शेतीला जोडधंदा असणे काळाची गरज – आ.डॉ.गुट्टे

30

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.10एप्रिल);-नेहमी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहाता जोडधंदा किंवा जोड व्यवसाय केला पाहिजे. तेव्हाच त्यांच्या आर्थिक परिस्थितीत बदल होईल. जोडधंदा केल्याने पत सुध्दा वाढेल. त्यामुळे शेतीला जोडधंदा असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले.

गंगाखेड तालुक्यातील धारखेड येथे शिवशक्ती दुध संकलन केंद्र या नवीन फर्मचा शुभारंभ आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते झाला. तेव्हा उद्घाटक म्हणून ते बोलत होते.मराठवाडा हा कायम दुष्काळी भाग आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पशुपालन, कुकुटपालन, दुध संकलन यासह इतर व्यवसाय केल्यास त्यांची प्रगती निश्चित होईल.‌ जमिनीची पत आणि पाण्याची उपलब्धता पाहून शेती केली, तर उत्पन्न सुध्दा समाधानकारक होईल. त्यासाठी हवामान तज्ञ पंजाबराव डक यांच्या सारख्यांचा सल्ला विचारात घेतला पाहिजे, असेही आ.डॉ.गुट्टे म्हणाले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव चोरघडे, शिवशक्ती मंदीर संस्थानच्या अध्यक्षा सौ.गोकर्णा माऊली, प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख, कृ.उ.बा.समितीचे माजी सभापती बालासाहेब निरस, मित्रमंडळाचे विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, सरपंच ज्ञानेश्वर जाधव, राजेभाऊ (बापू) सातपुते, चेअरमन भारतराव जाधव, दासराव भोसले, दुध संकलन अधिकारी संदीप पाटील, प्रा.मुंजाजी चोरघडे, प्रा.डॉ. जयंत बोबडे, उद्धवराव चोरघडे, नवीन केंद्राचे चेअरमन बाळासाहेब चोरघडे, गोविंदराव चोरघडे, पूर्णा तालुका प्रसिद्धी प्रमुख दत्तराव पौळ, प्रगतशील शेतकरी विकास लंगोटे यांच्यासह शेतकरी बांधव व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.निसर्ग हाच गुरू असतो. म्हणून त्याला जपा.निसर्ग हाच खरा मार्गदर्शक आहे. हवामान अभ्यास किंवा अंदाज निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यास कळतो. प्रत्येक झाड, माती, बदल हवामानाचा अंदाज सांगतात. मात्र, त्या दृष्टीकोनातून पाहाता आले पाहिजे. कारण, निसर्ग हाच गुरू असतो. म्हणून त्याला जपा, असाही कानमंत्र प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी उपस्थितांना दिला.