महागाव मधील रखडलेल्या घरकुलाचे काम होणार पुर्ण-गटनेते रामराव पाटील यांच्या निवेदनाची दखल

29

🔸नगर पंचायतच्या खात्यात ७कोटी८० लक्ष रू. जमा

✒️किशोर राऊत(महागाव प्रतिनिधी)

महागाव(दि.9मार्च):-नगर पंचायत क्षेत्रातील पंतप्रधान घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचे घरकुल बांधणीचे काम निधी अभावी रखडले होते परंतु आता त्यांचे घर बांधण्याचे स्वप्न पुर्ण होणार असुन गटनेते रामराव पाटील नरवाडे यांनी निधी जमा करण्यासाठी दिलेल्या निवेदनाची व केलेल्या पाठवपुराव्याची दखल घेत शासनाच्या वतीने नगर पंचायतच्या खात्यात ७कोटी ८०लाख रूपये जमा करण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ.करूणा ना. शिरबीरे यांनी दिली.

केंद्र व राज्य सरकारच्या गरजु लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजने मध्ये महागाव नगर पंचायत अंर्तगत पंतप्रधान आवास योजनेमध्ये प्रथम डीपीआर मध्ये २७५ व द्वितीय डीपीआर मध्ये ४०१असे एकुण ६७६ घरकुल मंजुर झालेले असतांना प्रथम डीपीआर मधील २७५लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून १ कोटी १०लक्ष रुपये व केंद्र शासनाकडून १ कोटी६४ लक्ष ४०हजार रूपये असा निधी मंजुर झाला होता व तो संपुर्ण निधी घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येऊन खर्च झाला तरीही यामधील राज्य शासनाचा १ कोटी ६५लक्ष रूपये व केंद्र शासनाचा २ कोटी ४८लक्ष १०रुपये असा एकुण ४कोटी १२ लक्ष रुपये निधी अद्याप प्राप्त झालाच नाही तसेच द्वितीय डीपीआर मध्ये ४०१लाभार्थ्यांना घरकुल मंजुर झाले असुन त्या करीता राज्य शासनाचा ४कोटी १लक्ष रुपये व केंद्र शासनाचा ६कोटी१लक्ष ५०हजार रूपये असा एकुण १० कोटी २लक्ष ५० हजार रुपये निधी मंजुर झाला परंतु तो भेटला नसल्याने शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम रखडले होते हे घरकुलाचे काम पुर्ण होण्यासाठी निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी महागाव नगर पंचायतीचे गटनेते रामराव पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री संजय राठोड,नगर पंचायत प्रशासनाने मुख्य अभियंता, राज्यस्तरीय समन्वय अधिकारी, प्रधानमंत्री आवास योजना, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता.

रामराव पाटील यांनी निधी उपलब्ध व्हावा यासाठी सतत पाठपुरावा केला त्यांच्या या पाठपुराव्याला यश येवुन शासनाच्या वतीने ७ कोटी ८० लाख रुपये नगर पंचायतच्या खात्यात जमा झाले असुन ते लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जावुन या लाभार्थ्यांचे घरकुलाचे काम पुर्ण होवुन त्यांचे स्वप्न साकार होणार असल्याची माहिती नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.करूणा ना. शिरबीरे यांनी दिली. यावेळी महागाव नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष सुरेश पाटील नरवाडे, गटनेते रामराव पाटील नरवाडे, आरोग्य-स्वच्छता सभापती प्रमोद भरवाडे, बांधकाम सभापती गजानन साबळे, नगरसेविका सौ. रंजना दिपक आडे, सौ.सुनिता शिवाजी डाखोरे, सौ आशा शंकर बावणे, सौ. जयश्री संजय नरवाडे, नगरसेवक परवेज सुरैय्या, विशाल पांडे, सुजितसिंह ठाकुर उपस्थित होते.

घरकुल लाभार्थ्यांच्या रखडलेल्या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणुन सत्ताधारी गटाच्या सर्व पदाधिकारी व नगरसेवकांनी शासनाकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती त्याची दखल घेवुन शासनाने जो निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे व पालकमंत्री ना.संजय राठोड यांचे आभार मानतो.निधी उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांच्या हक्काचे घर लवकरच पुर्ण होईल- रामराव पाटील नरवाडे (गटनेता न.पं. महागाव)