माहितीचा जागतिक महामार्ग निर्माता: अंतरजाल!

90

[महाजाल/अंतरजाल- इंटरनेट विशेष.]

इंटरनेट हे संगणकांच्या जगभर पसरलेल्या कित्येक लाख अशा नेटवर्कस्‌चे मिळून बनलेले एक प्रचंड नेटवर्क आहे. अनेक वर्तमानपत्रे व मासिकांत इंटरनेटला महाजाल किंवा अंतरजाल हा शब्द वापरलेला आढळतो. महाजाल हे इलेक्ट्रॉनिक संपर्काच्या काही जागतिक प्रमाण अशा प्रोटोकॉल्स इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीतील माहिती देवाणघेवाणीच्या प्रमाण संवाद पद्धतीवर चालते. इंटरनेट हे केवळ एकच एकसंध असे नेटवर्क नसून ते अनेक लहान नेटवर्क्स्‌नी बनलेले आहे. श्री एन. कृष्णकुमार यांचा खुप ज्ञानवर्धक माहिती प्रस्तुत करणारा लेख… 

इंटरनेटच्या माध्यमातून अनेकविविध प्रकारच्या माहितीची देवाणघेवाण जोडलेल्या संगणकांना करता येते. काही सर्वसामान्य वापराची उदाहरणे म्हणजे, इलेक्ट्रॉनिक पत्रे- ईमेल, वर्ल्डवाईड वेब पेजेस् , लोकांशी गप्पा मारणे- चॅटिंग इत्यादी. इंटरनेटच्या स्थापनेची मुळे सन १९६९ पर्यंतच्या खोल संशोधनात रुजलेली आहेत. तेव्हा अमेरिकन सरकारने खाजगी आर्थिक शक्तीच्या मदतीने एक भक्कम, अभेद्य आणि पसरलेले संगणकीय जाळे बनविण्याचा ध्यास घेतला होता. नवीन अमेरिकी बॅकबोन नॅशनल सायन्स फाऊंन्‍डेशनने सन १९८० मध्ये दिलेल्या आर्थिक मदतीमुळे आणि त्याचबरोबर काही खाजगी आर्थिक मदत मिळाल्यामुळे जागतिक पातळीवर नव्या संगणकीय जाळ्याच्या तंत्रविद्येवर संशोधन केले गेले. यामुळे अनेक संगणकीय जाळ्यांनी एकमेकांशी हातमिळवणी केली. सन १९९० मध्ये जेव्हा हे जाळे आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय झाले, त्याचे अर्थकारण व्हायला सुरुवात झाली.

यामुळे त्याची लोकप्रियता इतकी वाढली कि ते आधुनिक माणसाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा घटक बनले. सन २००९ च्या आकड्यांवरून हे स्पष्ट होते की जगातील जवळपास एक चतुर्तांश लोकसंख्या महाजालचा वापर आपल्या रोजच्या आयुष्यात करते. इंटरनेटवर लक्ष्य ठेवायला आणि त्याचा वापर नियमित करायला कुठलीच केंद्रीय समिती नाही. प्रत्येक भागीदार जाळे- नेटवर्क आपापले धोरण निश्चित करत असतो. आपल्या दैनंदिन आयुष्यात इंटरनेटचा वापर इंटरनेट संगणक नेटवर्कची एक जागतिक संस्था आहे. जेव्हा एखादा इंटरनेटवर असतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या समूहाचा एक भाग बनतात जो संगणकाचा वापर त्यांचे विचार आणि माहिती देवाणघेवाण करण्यासाठी करतो.

आम्ही आमच्या दैनंदिन जीवनात नियमितपणे इंटरनेट वापरतो. हे सामान्य लोकांसाठी आधुनिक विज्ञान भेट आहे. कल्पना आणि माहितीच्या देवाणघेवाणीच्या क्षेत्रात जगभर क्रांती घडवून आणली आहे. हे माहितीचे जागतिक महामार्ग तयार करते आणि जवळजवळ सर्व देशांना व्यापते. हे उपलब्ध आहे, उघडा, जलद, सोपे, स्वस्त आणि बहुविध. रोजच्या मानवी जीवनाचे सर्व क्षेत्र इंटरनेटद्वारे स्पर्शले आहेत. व्यवसायकर्ते इंटरनेटवरून आपला व्यवसाय अतिशय वेगाने विकसित करू शकतात. बरेच व्यापारी ऑनलाईन राहून त्यांची उत्पादने ऑनलाइन विकतात. विद्यार्थी त्यांना आवश्यक शैक्षणिक माहिती मिळवू शकतात. युवावर्ग नोकरींसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतो आणि इंटरनेटद्वारे प्रतिमा आणि व्हिडिओ सामायिक करू शकतो.

