धरणगावात पाचवा सत्यशोधक विवाह उत्साहात संपन्न !.. सत्यशोधक सौ.ज्योती व हेमंत ज्ञानेश्वर माळी यांचा क्रांतिकारी निर्णय !.. सत्यशोधक विवाह ला उपस्थित मान्यवरांना ३०० वैचारिक ग्रंथ भेट !..

117

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगांव – धरणगाव शहराचे माजी नगराध्यक्ष, समाजभूषण, सहकार महर्षी स्व.डी एम माळी सर यांचे नातू तसेच शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचे आदर्श शिक्षक हेमंत ज्ञानेश्वर माळी व ज्योती माळी यांचे चि.चेतन व नांदगाव तालुक्यातील साकोरे गावाचे रहिवासी सौ. सुनिता व दिलीप उत्तम सुरसे यांची कन्या स्नेहल यांचा सत्यशोधक विवाह महात्मा फुले हायस्कूलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सत्यशोधक विवाह सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून शहरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता, पर्यावरण, क्रिडा, साहित्यीक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
खंडेरायाची तळी भरून सत्यशोधक विवाह सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. यानंतर सार्वजनिक सत्यधर्माची प्रार्थना सामूहिक रीतीने घेण्यात आली. सत्यशोधक विवाह स्थळी क्रांतीची मशाल वधू-वरांच्या शुभहस्ते पेटविण्यात आली यानंतर वर माता-पिता व वधू माता – पिता यांच्या शुभहस्ते महात्मा बळीराजा, संत शिरोमणी सावता महाराज, कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय, सत्यशोधक महात्मा जोतिराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे या महापुरुषांचे प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
राष्ट्रपिता जोतिराव फुले लिखित मंगलाष्टक झाल्यानंतर वधू-वरांनी सामूहिक सार्वजनिक सत्यधर्म प्रतिज्ञेची शपथ घेतली.या सत्यशोधक विवाहाचे वैशिष्ट्य म्हणजे आलेल्या प्रत्येक मान्यवराला सत्यशोधक समाज संघाने प्रकाशित केलेल्या ” सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टक सर्व पूजाविधी ” चे ३०० ग्रंथाचे वाटप करण्यात आले. यानंतर धरणगाव व एरंडोल तालुक्यातील सत्यशोधक विवाह लावणाऱ्या २० कुटुंबातील व्यक्तींचा सहपरिवार वैचारिक ग्रंथ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. यामध्ये धरणगाव शहरात पहिला सत्यशोधक विवाह २००३ ला संजय छगन महाजन, दुसरा २०१६ ला आबासाहेब राजेंद्र वाघ यांचा पुतण्या राहुल, तिसरा २०२२ ला लक्ष्मणराव प्रभाकर पाटील यांची भगिनी, चौथा २०२३ ला जगन्नाथ नथू पाटील यांचे चि. हेमंत आणि पाचवा २८ / ४ / २०२४ ला हेमंत माळी सर यांचे चि.चेतन यांचा सत्यशोधक विवाह थाटा – माटात संपन्न झाला.
उ.बा.ठा.शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ यांच्या हस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.सत्यशोधक विधीकर्ते भगवान रोकडे ( चाळीसगाव ), शिवदास महाजन ( एरंडोल ) यांनी राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले लिखित सार्वजनिक सत्यधर्म पद्धतीने सर्व विधी करण्यात आले. सत्यशोधक समाज संघाच्या कार्यकर्त्यांनी सौ ज्योती व हेमंत ज्ञानेश्वर माळी यांचा शाल गुलाबपुष्प व ग्रंथ देऊन सन्मान केला. या सत्यशोधक विवाह सोहळा यशस्वीतेसाठी सत्यशोधक समाज संघाचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. या ऐतिहासिक सोहळ्याचे प्रस्ताविक – सूत्रसंचलन पी डी पाटील, लक्ष्मणराव पाटील व आभार हेमंत माळी यांनी मानले.