🔸जालना जिल्ह्यातील पहिला महिला अधिपरिचारिका रीमा लेवीदास निर्मल/भालेराव यांचा सन्मान

🔹उत्कृष्ट डॉक्टर म्हणून डॉ.गोविंद कडुबा गीते यांचाही सन्मान

🔸अल्फा ओमेगा ख्रिस्चन महासंघाच्यावतीने सिस्टर रीमा निर्मल/भालेराव यांचे अभिनंदन व शुभेच्छा

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

जालना(दि.26जुलै):-कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये कोव्हीड रुग्णालयात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सेवक व सफाई कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या संकल्पनेतुन एम्प्लॉई ऑफ द वीक हा उपक्रम सुरु करण्यात आला असुन पहिल्या आठवड्यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कोव्हीड योद्धयांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
यामध्ये उत्कृष्ट डॉक्टर गोविंद कडुबा गिते यांना चार हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले तर उत्कृष्ट नर्स म्हणुन रीमा लेवीदास निर्मळ यांना तीन हजार रुपयांचा धनादेश, उत्कृष्ट पाणी पुरवठा कर्मचारी चरण कांबळे यांना दोन हजार रुपयांचा तर अजय ढिलपे, कक्ष सेवक यांना एक हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
रुग्ण सेवेचे वृत् हाती घेऊन आपण आपल्या स्वत:ची, आपल्या कुटूंबाची पर्वा न करता कोव्हीड रुग्णांची सर्वजण रात्रंदिवस आपण सेवा करत आहात. आपले हे काम प्रशंसनीय असल्याचे सांगत यापुढेही रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी यावेळी केले.
पुरस्कारप्राप्त डॉक्टर गोविंद कडुबा गिते व नर्स सिस्टर रीमा लेवीदास निर्मळ म्हणाले की, गेल्या चार महिन्यांपासुन कोव्हीड रुग्णालयातुन आय.सी.यु.मध्ये कोव्हीड रुग्णांची सेवा करत आहे. दिवसातले ८ ते १२ तास पीपीई किट परिधान करुन रुग्णांची सेवा करावी लागत असल्याने खुप थकवा जाणवत असला तरी या ठिकाणी सर्वसामान्यांची सेवा करण्याची संधी मिळते, रुग्णांचे जीव वाचवण्याचे मोठे समाधान लाभत असल्याचे सांगत जिल्हाधिकारी महोदयांनी आमच्या या कार्याची दखल घेऊन गौरव केल्याबद्दल आभारही व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले, डॉ. संजय जगताप, डॉ. हयातनगरकर, डॉ. शेजुळ आदींची उपस्थिती होती.तसेच सिस्टर रीमा सह सर्व कोविड 19 गौरवप्राप्त योद्धयाचे अल्फा ओमेगा ख्रिस्चन महासंघाच्यावतीने अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.

कोरोना ब्रेकिंग, महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED