✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(20 जुुुलै):-मध्यप्रदेशनंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडलं जाण्याची जोरदार चर्चा सुरू असून या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. सरकार पाडणं इतकं सोपं असतं का? असं सांगतानाच सरकार पाडणं इतकं सोपं असतं तर देशातील सर्व विरोधकांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार कधीच पाडलं असतं, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलेल्या एका मुलाखतीत ऑपरेशन लोटसवर भाष्य केलं होतं. तर संजय राऊत यांनीही ऑपरेशन लोटसवरून भाजपवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर सुधीर मुनंगटीवार यांनी ही टीका केली आहे. सरकार पडण्याची आघाडी सरकारच्या मनात एवढी भीती का आहे? असं कोणतंही सरकार पाडता येतं का? सरकार पाडणं एवढं सोप्पं असतं तर देशातील सर्व विरोधकांनी एकत्र येऊन २४ तास काहीही न खाता-पिता बैठकांवर बैठका घेऊन केंद्रातील मोदी सरकार एव्हाना पाडलं असतं, असा चिमटा मुनगंटीवार यांनी काढला आहे. तुमचं सरकार बहुमताचं सरकार आहे. मग कशाला एवढी भीती बाळगता, असा टोलाही त्यांनी हाणला आहे.

दरम्यान, काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले होते. महाविकास आघाडीमधील घटकांना सरकार पडणार असल्याची भीती वाटते. या भीतीमुळे त्यांना झोप येत नाही. सरकारमधील घटकांनी झोपेच्या गोळ्या घ्याव्यात. तुम्ही सरकार चालवा. अगदी निवांत सरकार चालवा. जोपर्यंत चालतं तोपर्यंत चालवा. आम्ही सरकार पाडणार नाही, असे पाटील म्हणाले होते.

नागपूर, महाराष्ट्र, राजकारण, राजनीति, विदर्भ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED