चिमूरचा आठवडी बाजार लोकांच्या गैरसोयीचा!

51

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.9जून):-चिमूर जि.चंद्रपूर येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार भरतो. हा बाजार पूर्वी मुख्य रस्त्यावर जुना बस स्टाॅपपासून नवीन बस स्टाॅपपर्यंत भरत होता. जवळपास एक ते दोन किलोमीटरच्या परिसरात मुख्य रस्त्याच्या एका बाजूला बाजार भरत असे. त्यामुळे एका बाजूनेच वाहनांची दर शुक्रवारी बाजाराच्या दिवशी ये-जा सुरू असायची व वाहतुकीला अडचण होत असे.

त्यानंतर मुख्य रस्त्यावर काम सुरू असल्याचे सांगून सुस्थितीत असलेला रस्ता उखळून ठेवण्यात आला, त्यामुळे बाजार भरविण्याची अडचण निर्माण झाली. बाजाराला दुसरी जागा नसल्यामुळे लोक दुकाने मुख्य रस्त्यावरच्या लावत होती. ही दुकाने तिथे लावण्याचा नगर परिषद चिमूर प्रशासनाने मज्ज्वाव केला होता. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. चिमूरच्या प्रशासनाने तसेच स्थानिक पुढाऱ्यांना घेवून बैठक घेवून तोडगा काढला व बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नेण्यात आला. परंतु इथेही हा बाजार एका बाजूला असल्यामुळे जनतेची गैरसोयच होत आहे.

नवीन ठिकाणी बाजार भरविण्यासाठी लोणकर पेट्रोल पंपाजवळ जागा घेण्यात आल्याचे कळते. परंतु लोकवस्तीच्या बाहेरच ह्या बाजाराची जागा आहे .त्यामुळे गावाच्या एकाच बाजूला हा बाजार पडतो. एकटी महिला येथील बाजारात पायदळ जावून भाजीपाला आणू शकत नाही तसेच सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत असलेल्या बाजारातूनही एकटी महिला जावून भाजीपाला आणू शकत नाही. त्यामुळे दोन्ही बाजाराच्या जागा खूपच गैरसोयीच्या पडतात. चिमूर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे संपूर्ण तालुक्यातील लोक या बाजारात येतात तर वर्धा जिल्हयातूनही काही विक्रेते इथे फळे व भाजीपाला विक्रीसाठी आणतात. चिमूरच्या बाजारासाठी योग्य जागा निवडावी अशी जनतेची मागणी आहे.

चिमूरच्या उमा नदीजवळ मासळ रोड चौकाच्या पुढे जागा आहे. ही बाजाराला योग्य होवू शकते तसेच नेहरू वार्डात बानकर यांचे घरासमोर असलेली व चिंचेचे झाडे असलेली कामडी यांची जागा विकत घेतली तर ही बाजारासाठी योग्य होवू शकते. बाजार भरविण्यासाठी ही दोन ठिकाणी पर्याय म्हणून आहेत, बाजाराची जागा ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आमदार भांगाडीया व नगर परिषद प्रशासन कुठले पाऊल उचलतात याकडे जनतेचे लक्ष केंद्रित झाले आहे.