‘प्रतिभा’ दिवाळी अंकास मसाप’चा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त

32

✒️इस्लामपूर प्रतिनिधी(इकबाल पीरज़ादे)

इस्लामपूर(दि.19मार्च);-येथील प्रतिभा दिवाळी अंकास महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा जुळे सोलापूर यांच्या वतीने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. साहित्य परिषदेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी व प्रमुख कार्यवाह गिरीश दुनाखे यांनी ही घोषणा केली. इस्लामपूर येथून गेली पंधरा वर्षे प्रतिभा हा दिवाळी अंक प्रकाशित होत आहे. गतवर्षीच्या दिवाळी अंकासाठी ‘सुखाचा शोध’ हा विषय घेऊन मान्यवरांचे लेखन प्रसिद्ध करण्यात आले होते.

सुख म्हणजे काय? ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून त्यावर दीप्ती गंगावणे, नीलेश देशमुख, इंद्रजीत भालेराव, निलांबरी जोशी, सुप्रसिद्ध आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, डॉ. अनिल मडके, सुधा पाटील, साहिल कबीर, काडसिद्धेश्वर स्वामी, स्वाती मोहिते, डॉ. अतुल मोरे, मानसतज्ञ कालीदास पाटील, न्या. कल्पना होरे, अभय भंडारी यांच्यासह विविध मान्यवरांनी लेखन केले होते. अंकात ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांची मुलाखत आहे तर ऐश्वर्य पाटेकर, प्रियांका पाटील, सुधीर कदम, सुषमा गावडे यांच्या कथांसह मान्यवरांच्या कविताही आहेत.

सुप्रसिद्ध चित्रकार अन्वरहुसेन यांनी अंकाचे सुरेख मुखपृष्ठ साकारले होते. धर्मवीर पाटील अंकाचे संपादक आहेत. तर आनंदहरी, संजय थोरात, डॉ. दीपा देशपांडे हे सल्लागार संपादक आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जुळे सोलापूर यांच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट दिवाळी अंकांना पुरस्कृत केले जाते. रोख रक्कम, मानचिन्ह, शाल, पुस्तक, गुलाबपुष्प असे पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवारी २ एप्रिलला लोकमान्य टिळक सभागृह, सोलापूर येथे सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.