महाजालचा इतिहास असा आहे – इंटरनेट युगाची खऱ्या अर्थाने सुरुवात इ.स.१९६९पासून झाली. तेव्हा अर्पानेटमुळे अशा जाळ्याची कल्पना समोर आली. यावेळी युनिक्स सारख्या अद्यावत ऑपरेटिंग सिस्टिमची सुरुवात झाली. ही सिस्टिम आजदेखील वेबसर्व्हरसाठी एक चांगली प्रणाली मानली जाते. त्यानंतर लगेचच म्हणजे सन १९७०मध्ये पहिल्या ई-मेलची निर्मिती झाली. ई-मेलची निर्मिती करणाऱ्या रे टॉमलिन्सन यांनी तेव्हा ई-मेलमध्ये @ हे चिन्ह वापरण्याचा निर्णय घेतला. या @ चिन्हामुळे ई-मेल वापरणारा आणि कॉम्प्युटर म्हणजेच सर्व्हर या दोन्ही गोष्टी विभागल्या गेल्या. पुढे सन १९७१मध्ये इंटरनेटवर गटेनबर्ग आणि ई-बुक हे दोन नवीन प्रकल्प आले. गटेनबर्ग यामध्ये माहितीचे भांडार आणि ई-बुकमध्ये चित्रस्वरूपात- स्कॅन इमेजेस पुस्तके संग्रहित करण्यात आली. नंतर १९७४च्या सुरुवातीला टीसीपी/आयपीचा वापर केला गेला. सर्व नेटवर्कमध्ये केंद्रीय नियंत्रण असावे हा या मागचा प्रयत्‍न. हा पुढे टिसीपी/आयपीने यशस्वी झाला.

सन १९७५मध्ये जॉन विट्टल याने ई-मेलमध्ये नवीन सुधारणा आणल्या. त्यामुळे ई-मेलला प्रतिउत्तर- रिप्लाय देणे व आलेल्या ई-मेलला दुसऱ्याला फॉरवर्ड- पाठविणे या महत्त्वाच्या गोष्टी शक्य झाल्या. सन १९७७मध्ये डेनिस हायेस आणि डेल हेदरिंगटन यांनी मॉडेमचा शोध लावला. तर सन १९७८मध्ये पहिला अनावश्यक ई-मेल समोर आला. या अनावश्यक ई-मेलला नंतर स्पॅम असे नाव मिळाले. सन १७७९मध्ये यूज़नेटचा वापर सुरू झाला. पदवी अभ्यासक्रमाच्या दोन विद्यार्थांनी बनविलेल्या या यूज़नेट प्रणालीद्वारे जगभरातील लोक इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी चर्चा करू शकतात. सन १९८२मध्ये पहिल्यांदा चिन्हाद्वारे प्रतिक्रिया दाखविण्याची सुरुवात (:-) हे चिन्ह वापरून झाली. आपल्या प्रत्येक विनोदाच्या शेवटी ते हे हसण्याचे चिन्ह वापरत होते. या आणि अशा अनेक चिन्हांना आता इमोटिकॉन असे म्हणतात. ही चिन्हेआता ई-मेल आणि चॅटींगमध्ये सर्रास वापरली जातात.

