काय असते नैतिकता….?-What is morality?

33

‘ नैतिकता ‘ हा शब्द असा आहे की बऱ्याच जणांनी तो ऐकला तरी त्यातील कित्येक जणांना तो ‘ अपरिचित ‘ असेल. मुळात तो अपरिचित शब्द नाही. असेही नाही की तो शब्द कधी ऐकण्यात आला नसावा! एका प्रौढ व्यक्तीच्या जीवनामध्ये कधी न कधी तो शब्द ऐकण्यात आलेला आहे. मग तो शब्द त्याच्यासारख्याच एखाद्या दुसऱ्या प्रौढाने उच्चारला असेल किंवा आपल्यापेक्षा एखाद्या तज्ञ, श्रेष्ठ व्यक्तीने तो उच्चारला असेल. आपण इतकेच केले की तो शब्द ऐकला. त्याचा कधी अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला नाही आणि तो शब्द जसा आला तसा सोडून दिला. त्या शब्दावरून आपल्याला इतकेच कळाले की नैतिकता म्हणजे कुठले तरी मूल्य आहे आणि जे मूल्य चांगले आहे आणि ते प्रत्येक व्यक्तीने अंगीकारायला पाहिजे. परंतु नैतिकता या शब्दाच्या सखोल अभ्यासामध्ये आपण कधी गेलो नाही आणि जाण्याचा प्रयत्नही केला नाही. परंतु आपण नैतिकतेने कितीही भ्रष्ट असो इतर लोकांमध्ये नैतिकता असावी हे आपण नेहमी सांगत असतो. परंतु तीच नैतिकता आपल्यात आहे का? याचा अभ्यास आपण कधी करण्याचा प्रयत्न करत नाही.

आता नैतिकतेवर एवढं बोलायचं म्हटल्यावर त्याची व्याख्या ही तर सांगावीच लागेल. आता नैतिकतेची काही विशिष्ट अशी व्याख्या नाही किंवा कुठल्या तत्वज्ञाने ती व्याख्या तयार केलेली नाही.मुळात ती आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतीतून, जे चांगले गुण आहेत, जे चांगले आचरण आहे, त्यामधून निर्माण झालेली व्याख्या आहे. जी व्याख्या खूप मोठी असू शकते; जी आपल्या जगण्याच्या वावरण्याच्या पद्धतीमध्ये, त्याच्या दृढीकरणात वाढ करू शकते. जे चांगलेआहे आणि जे चांगले असायला हवे हे ज्यामधून अपेक्षिले आहे ती नैतिकता! आपण या सोप्या शब्दांमध्ये असे सांगू शकतो. परंतु नैतिकतेला शब्दांच्या विशिष्ट कप्प्यांमध्ये बसवायचे असेल किंवा ती व्याख्या सगळ्यांना समरस होऊन लागू व्हावी असे वाटत असेल किंवा ती व्याख्या प्रामाणिक – प्रमाणित असावी अशी आपल्याला वाटत असेल तर ती व्याख्या खालील प्रमाणे करता येईल.

नैतिकता अशा नैतिक मूल्यांनी बनलेली व्यवस्था आहे, जी सुखी जीवनाच्या प्राप्तीसाठी आपल्या स्वभावाला आकार देते. नैतिकमुळे आपण प्रामाणिकपणे जगू लागतो आणि आपल्या संपर्कातील लोकांप्रति विश्वासाची भावना दृढ करून मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करू शकतो. त्यामुळे नैतिकता सुखाची गुरुकिल्ली आहे.

असा कुठलाच धर्म नाही की ज्यामध्ये नैतिकता या मूल्याचा समावेश नाही. असा कुठलाच अभ्यासक्रम नाही की त्यामध्ये विद्यार्थ्यांना नैतिकता शिकवली जात नाही. मग ती कुठलीही भाषा असो, कुठलाही प्रांत असो त्याचे बंधन नाही. मग हीच नैतिकता अनैतिकता होताना इथेच पहायला मिळते. याचा अर्थ ते अनैतिक आहेत असा होत नाही. मुळात त्यांना नैतिकता समजली नाही असा अर्थ होतो. त्यांना ती समजून सांगण्यात आपण कमी पडलो. लिहून ठेवणारे, सांगणारे ते सांगून गेलेत पण त्याचा प्रचार – प्रसार – उपयोजन आणि पिढ्या न पिढ्या संगोपन करणे आपल्याला जमले नाही. मुळात त्यावर बोलावे हे महत्वाचेच वाटले नाही. मग अनैतिक समाज निर्माण होतो; आणि आपणच म्हणायला लागतो की समाजात नैतिकता उरली नाही. मुळात ती शिल्लक उरावी यासाठी आपण काय केले? काहीच नाही. उठसूठ लोकांवर बोलून मोकळे होणेच पसंत केले. समाज माणसांनी बनतो, तो त्यांनीच घडतो आणि त्यांच्यामुळेच बिघडतोही. मुळात कोणी स्वतः ला बिघडवत नाही पण इतरांना घडविण्यातही आपली भूमिका हवी ती पार पाडू शकत नाही. इथे लोकांना आपल्या गरजा भागविण्यासाठी करावी लागणारी धावपळ सोडायला वेळ नाही तिथे नैतिकता कोण पसरवणार? हा प्रश्न उगाच आपल्या मनात निर्माण तर होणारच की! मुळात नैतिकता हा काही अभ्यासक्रम नाही की जो रोज बसून राबवावा लागेल. ती वागण्यामध्ये अंगिकारावी लागेल. त्याचे अनुकरण इतर करतील तेव्हा आपोआप प्रचार होईल. मग ते आपल्या घरातील लहानग्यांपासून सुरू होईल, आणि हळूहळू ते इतरत्रही पोहचेल.

लोकांप्रति असलेली आपली संवेदना गायब होणे, वेळोवेळी नको तेव्हा सर्रास खोटे बोलणे, फसवणूक करणे, शिवीगाळ करणे, बांधिलकी न जोपासणे, आपले कर्तव्य पार न पाडणे, नेहमी इतरांची दिशाभूल करणे, विश्वासघात करणे, लोकांची घेतलेली उसनवारी परत न करणे, उपकाराची जाणीव न ठेवणे, आपल्यावर ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनाच फसवणे ही काही उदाहरणे नैतिकता भ्रष्ट होण्याची लक्षणेच समजा.

नैतिकता काय आहे हे कोणी एका शब्दांमध्ये, एका ओळीमध्ये, किंवा कितीही मोठा उतारा लिहून त्याच्यामध्ये स्पष्ट करू शकत नाही. फक्त नैतिकता हे सद्गुण आहे. सद्गुण याचा अर्थ जे – जे चांगले आहे ते अंगीकारणे; जे – जे वाईट आहे त्यापासून दूर राहणे एवढेच सोप्या शब्दांमध्ये मी आपल्याला नैतिकता याविषयी समजावून सांगू शकतो. समाजामधील चोरीचे प्रमाण वाढणे, समाजामध्ये एकमेकांविषयी आदर न बाळगणे, लबाड बोलणे, दुष्प्रचार करणे, या ज्या बाबी घडत आहेत त्या नैतिकतेला कुठेतरी दूर नेत आहेत हे त्यातून स्पष्ट होत आहे.हे आपल्या सभोवती, आपल्या सोबत, आपले इतरांसोबत घडू नये यासाठी आपण निर्मळ मनाने वागणे म्हणजेच नैतिकतेची जपवणूकच होईल एवढे नक्की!

✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती(नांदेड)मो:-8806721206