पहाडावरील आदिम कोलामांचा जगण्यासाठी जीवघेणा संघर्ष कायम

182

🔹जागृत संस्थेच्या संशोधनात्मक अहवालातून धक्कादायक निष्कर्ष

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.11ऑगस्ट):-दुर्गम भागातील आदिम आदिवासी कोलाम बांधवाचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना राबवते. मात्र अतिदुर्गम जिवती तालुक्यातील कोलाम गावखेड्यात अजूनही विकासाच्या योजना पोहोचल्या नाही.

आजही अनेक गाव-गुड्यातील आदिवासी कोलाम बांधव विविध समस्यांच्या दलदलीत आपले जिवन जगत आहेत. आरोग्य, शिक्षण, दळणवळण, रस्ते, वीज, पाणी या मुलभूत सोयी-सुविधापासून वंचित असलेल्या या भागातील १६ कोलामगुड्यांवर जावून चिमूर येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जागृत संस्थेच्या माध्यमातून संशोधनात्मक सर्वेक्षण व जनजागृती केली. ‘आदिम कोलाम : मानवी हक्कांचा दृष्टिक्षेप’ या अहवालातून धक्कादायक निष्कर्षही पुढे मांडले आहे. या समुदायाच्या विकासाच्या योजनांवर प्रश्नचिन्हही उभे केले आहे.

आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर येथील एमएसडब्ल्यूचे राम चौधरी, सारंग जुमडे, निखिल मेश्राम, सोनल मुन, श्वेता रामटेके, प्रणाली गायकवाड, स्वाती पडाल, मार्कंडेश्वर धंदरे या विद्यार्थ्यांनी जागृत बहुद्देशीय संस्थेत १९ मे ते १८ जून २०२३ या एक महिण्याच्या कालावधीत आदिवासी बहूल जिवती तालुक्यातील कोलाम समुदायांच्या पाड्यात मुक्काम ठोकून क्षेत्रीय प्रबोधनाचे, सर्वेक्षणाचे जमिनस्तरावर कार्य केले. आदिम कोलाम समुदायांच्या मुलभूत मानवी हक्काचे फार मोठे हनन होत असून समुदायांच्या प्रथा, परंपरा, संस्कृती याचे जतन व संवर्धन करण्याची जितकी गरज आहे; तितकीच अन्न वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, दळणवळणासह पेसा व वनधिकार कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे दिसून आले.

विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोईनकर, संचालक ॲड.दीपक चटप, वर्षा कोडापे यांचे विशेष पाठबळ मिळाले. विद्यार्थ्यांनी केलेले सर्वेक्षण अहवाल आजपर्यंत फक्त महाविद्यालयाच्या ग्रंथालयापुरतेच मर्यादित राहत होते. मात्र जागृत संस्थेचे पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.शुभांगी वडस्कर-लुंगे, डॉ.राजु कासारे, डाॅ.विना काकडे यांनी हा अहवाल समाजापुढे मांडण्यासाठी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना क्षेत्रीय कार्य दरम्यान संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते व आदिम माडिया समाजातील पहिले वकिल ॲड.लालसू नोगोटी, चिन्ना महाका, ॲड.बोधी रामटेके, रवी चुनारकर, कोलाम समुदायातील सामाजिक कार्यकर्ते देवू सिडाम, नामदेव कोडापे, संघर्ष पडवेकर, बाजीराव कोडापे यांचे मार्गदर्शन व विशेष सहकार्य लाभले.

• या गावात १६ कोलाम गावात केले सर्वेक्षण
—————————————–
माणिकगड पहाडातील जिवती तालुक्यातील रायपूर, खडकी, कलीगुडा, मारोतीगुडा, काकबन, लेंडीगुडा, भुरीयेसापूर, टाटाकोहाड, लांबोरी, पल्लेझरी, आंबेझरी, सीतागुडा, लचमागुडा, जनकापूर, बेलगाम, घोडणकप्पी या १६ गावांची निवड करून प्रत्यक्ष कोलाम समुदायांसोबत महिनाभर राहून त्यांच्याशी संवाद साधत माहिती जाणून घेतली. विविध प्रश्नांचा अभ्यास व निष्कर्षासाठी गावातील प्रत्येकी १० कुटुंबांचे सर्वेक्षण केले. आदिवासी विकास योजनाचा आदिम कोलामांवर काय साधक-बाधक परिणाम झाला. शासकीय योजनेतील अंमलबजावणीच्या उणिवा कोणत्या याबाबतही त्यांनी सर्वेक्षण अहवालात नोंदविले आहे.

