भंडारा येथील तत्कालीन उपविभागीय अधिकारी व दोन तहसीलदार यांना केले तडकाफडकी निलंबित

141

🔺पोलिस पाटिल आणि कोतवाल भरती भ्रष्टाचार प्रकरण

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि. 29 जून):-भंडारा येथे मे महिन्यात पोलीस पाटील आणि कोतवाल भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. मात्र या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या आरोप परीक्षार्थीनी केला होता.
परीक्षेदरम्यान पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला होता. मोठा घोळ झाल्याची बाब समोर आली होती. परीक्षेत अनियमितता, गैरप्रकार करून भरती प्रक्रिया झाल्याने प्रामाणिक, अभ्यासू व मेहनती उमेदवारांचे नुकसान झाल्याचे सर्वत्र चर्चा रंगली होती.

त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. दोषींवर कारवाई करण्यासाठी विविध सामाजिक संघटनाकडून व परीक्षार्थीकडून, चौकशीची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केल्यानंतर सचिवांनी यात भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांसह भंडाराचे तहसीलदार आणि पवणीच्या तहसीलदारांवर निलंबनाचे आदेश दिले.

या कारवाईनी प्रशासकीय यंत्रणेत कमालीची खळबळ उडाली आहे. कारवाई करण्यात आलेल्यामध्ये भंडाऱ्याचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, (सध्या उपजिल्हाधिकारी (रोहयो) पालघर) , भंडाऱ्याचे तहसीलदार अरविंद हिंगे, (सध्या भंडारा येथे कार्यरत) व पवनीच्या नीलिमा रंगारी (सध्या तहसीलदार, सिंदेवाही, चंद्रपूर) या तिघांवर निलंबनाची कारवाई तडकाफडकी करण्यात आली.