बंदी भागातल्या विविध मागण्या संदर्भात 14 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण

63

(सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रशासनाला इशारा)

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 7 ऑगस्ट) तालुक्यातील अतिदुर्गम बंदी भागात अनेक विकास कामे खोळंबली आहे या भागाला भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे कुरण बनवले आहे याबाबत अनेक तक्रारी करून सुद्धा कोणती ठोस कारवाई होत नसल्याने अखेर बिटरगाव (बु) येथील सामाजिक कार्यकर्ते वसंतराव नरवाडे व बालाजी हाके यांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन विविध मागण्या संदर्भात ठोस कारवाई करा अन्यथा 14 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनातून ग्रामपंचायत बिटरगाव (बु), निंगणुर, मन्याळी, मोरचंडी, सोनदाबी या ग्रामपंचायत मध्ये प्रकाश भेदेकर हे सचिव म्हणून कार्यरत असताना त्यांच्या कार्यकाळात कामांमध्ये त्यांनी अनियमितता केली असून स्थानिक सरपंच व कंत्राटदार यांच्याशी संगणमत करून अनेक बोगस कामे करीत गैरव्यवहार केला त्या संदर्भात त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करून सुद्धा अद्याप चौकशी न झाल्याने त्याची ठोस विभागीय चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी.

जेवली वर्तुळामध्ये प्रादेशिक वनांमध्ये झालेल्या कामात कंत्राटदार व अधिकारी यांनी संगणमत करून अपहार केल्याचे निदर्शनास आल्याने त्या संदर्भात माहितीचा अधिकारामार्फत माहिती मागितली परंतु अध्यापही माहिती देण्यात आली नसल्याने ती माहिती तात्काळ देण्यात यावी तसेच बिटरगाव (बु) ते नानकपूर हा रस्ता निकृष्ट दर्जाचा होत असून सदर रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत होत आहे तसेच पुलाचे काम सुद्धा निकृष्ठ होत असून त्या कामाची चौकशी करून कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांच्याकडे कारवाई करण्यात यावी, बंदी भागातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बिटरगाव (बु) या गावातील मुख्य रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून गावातील मुख्य रस्ते अद्यापही खड्डेयुक्त आहे.

त्यामुळे हे मुख्य रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे, स्मशानभूमी मध्ये सिमेंटचे दहन शेड उभारण्यात यावे या मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, मुख्य वनसंरक्षक , गटविकास अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक यांचे सह उपविभागीय अधिकारी यांना दिले असून या निवेदनावर त्वरित कारवाई न झाल्यास 14 ऑगस्ट पासून उपविभागीय कार्यालय समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.