लोकप्रतिनिधींनी बहुजनांच्या घरावर हल्ला करणे हा निंदणीय प्रकार-माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर

32

🔹आमदार भांगडीयासह सर्व आरोपीना अटक करा- पोलीस स्टेशनला सादर केले निवेदन

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-८६०५५९२८३०

चिमूर(दि.१४ मार्च):- चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया व त्यांच्या कार्यकत्यांनी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांच्या घरावर हल्ला करून त्यांचे भाऊ साईनाथ बुटके व भावाचे कुटुंबियांना मारहाण केली हा प्रकार निंदणीय आहे. कायदा बनविणारे लोकप्रतिनिधीच कायदा हातात घेत असतील तर हा भारतीय लोकशाहीला घातक होणारा प्रकार आहे. बहुजन समाजातील ओबीसी कुटुंबियांवर हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन चिमूर पोलीस स्टेशनला सादर केले असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीचे महासचिव तथा माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर यांनी चिमुर येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.

चिमूर जिल्हा व्हावा या मागणीपासून चिमुर क्षेत्र हे राजकीयदृष्टया अतीसंवेदनशील क्षेत्र म्हणून ओळखल्या जाते. अशा अवस्थेत या क्षेत्राचे आमदार भांगडीया व त्यांचे कार्यकर्ते बहुजन नेत्यांच्या घरावर हल्ला करीत आहेत. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु शकतो. साईनाथ बुटके यांनी समाज माध्यमावर जो मजकूर प्रसारीत केला. त्याचे आम्ही समर्थन करीत नाही. मात्र कायाचा मार्ग सोडुन कायदा हातात घेवून हल्ला करण्यायांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. भांगडीया हे लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी विधानसभा अध्यक्षाची परवानगी घेवुन पुढील कार्यवाही करण्यात यावी असे सांगत डॉ. वारजुकर पुढे म्हणाले, सामान्य जनतेचे प्रश्न व समस्या सोडविण्याचे काम लोकप्रतिनिधीचे असतांना भांगडीया हे परिसरात दहशत निर्माण करण्याचे काम करीत आहेत. पद व सत्तेचा दुरुपयोग करून कायदा व सुव्यवस्था बिघविण्यापेक्षा शेतकऱ्याच्या शेतात गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी पोहचवून पुण्य पदरी पाडून घ्यावे असा सल्ला डॉ. अविनाश वारजूरकर यांनी दिला.

पत्रकार परिषदे पूर्वी माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर यांच्या नेतृत्त्वात चिमुर तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन सादर केले. या निवेदनात साईनाथ बुटके यांना मारहाण करीत असतांना त्यांच्या पत्नीचे केस पकडुन च हाताला धरून वरच्या मजल्यावरुन खाली आणणाऱ्यावर पोलीसांनी विविध गुन्हे दाखल केले आहे. बुटके यांच्या घरावर हल्ला करून स्वतः आमदार भांगडीया यांनी स्वतः पाचशे ते हजार लोकांचा पोलीस ठाण्यात जमाव करुन पोलीस प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असे निवेदनात म्हटले आहे.

आमदार भांगडीया यांनी २०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचारादरम्यान पोलीसाला लाथ मारणे व २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत शंकरपूर येथे रस्त्यावर गाड्या आडव्या लावुन विरोधी पक्षाला धमकाविणे व विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना नाउमेद करण्याचे प्रकार केले आहे. तसेच राजस्थानमध्ये पोलीसांशी हुज्जत घालण्याचा प्रकार झाला होता. हि सर्व पार्श्वभूमी लक्षात घेवून आमदार भांगडीया यांना अटक करण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

पत्रकार परिषदेला डॉ. अविनाश वारजूरकर यांचेसह चिमूर तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष डॉ. विजय गावंडे, जि.प. चे माजी अध्यक्ष डॉ. सतीश वारजुकर, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी सेवादलचे सहसचिव प्रा. राम राऊत, तालुका सेवा दलाचे अध्यक्ष किशोर शिंगरे, तालुका काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष विलास डांगे, तालुका पर्यावरण सेलचे अध्यक्ष प्रदिप तळवेकर, चिमुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश अगडे, तालुका सचिव विजय डांबरे, माजी तालुका अध्यक्ष माधवबापू बिरजे, अल्पसंख्यांक सेलचे तालुका अध्यक्ष आरीफभाई शेख, चिमुर नगर परिषद माजी गटनेते कदीर शेख यांचेसह अन्य उपस्थित होते.