जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या 200 ग्रामपंचायत सदस्यांना दणका; बीड प्रशासनाची अपात्रतेची कारवाई

18

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.8जून):- जिल्ह्यातील तब्बल 200 ग्रामपंचायत सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात येणार आहे. बीड जिल्हा प्रशासनाने (beed district administration) या कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्या आधी छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,198 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. आता बीड जिल्ह्यातील सदस्यांनाही (beed grampanchayat member disqualified) दणका बसणार आहे.

बीड जिल्ह्यामध्ये 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गातून निवडून आलेल्या 200 ग्रामपंचायत सदस्यांनी आतापर्यंत तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाला जात वैधता प्रमाणपत्र सादर केलं नाही. त्यामुळे या सदस्यांवर अपात्र करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात येणार आहे.

ही निवडणूक झाल्यानंतर आरक्षित वार्डाचा निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी सहा महिन्याच्या आत आपले जात वैधता प्रमाणपत्र निवडणूक विभागाकडे सादर करणे बंधनकारक होतं. त्यानंतर मात्र एक वर्षाची मुभा वाढवून देण्यात आली होती. तरी देखील बीड जिल्ह्यातील 200 ग्रामपंचायत सदस्यांनी आपले जात प्रमाणपत्र निवडणूक विभागाकडे सादर केलं नाही. त्यांच्यावर आता अपात्रतेची कारवाई करण्यात येणार आहे.