चिमूर नको तर पुर्विचा ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघच हवा-अर्हेर-नवरगाव, पिंपळगाव परिसरातील मतदारांची मागणी

8

🔸चिमूर विधानसभा क्षेत्रातील अर्हेर-नवरगाव, पिंपळगाव यांना सावत्रपणाची वागणूक

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.28 मे ):- चिमूर विधानसभा मतदारसंघ – 74 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, 2008 नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनुसार, चिमूर मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर व नागभीड ही तालुके आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील अर्हेर- नवरगांव महसूल मंडळ यांचा समावेश करण्यात आला. तसेच ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ 73 हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी एक आहे.

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, 2008 नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनुसार, ब्रम्हपुरी मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील सावली व सिंदेवाही ही दोन तालुके आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी, ब्रह्मपुरी ही महसूल मंडळे व ब्रह्मपुरी नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो. ब्रम्हपुरी व चिमूर विधानसभा मतदारसंघ हे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतात. 2008 मधील परिसीमन आयोगाच्या मतदारसंघ पुनर्रचनेनुसार पूर्वी ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात असलेली अर्हेर-नवरगाव, पिंपळगाव, भालेश्वर, नांदगाव (जाणी), सोंद्री, सुरबोडी व इतर काही गावे चिमूर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आली. परंतु ही गावे चिमूर पासून दूर अंतरावर आहेत.

साहजिकच लोकप्रतिनिधी तालुक्याच्या ठिकाणीच जास्त राहणे पसंद करतात. त्यामुळे नागरिकांना आपल्या समस्या मांडताच येत नाही.आमदारही या मतदार संघातील टोकावरील गावांकडे जास्त फिरकत नाहीत. याचा नाहक त्रास जनतेला होत आहे. त्यामुळे परिसरातील बहुतेक कामे खोळंबली आहेत. शेतकरी, बेरोजगार,महिला यांना पाहिजे तो न्याय चिमूर क्षेत्रातील आमदाराकडून मिळत नाही. तशी तसदीही विद्यमान आमदार यांचेकडून घेण्यात आली नाही . त्यामुळे परिसरातील नागरिकात सावत्रपणाची वागणुक मिळत असल्याची भावना निर्माण झाली आहे.

ब्रम्हपुरी अवघ्या पाच-सहा किलोमीटर अंतरावर असल्याने पूर्वी कामे लवकर तडीस जात होती. कोरोना सारखी घातक महामारी आली असताना सुद्धा चिमूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांचे अर्हेर-नवरगाव, पिंपळगाव परिसरात मदतीचे हात लाभलेच नाही किंवा त्यांच्याकडून साधी विचारपूसपण करण्यात आली नाही. चिमूर या मतदारसंघाचे आमदार असून सुद्धा नसल्याचे चित्र दिसून येत आहे. भविष्यात कोणत्याही प्रकारचा नाहक त्रासाला सामोरे जावे लागू नये म्हणून पुर्वरत अर्हेर-नवरगाव, पिंपळगाव, भालेश्वर, नांदगाव (जाणी), सोंद्री, सुरबोडी व इतर ब्रम्हपुरी तालुक्यातील गांवांना ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ 73 येथे समावेश करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.