बालकांना शाळेचे धडे देण्याबरोबर आध्यात्मिक धडे देण्याचीही गरज ! – डॉ. सुनंदा शिंदे

74

✒️बारामती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

बारामती(दि.28ऑगस्ट):- आजची बालके उद्याची सुशिक्षित पिढी घडण्यासाठी शाळेचे धडे द्यावेच लागतील पण त्याचबरोबर त्यांना सुजाण व सुसंस्कारीत होण्यासाठी अध्यात्मिक धडे देण्याची देखील काळाची गरज आहे असे मत संत निरंकारी मिशनच्या प्रचारिका डॉ. सुनंदा शिंदे (अलिबाग) यांनी व्यक्त केले.

सदरचा बाल समागम संत निरंकारी मिशन सातारा झोनच्या वतीने रविवारी (ता. 27) सकाळी 11 ते 2 या वेळेत येथील कृषिराज मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी मिशनच्या प्रचारिका डॉ. सुनंदा शिंदे यांनी वरील मत व्यक्त केले.या बाल समागमास सातारा झोनचे झोनल प्रभारी नंदकुमार झांबरे, बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने, सातारा क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक दीपक शेलार या प्रमुखांसह आजूबाजूचे मुखी तथा संयोजक तसेच फलटण, बारामती, इंदापूर, सातारा, कराड, महाबळेश्वर, वाई आदी भागातून दीड ते दोन हजार बालकं उपस्थित होती.

संत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी विचारधारेच्या माध्यमातून विश्वात विश्वबंधुत्व व शांती प्रस्थापित करण्याचे महान कार्य अविरत पणे सुरु असल्याचे डॉ शिंदे यांनी सांगितले.आजची बालके हातात मोबाईल असल्याशिवाय जेवण करत नाहीत ही गंभीर बाब असल्याचे सांगून डॉ. शिंदे म्हणाल्या माणसांच्या अत्यावश्यक सेवेत मोबाईलने प्रथम स्थान निर्माण केल्याने मोबाईल शिवाय माणूस जगणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आजच्या युवा पिढीने मोबाईलचा वापर हा कामापुरता करावा व्यसन म्हणून नको असे आवाहनही यावेळी केले.

मोबाईलचा सर्रास अति वापर होत असल्याचे सांगून डॉ. शिंदे म्हणाल्या आज माणसाकडे खिशात पैसे नसले तरी चालतील पण हातात मोबाईल पाहिजे अशी भयानक अवस्था निर्माण झाली आहे. आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून पालकांनी मोबाईलला दोन हात दूर ठेवण्याची आवश्यकता आहे असे आवाहनही त्यांनी केले.उपस्थितांचे आभार व्यक्त करताना श्री. झांबरे म्हणाले की बालकांच्या आरोग्याकडे लक्ष दिले तर ती जशी बालके सुदृढ होतात त्याचप्रमाणे बालपणावर आध्यात्मिक विचारधारा रुजवली म्हणजे ती सुसंस्कारित होतात.

सदरचा सामगम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बारामती क्षेत्राची क्षेत्रीय संचालक किशोर माने यांच्या सहकार्याने लोणंद शाखेचे मुखी सागर शेळके तसेच सेवादल अधिकारी, सेवादल व सेवादल भगिनी यांनी विशेष परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन सुरज गारळे यांनी केले.