ब्रिटिशकालीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्लॅब कॉक्रीट कोसळले

35

🔺घटनास्थळी लोकप्रतिनिधी दाखल- अनुचित घटना घडल्यास मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवू

✒️किशोर बावणे(विशेष प्रतिनिधी)मो:-7350793187

साकोली(दि.10जुलै):- शहरातील सर्वात जूनी ब्रिटिशकालीन राजवटातील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेतील जीर्ण इमारतीचा वरुन स्लॅब कॉक्रीटचे मोठे तुकडे अचानक कोसळला. या घटनेत अवघ्या ५ मिनीटानी लहान मुलांसोबत होणारा जीवघेणा अपघात टळला आहे. घटनेची माहिती मिळताच येथील लोकप्रतिनिधींनी शाळेकडे धाव घेतली आणि सदर प्रकरण तात्काळ जिल्हा परिषद प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा क्रं. ०१ गणेश वार्ड येथील सोमवार दि. १० जुलैला नेहमीप्रमाणे १० वाजता शाळेची घंटा वाजली. नित्यनेमाने येथे प्रार्थना १०:३० ला होते.

आणि पाऊस पडत असल्यास ही प्रार्थना इमारतीच्या उजव्या बाजूला व्हरांड्यात होते. प्रार्थना १० ते १५ मिनिटे झाल्यावर सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात जातात. यातच सकाळी वेळ १०:३६ दरम्यान या जीर्ण इमारतीच्या व्हरांड्यातच वरुन भले मोठे स्लॅब कॉक्रीट अचानक कोसळले व त्या क्षणी संपूर्ण विद्यार्थी पटांगणातच असून वर्गात जाण्यासाठी तयार होते. अनावधानाने हे स्लॅब कॉक्रीट वर्गात जातांनी लहान मुलांवर कोसळले असते तर.? पण म्हणतात ना “मुलं ही देवाघरची फुलं” केवळ ईश्वराचीच कृपा की त्याने आपल्या देवरूपी बालकांना क्षणार्धात काहीही होऊ दिले नाही. पण मागेही या शाळेत सदर जीर्ण इमारतीच्या वर्गखोल्यांतील भाग कोसळला आहे, वर्ग १ च्या बाजूला तर भले मोठे भगदाड पडले असून काही वर्गखोल्यांना अक्षरक्षं तडे गेलेले आहेत.

या गंभीर आणि विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणा-या प्रकाराने कित्येक पंचायत समिती साकोलीत कागदांचे अर्ज व तक्रारी लागलेल्या आहेत. तरीही प्रशासनाला लहान मुलांच्या जीवाशी खेळणा-या प्रकारावर काहीच देणेघेणे नाही असे यावेळी पालकांनी बोलून दाखवित आपला प्रशासनावर संताप व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच येथील माजी नगरसेवक ॲड. मनिष कापगते व डॉ. गजानन डोंगरवार यांनी शाळेत जाऊन या अतिसंवेदनशील प्रकरणावर शासनाकडे या घटनेची चौकशी करून येथे जीर्ण इमारतीच्या वर्गखोल्यांतील मेन्टेनन्स बांधकाम तातडीने सुरू करून वर्गखोल्यांसाठी आलेला निधी परत का गेला.? याचीही गांभिर्याने दखल घेत या शाळेत याप्रकारे पुढील होणारी दूर्घटना टाळावी व अतितात्काळ नविन वर्गखोल्यांचे बांधकाम पुन्हा मंजूर करण्यात यावे अशीही मागणी केली आहे.

भंडारा जिल्ह्यातील ही एकमेव ब्रिटिशकालीन राजवटातील सर्वात जूनी १८६० पुर्वीची जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा असून याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे पार दूर्लक्ष असल्याची खंत पालक जनतेनी व्यक्त केली आहे. एखाद्या दिवशी या जीर्ण झालेल्या इमारतीतून लहान मुलांसोबत मोठी जिवीतहानी झाल्यास जबाबदारी कोण घेणार.? याच जिल्हा परिषद शाळा अंतर्गत कन्या शाळेच्या जागेवर बाजारवाडीत नगरपरिषदेतर्फे कब्जा करून तेथे बालोद्यान निर्माण केले. पण नगरपरिषदेने ज्यांच्या जागेवर कोणतीही पूर्वसूचना न देता व परवानगी न घेता बालोद्यान का बांधले.? मग त्याच बाप जागामालकाच्या शाळेत एखाद्या लहान कामातून हे सदर कार्य का केले नाही.? यावरून बापाच्या जागेवर कब्जा करता येतो मग बापाच्याच जागी थोडं सहकार्य नगरपरिषद का दाखवित नाही.? असाही संतप्त सवाल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश कोवे, उपाध्यक्ष लिना चचाने, सदस्य आशिष चेडगे, रवि भोंगाणे, हेमंत भारद्वाज, अमित लांजेवार, रामदास आगाशे यांनी उचलला असून या पावसामुळे जीर्ण इमारतीच्या व्हरांड्यात याप्रकारे घटना झाल्यास स्थानिक प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी आणि पालकांनी दिला आहे.