कोरोनातील कामामुळे देशाला आजही तुमचा अभिमान वाटतो – आ.डॉ.गुट्टे

265

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.7ऑगस्ट):-कोरोना काळाने जगाची परीक्षा घेतली होती. त्यावेळी घरातले अगदी नातेवाईक अंतर ठेवून राहायचे. मात्र, जनसेवेचे ब्रीद घेवून आरोग्य व्यवस्थेतील डॉक्टर, परिचारिका, आया, वॉर्ड बॉयसह आशा स्वंयसेविका यांनी जीवाची बाजी लावली होती. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट थोपवता आली. त्याची जागतिक आरोग्य संघटनेने सुध्दा दखल घेतली होती. म्हणून कोरोनातील कामामुळे देशाला आजही तुमचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी आशा स्वंयसेविकांना उद्देशून काढले.

शहरातील जिल्हा परिषद इमारत येथे तालुका आरोग्य अधिकारी यांनी आयोजित केलेल्या आशा डे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी उपस्थित आशा स्वंयसेविकांसाठी आरोग्य तपासणी, रांगोळी स्पर्धा, अनुभव कथन असे विविध उपक्रम घेण्यात आले.

आशा स्वंयसेविका म्हणून काम करणे तशी सोपी गोष्ट नाही. घरची सगळी कामे उरकून सकाळी साडेआठ वाजता कामाच्या ठिकाणी पोहचावे लागते. कधी लसीकरणाची ड्युटी असते, तर कधी गावात जाऊन जनजागृती करायची असते. घर आणि कामाचे ठिकाण यात ३ ते ४ किलोमीटरचे अंतर हमखास असते. तुमच्या कामाचे कागदोपत्री केवळ ४ तास ठरलेले आहेत. पण, कोरोनाच्या काळात तुम्ही दररोज अगदी १०-१२ तास काम केले आहे. आज आपल्या महाराष्ट्रात ७० हजार तर भारतातल्या ग्रामीण भागात १० लाखांपेक्षा अधिक महिला आशा स्वंयसेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे तुमच्या कामाचे मोल शब्दांच्या पलीकडचे आहे, असेही आ.डॉ.गुट्टे म्हणाले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेश दिक्षीत, आयटेकचे अध्यक्ष मुगाजी बुरूड, समूह संघटक माधव चिवळे, विलास चौधरी, आरोग्य विस्तार अधिकारी डॉ.श्रीमती गुट्टे, डॉ.क्रांती मुंडे, श्रीकांत सर, डॉ.अगरताळे, भरत नरवडे यांच्या अधिकारी, कर्मचारी व आशा स्वंयसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.