संगत ही चांगल्याचीच हवी….!!

29

आपण लहापणापासून ऐकत आलोय, की वाईटापासून दूर रहावे; जे चांगले तेच करावे; आणि जे चांगले नाहीत त्यांची संगतही करू नये; वैगरे. मुळात असे सांगण्यामागे हेतू हा असतो की आपला पाल्ये चांगल्या संस्काराने परिपोषित होवून सोज्वळ व निकोप व्यक्तिमत्व घडावे. शाळेमध्येही अशीच शिकवण दिली जाते. घरचे कदाचित बाहेरच्यांची काळजी घेणार नाहीत; पण शाळेतल्या गुरुजींना सर्व समानच की! तरीसुद्धा सर्व मुले सारखीच घडत नाहीत. का असे घडते? इथे चुकते ती संगत. जसे विरजण दुधाचे दही करते, तसे हे वाईटाचे विरजण जागोजागी पसरलेले असते, अनेकजण दूषित करायला. पण आश्चर्य वाटते कधी जेव्हा सर्व परिसर, शिक्षण, संस्कार चांगले असताना एखादा दुष्ट निपजतो तेव्हा! नैतिकतेने भ्रष्ट झालेले कसे काय आपोआप घडतात? हा एक न सुटलेला प्रश्नच आहे.

पण सामान्य निरीक्षणावरून त्याचे एक कारण असे की मुळात हे स्वतःच दुष्ट होण्याचे विरजण असतात, ज्याला दुसऱ्याची त्याला कलंकित करण्यासाठी गरज पडत नाही. आपण त्यांना विक्षिप्त किंवा विकृत म्हणू शकतो. समाजासाठी खऱ्या अर्थाने हा वर्ग खूप हानिकारक असतो. कारण यांच्यामध्ये मोठ्या व्याप्तीने समाज दूषित करण्याची प्रचंड शक्ती असते. तेव्हा या प्रवृत्तीच्या लोकांची संगत आणि आपले त्यांच्याशी जोडलेले नाव नसणे हे सगळ्यात उत्तम. कारण चांगली माणसे जितक्या लवकर ओळखू येतात तितक्याच लवकर वाईटही कधी न कधी दृष्टीस पडणारच. मग या वाईटाशी तुम्हीही कधीकाळी जोडलेले होतात, म्हणून कशाला आपली विनाकारण बदनामी करून घ्यायची? जिथे तुम्ही शंभर आणे खरे सोने असताना.

मी केव्हापासून म्हणतोय की वाईट, दुष्ट, अनैतिक, विकृत वैगरे. याचा अर्थ कोण ही लोकं? म्हणजे ती पण माणसेच असतील की! वेगळी थोडी असणार ती! आपल्यातलीच ती. काही प्रत्यक्ष वाईट दिसणारी तर काही चांगुलपणाचा पडदा पांघरून आतून अत्यंत नीच वृत्तीची असणारी. यातपण बाहेरून एक व आतमध्ये एक हे तर सर्वात घातक. मुळात हे सर्व सांगण्याचा उद्देश हा की स्वतःतले चांगल्यातले चांगले शोधण्यासाठी व एक उत्तम दृष्टी निर्माण करून चांगले मोती आपल्याच व्यक्तिमत्त्वात रहावे यासाठी वाईटाची संगत व संबंध नकोच.

मग वाईट म्हणजे काय? जे चूक की बरोबर या सोप्या संज्ञेत साध्या बुद्धीला कळते ते वाईट. जसे खोटे बोलणारे वाईट; जसे फसवणूक करणारे वाईट, जसे इतरांना लुबाडणारे वाईट, जसे कोणाचेच न होवू शकणारे वाईट, जसे स्वतः च्या हव्यासाठी वाट्टेल त्याच्या मनाशी खेळणारे वाईट, जसे मी चांगला व सर्व वाईट म्हणणारे वाईट, जसे नात्याला पैशात तोलणारे वाईट, जसे हवी तेव्हा आपली मर्जी बदलणारे वाईट. असे बरेचजण!

म्हणून चांगल्याची संगत करा, वाईटाची नको. कोणी तुम्हाला चांगले म्हणत असतील, पण वाईट कोणी तोंडावर म्हणत नाही. याचा अर्थ आपण शंभर टक्के चांगले होत नसतो, याचा अर्थ तुम्हालाही स्वतःचे व्यक्तिमत्व माहीत नाही असाही नाही, याचा अर्थ तुमचे कर्म कोणालाच माहिती नाही असाही नाही; याचा अर्थ स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःचे तत्त्व व महत्त्व तुम्ही वेशीला टांगले नसतील असाही नाही? बरेच अर्थ व तर्क त्यांच्यात असावेत इतकी ती घाणेरडी व्यक्ती मोठी नसते. पण एवढे नक्की की जो समाजात फारच दुष्ट, घाणेरडा व अनैतिक असतो त्यापेक्षा त्याच्यासोबत राहणाऱ्या माणसांना लोकं जास्त बोलून दाखवतात. कारण ते लोकांना बोलायला सोपे व मऊ असतात. तेव्हा आपण काहीही केलेले नसताना अनैतिक लोकांसोबत आपले नाव जोडून विनाकारण बदनाम होण्यात काही अर्थ नाही. तेव्हा आशा विक्षिप्त व अनिश्चित लोकांपासून चार पावुले दूरच बरे, नाही का!

कित्येक मिळतील माणसे माणसासारखी

अनेक वळणावरती

निवडताना चोखंदळ असावे

ज्यांना चांगले समजायचो आपण

तेच जर निघत असतील खालच्या स्तरातले

तेव्हा माणसे कोणती व जनावरे कोणती

हा फरक करत बसण्यापेक्षा

संगत निवडा चांगली

नको भलीमोठी पंगत

जे चांगले ते संग

अन् जितकी होती वाईट

ते आजपासून जरा दूरच

कारण दिसले त्यांचे ‘ बेशरम ‘ रंग!!

✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती(नांदेड)मो:-8806721206