चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राकरीता 6.93 कोटी निधीचे वितरण

36

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.30मार्च):- बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली या शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी दुसऱ्या टप्प्यातील 6.93 कोटी निधीचे वितरण 29 मार्च 2023 चे शासन निर्णयानुसार करण्यात आले आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी रु. 13.86 कोटी रूपयांचा पुरवणी मागणी प्रस्ताव ऑगस्ट 2022 च्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आला होता. मंजूर झालेल्या प्रस्तावानुसार हा निधी दोन टप्प्यात प्रकल्पाकरिता शासनाकडून वितरीत करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात रु.6.93 कोटी निधीचे वितरण यापूर्वीच ऑक्टोबर 2022 मध्ये करण्यात आले आहे. या निधीच्या माध्यमातून प्रकल्पातील वसतिगृह, शैक्षणिक इमारत, उपहारगृह, पाणी टाकी व फर्निचर इत्यादी कामे वेळेत पूर्ण होऊन प्रकल्प पूर्णत्वास येण्यास मदत होणार आहे. सदर प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात नवीन बांबू धोरणाची व्यापक अंमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षण व तांत्रिक मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीकोणातून तसेच बांबू क्षेत्रास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मस्यव्यवसाय मंत्री सुधीर मूनगंटीवार यांचा हा एक महत्वाचा प्रकल्प असून चिचपल्ली येथे 8 हेक्टर क्षेत्रामध्ये तो साकारण्यात येत आहे.

या निधी वितरणामुळे प्रकल्पाचे काम शीघ्रगतीने पूर्ण होऊन येत्या काही दिवसातच हा प्रकल्प बांबू क्षेत्रासाठी तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध कारागिरांना आणि युवक व युवतींना आधुनिक व तांत्रिक प्रशिक्षणाचे माध्यमातून रोजगाराचे दालन उपलब्ध करून देईल, असे बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक अविनाश कुमार यांनी सांगितले.