सन १९८४मध्ये पहिल्या डोमेन नेम सर्व्हरची निर्मिती झाली. डोमेन नेम सर्व्हरमध्ये हव्या त्याप्रमाणे नाव वापरण्याची सोय असल्याने पूर्वीच्या आयपी ॲड्रेस मधील क्रमांकाऐवजी हे लक्षात ठेवायला फारच सोपे होते. डोमेन नेम सर्व्हरद्वारे नाव दिल्यानंतर त्याचे रूपांतर आपोआप आयपी ॲड्रेस मधील क्रमांकामध्ये होते. सन १९८५मध्ये काल्पनिक- व्हर्चुअल समूह स्थापन झाले. तेव्हाची दी वेलचा का समूह आजदेखील इंटरनेटवरील एक प्रभावशाली समूह- कम्युनिटी आहे.सन १९८७मध्ये इंटरनेटचे जवळपास ३० हजार धारक होते. तर सन १९८८मध्ये इंटरनेटवरील गप्पागोष्टींचे पहिल्यांदा सहक्षेपण- इंटरनेट रिले चॅट केले गेले. आज त्याला चॅटिंग म्हणतात. तेव्हाच इंटरनेटवर पहिल्या उपद्रवी प्रोग्रॅमने हल्ला चढवून मोठ्या अडचणी निर्माण केल्या. सन १९८९मध्ये अमेरीका ऑन लाईन म्हणजेच एओएलची निर्मिती झाली. एओएलमुळे पुढील काळात इंटरनेट लोकप्रिय होण्यास मदत झाली. त्याच साली वर्ल्ड वाईड वेब ही संकल्पना टीम बर्नर-ली यांनी अस्तित्वात आणली.

मात्र ती खऱ्या अर्थाने १९९०पासून सुरू झाली. त्यावेळी इंटरनेटच्या क्षेत्रामध्ये बऱ्याच प्रकारे प्रगती झाली. त्‍यासाली द वर्ल्ड या पहिल्या व्यावसायिक डायल-अप इंटरनेट प्रोवाईडर सेवा पुरविण्याची सुरुवात झाली. सन १९९१ मध्येच पहिले इंटरनेटवरील पान म्हणजेच वेबपेज बनविले गेले. तेव्हाच गोफर या पहिल्या शोध प्रणालीची देखील निर्मिती झाली. ती फक्त फाईलचे नावच नाही तर त्यातील मजकूरदेखील शोधत असे. याच साली एमपीथ्री या प्रकाराला सर्वमान्यता मिळाली. हा फाईलचा प्रकार आजदेखील आवाजाच्या आणि गाण्याच्या फाईलसाठी जगप्रसिद्ध आहे. याचवर्षी इंटरनेटवरील अतिमहत्त्वाचा टप्पा असलेल्या पहिल्या वेबकॅमचा म्हणजेच ऑनलाईन कॅमेऱ्याचा केंब्रिज विद्यापीठामध्ये वापर केला गेला. पुढे १९९३ मध्ये सर्वसामान्यांसाठी प्रथमच मोझाईक हा पहिला ग्राफिकल इंटरनेट ब्राऊझर उपलब्ध झाला. खरे तर सर्वात पहिला इंटरनेट ब्राऊझर नव्हता.

पण तो जास्त तांत्रिक गुंतागुतीचा नव्हता आणि त्यामुळे वापरायला अतिशय सोपा होता. लगेचच तो सर्वाधिक प्रचलित इंटरनेट ब्राऊझर बनला. याचसाली अमेरिकेतील व्हाईट हाउस आणि शासकीय वेबसाइट इंटरनेटवर आल्या. त्यामुळे तेव्हाच्या वेबच्या क्षेत्रामध्ये प्रथमच .जीओवी आणि .ओआरजी या दोन वेबसाईटच्या नामप्रकारांची निर्मिती झाली. सन १९९४मध्ये मोझाईकच्या इंटरनेट ब्राऊझरला नेटस्केप नॅव्हिगेटर हा पहिला प्रतिस्पर्धी इंटरनेट ब्राऊझर तयार झाला. सन १९९५मध्ये बँकेचे तसेच क्रेडिट कार्डचे व्यवहार ऑनलाईन करण्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या सुरक्षित इंटरनेट ब्राऊझर आवश्यक भासू लागला. या आवश्यकतेनुसार नेटस्केप कंपनीनेच सुरक्षित असा एसएसएल सेक्युअर साॅकेटस् लायर प्रणाली असलेला ब्राऊझर तयार केला. कारण याच साली इको बाय या इंटरनेटवर ऑनलाईन विक्री करणाऱ्या वेबसाइटची निर्मिती झाली. ती आज ईबाय नावाने ओळखली जाते.