• धक्कादायक वास्तव : ७७ टक्के नागरिकांना आपले लोकप्रतिनिधीच माहीती नाही
————————-
चिमूरच्या समाजकार्य महाविद्यालयातील अंतीम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी जागृत संस्थेच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या अहवालात १६ आदिम कोलाम समुदायांची सद्यस्थिती मांडली आहे. यात ७७ टक्के नागरिकांना आपले लोकप्रतिनिधी जसे सरपंच, सभापती, आमदार, खासदार कोण याची माहीतीच सांगता येत नसल्याचे वास्तव पुढे आले. १४ टक्के कोलांमाकडे शेती नाही. उर्वरीत शेती पट्ट्याची व अतिक्रमीत आहे. १८ वर्षाखालील ६८.९७ टक्के मुलीचे विवाह होतात. तर युवकांच्या बालविवाहाचे प्रमाण ६१ टक्के आहे. ३५.३३ टक्के कुटुंबाकडे घरकूल नाही. ज्यांच्याकडे घरकूल आहे त्यास शौचालय नाही व बांधकाम अपुर्ण आहे. ४६ टक्के नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाच उपलब्ध नाही. १२ टक्के गावात अंगणवाडीची सोय नाही.

बऱ्याच गावात आठवड्यातून एक-दोनदा अंगणवाडी उघडते. २६ टक्के कोलाम गुड्यावर शाळाच नाही. आरोग्य सुविधा नसल्याने १७.३४ टक्के कोलाम वनोषधीचा वापर करतात. ६० टक्के गावात दळणवळणाची सुविधा उपलब्ध नसल्याने पायदळ प्रवास करावा लागतो. २८.२७ टक्के कोलांमाचे उत्पन्न केवळ २ ते ५ हजार आहे. ४३.४० टक्के नागरिक अशिक्षित आहेत. ८५ टक्के कोलांमाकडे जातीचे प्रमाणपत्र नाही. १५.८७ टक्के नागरिकांकडे अजूनही मतदान कार्ड नाही. ९२.३२ टक्के महिला व मुली मासिक पाळीत पॅड वापरत नाही. ७० टक्के कुटुंबाकडे शौचालय नाही. ६.२० टक्के मातामृत्यू-बालमृत्यूचे प्रमाण आहे. अशी धक्कादायक माहीती सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

कोलाम-माडिया समुदायातील १० युवकांना आदिम फेलोशिप
—————————————–
चंद्रपूर जिल्ह्यातील आदिम कोलाम व गडचिरोली जिल्ह्यातील माडिया या अतिअसुरक्षीत आदिम जमातीसाठी जागृत संस्थेद्वारे आदिम फेलोशीप कार्यक्रम १ ऑगस्टपासून सुरु करण्यात आला आहे. याच समुदायातील १० युवक-युवतींना पुढील ३ वर्षे फेलोशीप देण्यात आली आहे. यातून शिक्षण, वनहक्क, नेतृत्व विकास व संस्कृतीचे जतन व संवर्धनाकरिता लेखन करणे ही कृतियुक्त कामे फेलोशीपद्वारे सुरु करण्यात आली आहे. अहवालातून पुढे आलेल्या प्रश्नांवर समाजजागृतीचे काम करण्यास फेलोशीपच्या माध्यमाने संस्थेने काम सुरु केले आहे.

◆ स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आदिम कोलाम समुदाय मुलभूत हक्कापासून वंचित असणे धक्कादायक आहे. या अहवालाकडे शासनाने लक्ष द्यावे. आदिम कोलामांच्या प्रश्नांवर, हक्क, संस्कृतीवर संस्थेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती व कृतियुक्त रचनात्मक काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हा वास्तवदर्शी अहवाल शासन-प्रशासनाकडे सादर करण्यात येईल. यातून धोरणात्मक निर्णय घेण्यास शासनालाही मदत होणार आहे.

– अविनाश पोईनकर
अध्यक्ष, जागृत संस्था चंद्रपूर.