आल्याची साठी पार, सोन्याच्या तोळ्याची बरोबरी-५०० किलोला 65 ते 55 हजार रुपये-शेतकऱ्यांत समाधान

27

✒️सातारा-खटाव(नितीन राजे)मो:-9822800812

खटाव(दि.11मे):-उत्पादनात झालेली घट आणि बाजारात वाढलेली मागणी यामुळे गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत आल्याला यंदा सर्वाधिक दर मिळत आहे. आले पिकाच्या प्रति गाडीस (५०० किलो) मालाच्या प्रतवारी नुसार ५५ ते ६५ हजार रुपये दर मिळत असल्याने आले उत्पादक शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

गेली चार वर्षे आले पिकाच्या दरात कायम घसरण होत होती. त्यामुळे आले उत्पादकांना सलग चार वर्षे मोठा आर्थिक फटका बसला. चार वर्षाच्या या कालावधीत शेतकरी चांगला नफा मिळेल या आशेने आले पिकासाठी लाखो रुपयांचा भांडवली खर्च करत होते. मात्र बाजारात योग्य दर मिळत नसल्याने आले पीक आतबट्ट्याच ठरत होत. परंतू गेल्या महिन्यापासून आल्याच्या दरात भरघोस सुधारणा झाल्याने अडचणीत आलेल्या आले उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.

दरम्यान, एखाद्या पिकाला उच्चांकी दर मिळू लागला की काही अनधिकृत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होण्याच्या घटना वाढतात. सध्या आल्याच्या गाडीला उच्चांकी ६० हजार रुपये दर मिळत आहे. प्रति एकर सरासरी पंधरा ते वीस गाड्यांचा उतार धरला तरी व्यवहाराची रक्कम जवळपास १० ते १२ लाखांच्या घरात जाते. परिणामी आले खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. त्यामुळे आले उत्पादक शेतकऱ्यांनी ज्या व्यापाऱ्यांचे बाजारपेठेतील दैनंदिन व्यवहार चोख असतील आणि जे बाजार समिती व पणन संचलनालयाचे नोंदनोंदणीकृत व्यापारी असतील अशाच खात्रीशीर व्यापाऱ्यांना आल्याची विक्री करणे आवश्यक आहे. जेणेकरून संभाव्य फसवणूक टाळली जाईल.

सध्या उच्च दर्जाच्या आल्याची परदेशात मागणी वाढली आहे. मागच्या वर्षी भारतातून मसाल्याची जेवढी निर्यात झाली, त्यात आल्याचा समावेश जास्त होता. आल्यापासून तयार होणारी सुंठदेखील बाजारात रूबाब दाखवत आहे. देशातील जवळपास सर्व मोठ्या शहरांतील बाजारपेठांमध्ये आल्याची मागणी कायम आहे. त्यामुळे भविष्यात आले शेती आणखी फायदेशीर ठरेल असे आले व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
———-
*संयम आणि शेती ची सांगड म्हणजे उत्कृष्ट शेतकरी* “आले, म्हणजे आले तर आले नाही तर गेले. ही म्हण पूर्वीपासून प्रचलित आहे.सन २०१२ नंतर प्रथमच आल्याच्या दराने यंदा ६० हजारांचा टप्पा पार केला आहे.औषधी आणि मसालेदार पदार्थ म्हणून आले पिकाकडे पाहिले जाते.- प्रगतशील शेतकरी प्रकाश जाधव पुसेगाव