याच साली आमाॅझाॅन.काॅम ही वेबसाइट देखील निघाली. असे असले तरी जवळपास ६ वर्षांपर्यंत म्हणजेच सन २००१पर्यंत या वेबसाइटला कुठलाच आर्थिक फायदा झाला नव्हता. सन १९९५मध्येच सर्वसामान्यांना देखील इंटरनेटवर आपली मोफत वेबसाइट बनविता यावी यासाठी जीओसिटीज ही वेबसाइट निर्माण झाली. मात्र ती सन २००९ या वर्षात झालेल्या मोठ्या तोट्यामुळे बंद करावी लागली. याच साली नेटस्केप नॅव्हिगेटर ब्राऊझरच्या माध्यमातूनच सर्वप्रथम जावा आणि नंतर जावास्क्रिप्ट या प्रोग्रॅम प्रणाली ब्रेंडन ईच याने नेटस्केप नॅव्हिगेटरचा एक भाग म्हणून बनवल्या. १९९६मध्ये सर्वप्रथम हॉटमेल ही ऑनलाईन मोफत ई-मेल सेवा सुरू झाली. १९९७ मध्ये वेबलॉग या पहिल्या इंटरनेटवरील ब्लॉगची निर्मिती केली गेली. सन १९९८मध्ये आजच्या जगप्रसिद्ध गूगल या सर्च सेवा पुरविणारी वेबसाइट सुरू झाली. याच साली नेटस्केप कंपनीने सर्वप्रथम इंटरनेटच्या माध्यमातून फाईल्सची देवाण-घेवाण करणारा प्रोग्रॅम बनविला.

सन १९९९मध्ये सेटी हा प्रोग्रॅम इंटरनेटवर आला. जवळपास ३० लाख कॉम्प्युटर्सना जोडलेला या प्रोग्रॅमचे काम होते. परग्रहावरील सजीवांचा शोध घेणे. इंटरनेटच्या माध्यमातून जोडलेल्या रेडिओ टेलेस्कोपमध्ये जमा झालेल्या माहितीचे विश्लेषण करण्याचे काम सेटीद्वारे केले जात होते. सन २००१मध्ये विकिपीडिया या इंटरनेटवरील माहितीच्या विश्वातील मुक्तज्ञान कोष असलेल्या वेबसाइटची निर्मिती झाली. सन २००३मध्ये तयार झालेल्या स्काईप द्वारे प्रथमच इंटरनेटद्वारे आवाज संभाषणाला म्हणजेच वाॅईस ओवर आईपी काॅलिंगला सुरुवात झाली. याच साली मायस्पेस आणि लिंकेडिन या वेबसाइट सुरू झाल्या आणि खऱ्या अर्थाने सोशल नेटवर्किंगला सुरुवात झाली. सन २००४ मध्ये वेब २.० या इंटरनेटवरील वेबसाइटच्या नवीन प्रणालीला सुरुवात झाली. याच साली दी फेसबुक ही सोशल नेटवर्किंगची वेबसाइट प्रामुख्याने कॉलेजच्या विद्यार्थांसाठी चालू झाली. जी पुढे फक्त फेसबुक या नावाने प्रचलित झाली. पुढे सन २००५मध्ये यूट्यूब या व्हिडिओमध्ये चलचित्र मोफत ऑनलाईन ठेवण्याची सेवा देणारी वेबसाइट सुरू झाली. तर त्यानंतर २००६ मध्ये ट्‌विटरने लोकांना आपल्याला हवे ते इंटरनेटवर बोलण्याची मुभा दिली. ट्‌विटर या वेबसाईटवर आपण १४० अक्षरांमध्ये आपला कुठलाही संदेश वा मजकूर- माहिती ठेवू शकतो. मात्र इंटरनेट मानवकल्याण साधाच ठरावा तो मानवतेला मारक ठरू नये, म्हणून प्रत्येकाने त्याचा माणुसकीच्या नात्यानेच योग्यप्रकारे वापर करावा, चरणी करबद्ध प्रार्थना!

✒️श्री एन. कृष्णकुमार से.नि.अध्यापक.रामनगर, गडचिरोली.फक्त व्हॉट्सॲप-9423714883