वादग्रस्त अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्याने बार्टीत’डान्स हंगामा

60

🔹निबंधक इंदिरा अस्वार यांची विभागीय चौकशी थंडबस्त्यात-अनेक प्रकरणेही फाइल बंद

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.4जून):- येरवडा येथील समतादूताच्या प्रशिक्षणामध्ये डान्स हंगामा आणि नाचगाण्यांचा तमाशा झाल्यानंतर बार्टीत काही आलबेल नसल्याचे दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पायमल्ली करण्याची सुपारीच काही अधिकाऱ्यांनी घेतल्याचे दिसून येते. तर सरकारमधील काही मंत्र्यांचाही यात हात असून सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी बार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेक प्रकरणात कारवाईस पात्र असलेल्या वादग्रस्त इंदिरा अस्वार यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्तावही थंडबस्त्यात आहे. ही चौकशी होऊ नये याकरिता मोठी देवाण-घेवाण झाल्याची चर्चा आहे.

पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून विविध विकासाच्या योजना राबविण्यात येत आहेत. यातून समाजाचा बऱ्यापैकी विकास होण्याची शक्यता असतानाच बार्टीला मूळासह संपविण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून होत आहे. डॉ. बाबासाहे आंबेडकर यांचे समतेचे विचार गावागावांत पोहोचविण्यासाठी चांगल्या अधिकाऱ्यांची गरज असते.

मात्र, दोन महासंचालकांची नियुक्ती सोडली तर उर्वरित महासंचालकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी काही देणे-घेणे नसल्याचे दिसून आले. जे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे दोन अधिकारी आले. त्यांना जातीयवादी मानसिकतेच्या अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी विविध आरोप करून ‘सळो की पळो’ करून सोडले. त्यात एकाही महासंचालकांचा कार्यकाळ पूर्ण करू दिला नाही. बौद्ध महासंचालकांना पदावरून हटविण्यासाठी बार्टीतील अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागातील अधिकारी कंबर कसून असतात. त्यामुळेच बार्टीत त्यांना कार्यकाळ पूर्ण करता येत नाही. बौद्धेत्तर महासंचालकांना कोणतेही आरोप न करता त्यांचा कार्यकाळ पूर्ण होतो. त्यामुळे बार्टीत सत्ता प्रस्थापित करणारी टोळी येथे असल्याचे दिसून येते. डॉ. बाबासाहेब आंबेकरांच्या नावाने असलेल्या बार्टीला बदनाम करून तिला बंद करण्याचा घाट बार्टीमधील काही अधिकारी करीत आहेत. त्याला सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी दिनेश डिंगळे सहकार्य करीत असल्याचे दिसून येते.

*वादग्रस्त निबंधक इंदिरा अस्वार विभागीय चौकशी कधी?*
बार्टीमधील निबंधक इंदिरा अस्वार यांच्यामुळे बार्टीची मोठी बदनामी होत असल्याचे दिसून येते. स्वतःला सुरक्षित करण्यासाठी समाजातील लोकांना मोर्चे आणि दवाबतंत्र वापरून कारवाई टाळणे, असे प्रकार केले. त्यांच्याविरोधात कारवाई केल्यानंतर मॅटमध्ये जाऊन पद वाचविले. मात्र, या प्रकरणामुळे बार्टीची मोठी बदनामी झाली आहे. त्यांनी केलेल्या गैरकारभाराची विभागीय चौकशीचे प्रकरण सामाजिक न्याय विभागातून मुख्यमंत्र्यांकडे गेले आहे. त्यावर सही होताना दिसून येत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून येरवडा येथील कार्यशाळेत “डान्स हंगामा” करण्याचे षडयंत्र घडवून आणल्याचे दिसून येते. त्यांची पदमुक्ती करण्याची मागणी अनेक दिवसांपासून असून सचिव हे निबंधकांना घाबरत असल्याचे दिसून येते. या प्रकरणात मात्र, बार्टीची पत गेल्याची चर्चा आहे.

*नसरीन तांबोळीला पुन्हा कामावर घेतले*
समतादूत प्रकल्पातील नसरीन तांबोळी यांना कामचुकार असल्याचे सांगून माजी महासंचालकाने काढून टाकले होते. मात्र, नवीन महासंचालक वारे आल्यानंतर तिला पुन्हा रुजू करून घेण्यात आले. निबंधक अस्वार यांनी महासंचालक वारे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही विशिष्ट समाजाच्या कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार सुरू केला आहे. आंबेडकरी विचारधारा घरोघरी पोहोचविण्याचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कामावरून काढून टाकणे, काम न देणे इत्यादी प्रकार येथे होत आहेत.

*दिनेश डिंगळेने उचलला बार्टी संपविण्याचा विडा*
सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे यांनी बार्टीला संपविण्याचा विडा उचलला आहे. सचिव सुमंत भांगे यांना बदनाम करून स्वतःची पोळी शेकून घेण्याचा त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. बार्टीतील डान्स हंगामा प्रकरणात सचिव सुमंत भांगे यांची कोणतीही भूमिका नसताना त्यांना पदावरून हटविण्यासाठी त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. डान्स हंगामा प्रकरणाचे खापर सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्यावर फोडण्यात आले. निबंधक इंदिरा अस्वार यांना पाठबळ देऊन दिनेश डिंगळे हे कृत्य करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इंदिरा अस्वार पदमुक्ती प्रकरणात मवाळ भूमिका घेत त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे विभागाची चौकशीची फाइलसुद्धा थातूरमातूर करून मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आली आहे.

*सचिव सुमंत भांगे यांची भूमिकाही ‘नरो वा कुंजरो वा’*
सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी सामाजिक न्याय विभागासाठी चांगले काम केले आहे. मात्र, त्यांची भूमिका नेहमी ‘नरो वा कुंजरो वा’ राहिली आहे. अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे प्रकार त्यांच्याकडून होत आहे. निबंधक इंदिरा अस्वार पदमुक्ती आणि विभागीय चौकशी प्रकरणातही त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. परिणामी डान्स हंगामा प्रकरण त्यांच्यावर शेकविण्यात आले. डान्स हंगामा प्रकरणात त्यांचाच हात असल्याचे सांगून बार्टीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना बदनाम केले. तरीही ते शांत असून ते कारवाई करतील काय? असा सवाल त्यांना विचारण्यात येत आहे.