एकमेकांना भेटा, विचारपूस करा, त्याशिवाय काही खरं नाही..

29

पूर्वी गाव छोटं, घर छोटं, घरात वस्तू कमी, पैसा कमी….
त्याच्यामुळे हमखास तंगी, उसनंपासनं केल्याशिवाय प्रपंच होऊच शकत नव्हता, तरीही मजा खूप होती! उसनंपासनं करावंच लागायचं. साखर, चहा-पत्ती, गोडेतेल, कणिक या गोष्टी गल्लीत एकमेकांना उसणे मागणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच होता. त्यामुळे कोणाकडे हात पसरणे म्हणजे काहीतरी गैर आहे, असं आम्हाला कधी वाटलंच नाही. उलट या गोष्टींची इतकी सवय होती की कोणत्याच गोष्टीचा कमीपणा वाटत नव्हता!

डोकं दुखल्यावर शेजाऱ्याकडे अमृतांजनचं एक बोटं उसनं मागायलासुद्धा अजिबात लाज वाटली नाही, घरातल्या वडीलधाऱ्या माणसांसाठी १० पैशाचा तंबाखूचा तोटा आणतानाही मान कशी ताठ असायची! कोणतीच गोष्ट कोणापासून लपून राहातही नव्हती आणि तसा प्रयत्नही फारसा कोणी करत नव्हतं.गल्लीत एखाद्या पोरीला पाह पाहायला येणार, ही बातमी लपून राहूच शकत नव्हती. कारण शेजारीपाजारी पोह्याच्या प्लेट गादीचे तक्के, बेडशीट, चमचे, कान असलेले कप आदी साहित्य मागून आणल्याशिवाय पोरगी दाखवायचा कार्यक्रम होऊच शकत नव्हता.

आणि मित्रहो, हीच खरी श्रीमंती होती, ते आत्ता कळतंय! आणि हल्ली शेजाऱ्याच्या मुलीचं लग्न होऊन जातं तरीही कळत नाही! जेव्हा States वर डान्सचा व्हिडिओ येतो तेव्हा कळतं, अरे लग्न झालं वाटतं.हे सगळं लिहिण्यामागचा एकच उद्देश आहे… भेटत राहा, बोलत राहा, जाणे-येणे ठेवा, विचारपूस करा, जेवलास का, झोपलास का, काही दुखतंय का, असे प्रश्न विचारताना लागलेला मायेचा, काळजीचा, आपुलकीचा कोमल स्वरच जगण्याचं बळ देत असतो !माणसांशिवाय, गाठीभेटींशिवाय, संवादाशिवाय काही खरं नाही..!

✒️ओमराजे कांबीलकर(मो:-8888522282)