‘व्यक्तीचा स्वतःच्या मनाशी संवाद होणे गरजेचे’ – मोहन वाकळे

35

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो;-9823995466

उमरखेड(दि. 29 मार्च):-‘कोरोनाच्या काळात संवादाचे महत्त्व अधोरेखित झाले असून इतरांसोबतच व्यक्तीचा स्वतःच्या मनाशी संवाद होणे गरजेचे असते’, असे प्रतिपादन उमरखेड बस आगाराचे प्रमुख मोहन वाकळे यांनी केले. ते येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात कॉमर्स क्रिएटिव्ह क्लबद्वारा आयोजित संवाद कौशल्य या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम होते तर व्यासपीठावर प्रा. डॉ. पांडुरंग जाधव, प्रा. किशोर नवसागरे प्रा. नरवाडे, प्रा. नंदनवार, प्रा. कळमकर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, ‘संवाद हा प्रत्येक नात्याचा प्राणवायू आहे. प्रत्येक नात्याला जपून ठेवण्यासाठी गोड अशा संवादाची गरज असते.

एखादं नातं जपण्यासाठी आपल्याला एकमेकाला विश्वासाची गरज असून हा विश्वास जुळून घेण्याचे काम संवादामार्फतच होते. सुरुवातीला मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते कॉमर्स क्रिएटिव्ह क्लबचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. माधवराव कदम म्हणाले की, मनमोकळे बोलण्याचे ठिकाण म्हणजे मित्र असतो. मित्र हा योग्य सल्ला देणारा असावा लागतो.

अन्यथा जीवनात खूप मोठे नुकसान होते. संवादामध्ये आवाज वाढवण्याची गरज नसते. पालक आणि पाल्य यांच्यात संवाद कमी झाल्याची खंतही याप्रसंगी त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. पांडुरंग जाधव यांनी केले. संचालन बी.कॉम.चा विद्यार्थी सागर कटके याने केले तर आभार प्रा. संतोष पाचकुडके यांनी मानले.