शिबिरामुळेच शेवटच्या घरापर्यंत शासकीय योजनांचा लाभ : आ धर्मराव बाबा आत्राम

38

🔹सिरकोंडा येथे महाराजस्व अभियान संपन्न

🔸भर पावसातही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

✒️सिरोंचा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

सिरोंचा(दि. 23 जून):- ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत राज्य शासनाने महाराजस्व अभियान शिबिर घेण्याचे ठरविले आहे. या शिबिरामुळेच शेवटच्या घरापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचत असल्याचे प्रतिपादन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले आहे. सिरोंचा तालुक्यातील सिरकोंडा येथे आयोजित महाराजस्व अभियानाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी शिबिराचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार जितेंद्र शिकतोडे,प्रमुख पाहुणे म्हणून येथील सरपंच लक्ष्मण गावडे,उपसरपंच मुल्ला गावडे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल पटले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोहर कन्नाके,आरोग्य अधिकारी डॉ सचिन मडावी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, मदनय्या मादेशी तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आ धर्मराव बाबा आत्राम यांनी या शिबिराच्या माध्यमातून विविध विभाग एकत्र येऊन नागरिकांना लोककल्याणकारी योजनांचा लाभ देण्याचा काम हाती घेतला आहे. शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य असून गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल भागात अशा शिबिरांची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.विशेष म्हणजे अहेरी उपविभागातील पाचही तालुके आदिवासीबहुल असून या भागातील आदिवासी बांधवांना नेहमीच तालुका मुख्यालयात जाऊन विविध दाखले काढणे शक्य होत नाही.लोककल्याणकारी मोठ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आदिवासी बांधव अवश्य हजेरी ठरवलेल्या ठिकाणी येत असलेतरी अधिवास प्रमाणपत्र, जातीचे दाखले,वन पट्टे अश्या कामांसाठी आदिवासी बांधवांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.या शिबिराच्या माध्यमातून त्यांना मोठा फायदा झाल्याचेही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

सिरोंचा तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या सिरकोंडा गावात महसूल विभागाकडून महाराजस्व अभियान शिबीर घेण्यात आले.शिबिरात परिसरातील नागरिकांची एकच गर्दी बघायला मिळाली. विशेष म्हणजे भर पावसातही नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. या शिबिरात विविध विभागाकडून परिसरातील नागरिकांना लोक कल्याणकारी योजनांचा लाभ तसेच विविध दाखले वाटप करण्यात आले.यावेळी सिरकोंडा परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.