राष्ट्र सेवा दलाची आज सर्वात जास्त गरज

29

आज (4 जून) राष्ट्र सेवा दलाचा वर्धापनदिन. आजूबाजूचे वातावरण बघुन सेवा दल वाढण्याची शाखा सुरू होण्याची आज सर्वात मोठी गरज वाटते. आजूबाजूचे धार्मिक, जातीय तेढ वाढणाऱ्या काळात सेवादल हेच उत्तर आहे, हा एक भाग झाला पण आजच्या चंगळवादी, आत्ममग्न होत चाललेल्या समाजात सामाजिक भान, साधेपणा आणि संवेदनशीलता वाढण्यासाठी सेवा दलाचा प्रसार होणे हाच मार्ग वाटतो.

राजकारणाचा रोज घसरत चाललेला स्तर बघता सेवा दलाने राजकारणाला दिलेले साने गुरुजीपासून मधू दंडवते यांचेपर्यंत गाजलेली नावे आणि सामान्य कार्यकर्ते आठवतात. त्यांचे प्रामाणिक जगणे आठवते आणि राजकारणाच्या शुद्धीकरणासाठीही सेवा दल मार्गेच कार्यकर्ते राजकारणात जायला हवेत असे वाटते…

सेवा दलाची सर्वात मोठी गरज मला लहान मुलांसाठी वाटते. मध्यमवर्गीय कुटुंबात आज एक किंवा दोन लहान मुले आहेत. पैसा आहे पण त्या पैशाने अधिक सुखे विकत घेणे फक्त सुरू आहे. त्यातून टिव्ही, मोबाईल, टॅब. यातून ही मुले विचार शक्ती गमावत आहेत. आत्मकेंद्रित होत आहेत. या पिढीला विचारशील, आरोग्यवान आणि समाजाभिमुख बनवणे हेच आज मोठे आव्हान आहे. मित्रांनी केलेले मित्रांचे खून, मोबाईल दिला नाही म्हणून भावाने बहिणीचा केलेला खून, बेफाम गाड्या चालवत केलेले अपघात, कमी वयात शाळकरी मुलांचे येणारे शारीरिक संबंध, या वयातली प्रेमप्रकरणे, पोर्न बघणे यातून वेगळेच गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. तेव्हा या वयातील मुला मुलींशी संवाद करण्यासाठी त्यांना मैदानावर नेण्यासाठी, सामाजिक बनवण्यासाठी सेवा दल शाखा हाच आणि हाच एकमेव पर्याय आहे.

WhatsApp University जे तरुणाईला भडकवत आहे ते बघता या शाखेतून लोकशाही मूल्ये पोहोचू शकतात. पण असे असले तरीही दुर्दैवाने आज शाखा खूप कमी कमी होत आहेत. तेव्हा किमान साप्ताहिक शाखा तरी गावोगाव सुरू करायला हव्यात. मुला मुलींशी त्यातून संवाद वाढेल.

खूप तात्विक बडबड करून (माझ्यासकट) फार काही हाती लागणार नाही तर नव्या पिढीवर काम केले तरच काही बदलू शकेल. ते काम दीर्घकालीन आहे. त्याला लगेच फेसबुक सारखे like, comment मिळू शकणार नाही. आपण जिथे राहतो तिथे किमान साप्ताहिक (शनिवार, रविवार) शाखा सुरू करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा.

मोठ्या वयाच्या व्यक्तींनी आठवड्यातून एक दिवस एकत्र येवून अभ्यासमंडळ चालवणे महत्वाचे आहे, कारण या वेगवान स्थितीत गावातील सगळे समविचारी लोक एकमेकाला भेटत सुध्दा नाहीत अशी स्थिती आहे.

सेवा दलातील वातावरण मधल्या काही घटनांनी झाकोळले होते पण अशा साप्ताहिक शाखा व अभ्यास मंडळ यामुळे नवी ऊर्जा निर्माण होईल. शेवटी काम हेच महत्वाचे आहे.

खूप फिरल्यावर मला वाटते की लेखन,भाषण यापेक्षा हे सातत्याने लहान मुले, तरुणाई यांच्याशी संवाद करणे हाच बदलाचा रस्ता आहे. आणि तो रस्ता १९४१ पासून बनला आहे आपण त्यावर पुन्हा एकदा चालण्याची फक्त आवश्यकता आहे…

✒️हेरंब कुलकर्णी(मो:-8208589195)