कुणाची सत्ता आणि कुणाची गोची?

47

अजित पवार भाजपात सामील झाले याचे वाईट वाटले नाही. ते कधीतरी होणारच होतं. पण गेल्या 9 वर्षांपासून प्रत्येक स्तरावर खस्ता खाऊन या महाराष्ट्रातील सामान्य माणूस भाजपच्या विरोधात जाण्यास सुरुवात झाली होती. भाजपच्या अंतर्गत सर्व्हे मध्येसुद्धा भाजपची महाराष्ट्रात पीछेहाट होणार असे निकाल आले होते. महत्प्रयासाने विरोधी पक्षांच्या एकजुटीला सुरुवात झाली होती. आणि अशा भाजपसाठी महाराष्ट्रात अत्यंत कठीण काळ सुरू असताना अजित पवार यांच्या मदतीला धावून गेलेत. त्यामागील कारणे काहीही असोत. त्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठे ओबीसी नेते म्हणवल्या जाणारे छगन भुजबळ गेले आणि ते सुद्धा ओबीसी आरक्षण संपविणाऱ्यांच्या पक्षात हे त्याहून वाईट. त्यातसुद्धा प्रवेश झाल्यानंतर भुजबळांनी ट्विट केलं की “या पदाच्या माध्यमातून काम करताना ओबीसींचे हित कायम सर्वोच्च स्थानी राहील.” हे भारीच आहे. त्यात अजित पवारांसोबत गेलेले काही प्रखर पुरोगामी मांडणी करणारे आमदार पुढील सभांमध्ये कोणता सूर आवळतात याची उत्सुकता आहेच.

दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे सरकारकडे पुरेसे संख्याबळ असतांना त्यांना ह्या येणाऱ्या 30-40 आमदारांची इतकी गरज का भासावी? ती सुद्धा अशावेळी जेव्हा महाराष्ट्रातील सत्ता बदलाच्या खटल्यात सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षावर जबाबदारी टाकलेली आहे. विधानसभेचे सभापती मिलिंद नार्वेकर यांनी पत्रकार परिषदेत लवकरच व योग्य निर्णय घेणार असे सांगितले आहे. यावरून असाही अर्थ निघू शकतो की उद्या चालून शिंदेगटाचे 16 किंवा अधिक आमदार जर निलंबित झाले तर संख्याबळाच्या अभावी राज्य सरकार कोसळू नये याची ही तयारी असावी. किंवा खुद्द एकनाथ शिंदेंनाच अपात्र ठरवू शकतात. यातून असाही निष्कर्ष निघू शकतो की येणाऱ्या काळात शिंदे गटाचे काही आमदार निश्चितच निलंबित होणार आहेत. संपूर्ण शिंदेगटाला दबावात आणणाऱ्या भाजपला एकट्या विधानसभा सभापतीवर दबाव आणणे मोठी गोष्ट नाही. अजित पवार गट सोबत घेऊन भाजपद्वारे शिंदे गटाची बार्गेनिंग पावरच संपुष्टात आणण्याची ही खेळीसुद्धा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिंदे गटाकडून भाजपला मतांचा काही फायदा होण्याची शक्यता नगण्य आहे. उलट शिंदे गटातील आमदारांना भाजपचा फायदा होऊ शकतो.

काहीच दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आणि त्या गोष्टीला 15 दिवस पण पूर्ण होत नाहीत तर त्याच राष्ट्रवादी ला सोबत घेऊन ज्या राष्ट्रवादी च्या नेत्यावर मुख्य भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्याच नेत्याला उपमुख्यमंत्री पदाची शपथ देऊन त्याच्या 9 सहकाऱ्यांना मंत्रिपद दिलीत. इकडे अजित पवार यांनी भाजपाशी युती झाल्याची बातमी माध्यमांमध्ये झळकली आणि तिकडे सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीसांचा एबीपी माझा वाहिनीवरील तो व्हिडीओ व्हायरल झाला ज्यामध्ये ते सांगत आहेत की, “राष्ट्रवादी सोबत कोणत्याही परिस्थितीत युती नाही म्हणजे नाही, एकदा रिकामे राहू, सत्तेशीवाय राहू पण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती नाही म्हणजे नाही. ” पण आता देशातल्या नागरिकांना पण ह्या नेत्यांच्या बोलण्या आणि वागण्यातल्या तफावतीची सवय झाली आहे.

आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार यासाठीच थांबवून ठेवण्यात आला होता की काय? अशी शंका घ्यायला जागा आहे. शिंदे गटातील अनेक आमदार गुवाहाटी करार झाल्यापासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत होते. पण प्रत्यक्षात विस्तार मात्र अजित पवार आणि त्यांच्या गटाचाच होऊन बसला. तोसुद्धा एकाच दिवसात.शिंदे गटाची मात्र येणाऱ्या काळात गोची होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण आधीच भाजप-शिंदे गटात विधानसभा व लोकसभा जागांच्या वाटपाबाबत कुरबुरी सुरू असताना त्यात आता अजित पवार गटाची भर पडली आहे. जितके आमदार अजित पवारांसोबत आलेत त्यांना किमान पुन्हा तिकिटाचे आश्वासन तरी नक्कीच दिलेले असेल, त्यामुळे शिंदे गटाला आता नेमक्या किती आणि कोणत्या जागा दिल्या जातात हेसुद्धा पाहण्यासारखे असेल. त्यात राष्ट्रवादी चे अजित पवार काम करू देत नव्हते, राष्ट्रवादीशी युतीमुळे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले अशी कारणे सांगून शिवसेनेतून फुटलेल्या शिंदेंना शेवटी त्याच पवारांसोबत सत्तेचा उपभोग घ्यायचा आहे. त्यात आता फडणवीस जास्त काळ उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानतील हे शक्य वाटत नाही.

या संपूर्ण प्रकरणात माजी राज्यपाल कोशियारी असते तर ते अतिशय आनंदित झाले असते, कारण त्यांच्या उपस्थितीत अपूर्ण राहिलेले कार्य काल त्यांच्या अनुपस्थितीत पूर्ण झाले.सत्तेसाठी काहीही हे सूत्र पाळत भाजपची वाटचाल सुरू आहे. सत्ता प्राप्त करण्यासाठी त्यांचे प्रखर हिंदुत्व, धर्मप्रेम, प्रतिगामीत्व ह्या गोष्टी कायम दुय्यम असतात हे वेळोवेळी सिद्ध करूनदेखील लोकांना त्या खऱ्या वाटत नाहीत ही कमाल आहे. सत्तेच्या या राजकारणात राजकारण्यांकडून कायमच जनतेला मूर्ख समजल्या गेलंय आणि जनतेने सुद्धा बहुतांशवेळी राजकारण्यांची समज खरी ठरवली आहे. यावेळी येणाऱ्या निवडणुकांमध्ये जनता काय निर्णय घेते हे पाण्यासारखे ठरेल. यात अजून काय काय नवीन पैलू बघायला मिळतील हे येणारा काळच सांगेल पण सिंचन घोटाळ्याची फाईल मात्र कलीयर होणार आणि किमान येणाऱ्या निवडणुकांपुरता राष्ट्रवादी च्या आमदारांमागील ससेमिरा थांबणार हे निश्चित. ही शरद पवारांची खेळी आहे किंवा प्रफुल पटेलवानी अमित शाह यांची खेळी आहे किंवा अजित पवार मागीलप्रमाणे परत येतील अशा किंतु-परंतूंमध्ये गुरफटून जाण्याशिवाय आपल्याकडे सध्यातरी कोणताही पर्याय उपलब्ध नाही. यावेळी कोण सत्ता उपभोगतो, कुणाचा फायदा होतो, कुणाची गोची होते आणि कुणाचा बळी जातो हे येणाऱ्या काळात कळेलच. एकूण काय तर सत्तेचे हे गौडबंगाल सामान्यांना कायमच आश्चर्याचे धक्के देत असते, बघुयात अजून आपल्याला काय धक्के मिळतात.

✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-7769886666