिवेचा शोध घेत
माझ्याकडे नक्की येईल
तुझ्या बॉयफ्रेंडला मी माणूस बनवून
त्याच्या आई वडिलांसोबत
संध्याकाळ पर्यंत तुझ्यासमोर घेऊन येईन

तू त्याला घट्ट आवळून धर
पुन्हा या गर्दीत जाऊ देऊ नकोस
दोघेही भारतीय होऊन
याच भारतात
सुखाचा संसार करत राहा
सुखाचा संसार करत राहा

✒️कवी:-दंगलकार नितीन चंदनशिवे,मु.पो.कवठेमहांकाळ
जि.सांगली,संपर्क 07020909521 (संपर्क साधू शकता.) कविता आवडल्यास शेअर करू शकता.