दहिवडीत धनगर समाजाचे उपोषण मोर्चा

775

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

🔹धनगर समाज आरक्षणावर ठाम

म्हसवड(दि.23सप्टेंबर):-दहिवडी ता.माण येथे विरळीतील चार धनगर समाज बांधव पाच दिवसापासून धनगर आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी दहिवडीतील माण तहसील कार्यालय परिसरात उपोषणास बसले आहेत.परंतु चार दिवस पूर्ण झाले तरी उपोषणकर्त्यांकडे प्रशासन काना डोळा करत असल्याने समाजाच्या वतीने साधारण बारा वाजण्याच्या सुमारास दहिवडीतील श्री.सिद्धनाथ मंदिरा पासून ते तहसील कार्यालय परिसरातील उपोषण स्थळापर्यंत मोर्चा काढत जवळपास दोन ते तीन हजार समाज बांधवांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘आरक्षण आमच्या हक्काचं,नाही कोणाच्या बापाचं’ या घोषणा देत धनगर गरजला. सकाळपासूनच माण मधील सकल धनगर समाज बांधव दहिवडीच्या दिशेने रवाना झाले.

या मोर्चात समाज बांधवांसह भगिनीही मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या.मोर्चात सर्व समाज बांधव घोषणा देत मार्डी चौक,फलटण चौक,बस स्थानक परिसरातून दहिवडी कॉलेज जवळून तहसील कार्यालय परिसरात दाखल झाले.

दरम्यान उपोषणकर्ते सुरेश गोरड,वैभव गोरड,अॅड.नितीन कटरे,शरद गोरड यांनी प्रशासनसह सरकारवर ताशेरे ओढले.आमच्या हक्काचं आरक्षण देत नसल्याने नाराजी व्यक्त केली. प्रशासन धनगर समाजाची दिशाभूल करत आहे.गेली ७० वर्षे सरकारमधील मंत्री,राज्यकर्ते यांनी धनगर समाजाचा वापर स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी केल्याचे मत उपोषणकर्त्यांनी व्यक्त केले.जोपर्यंत पालकमंत्री आणि सरकारमधील मंत्री उपोषणस्थळी भेट देऊन धनगर आरक्षण एस.टी.चे प्रमाणपत्र देत नाहीत,तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी धनगर समाजाचे नेते,माजी आमदार रामहरी रुपनवर म्हणाले की, माझ्यासह चार,पाच आमदारांनी सरकारमधील मंत्र्यांसोबत चर्चा केली.त्यावेळी आरक्षणाची अंमलबजावणी करून सवलती लागू करण्याची मागणी सरकारकडे केली.१९५२ साली धनगर समाजाचा एस.टी.मध्ये समावेश असताना त्यावर नंतरच्या काळात अंमलबजावणी झाली नसल्याचे मत व्यक्त केले.समाजातील कायदेपंडीत,वकिलांनी समाजातील प्रश्नांवर आवाज उठवला पाहिजे.आजपर्यंत मी जवळपास ५० बैठका केल्या,परंतु कालच्या बैठकीला सरकारमधील सर्व मंत्री सकारात्मक चर्चा करत होते.

बारामतीत ठराव करून ना.देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते.परंतु आजपर्यंत आरक्षण दिले नसल्याची खंत व्यक्त केली.आजपर्यंत सरकारमधील एकही मंत्री उपोषणस्थळी का आले नाहीत,असा प्रश्न उपस्थित केला.गेल्या ७० वर्षांपासून धनगर समाजाला भुलवल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मोर्चात सहभागी होत मोर्चेकर्‍यांशी समन्वय साधत मोर्चा हाताळला.तहसीलदार विकास अहिर यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.