अखंडांमधून समजलेले म. फुले

261

महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे दीडशेवे वर्ष आज 24 सप्टेंबर 2023 रोजी संपत आहे. म. फुले हे एक द्रष्टे समाज सुधारक होते. आपल्याला पटलेले विचार समाजात रुजविण्यासाठी एका बाजूला समाजातील उच्चवर्णीय प्रवृत्तींबरोबर त्यांनी संघर्षाची भूमिका घेतली आणि दुसऱ्या बाजूला अनेक पर्यायी सांस्कृतिक कार्यक्रमांचे त्यांनी आयोजन केले. काय नाकारायचे हे सांगतानाच काय काय स्विकारायचे याबाबत अतिशय सकस उपक्रम देणाऱ्या म. फुले यांचं “कर्ते सुधारक” असं अतिशय सार्थपणे वर्णन केलं जातं.म. फुले यांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक सत्यधर्माच्या प्रसारासाठी त्यांनी अखंड या काव्यप्रकाराची रचना केलेली दिसते. ज्यातला मूल्यआशय कधीही खंडित होऊ शकत नाही, कालबाह्य होऊ शकत नाही अशी शब्दरचना म्हणजे अखंड. या अखंडामधून म. फुले यांचे विचार नेमकेपणाने आपल्याला समजतात.

निसर्ग सर्वांना समान न्यायाने वागवतो, निसर्ग माणसांमाणसांमधे भेदभाव करत नाही तर आपण का करावा अशा आशयाचे त्यांचे अनेक अखंड आपल्याला दिसतात.
आपल्या एका अखंडात म. फुले म्हणतात,

एक सुर्य सर्वा प्रकाशास देतो,
उद्योगा लावितो प्राणीमात्रा!
मानवासहित प्राण्यांचे जीवन,
सर्वांचे पोषण तोच करी!
सर्वा सुख देई जनकाच्या परी,
नच धरी दुरी कोणी एका!
मानवाचा धर्म एकच असावा,
सत्याने वर्तावा जोती म्हणे!

सर्व सृष्टीच्या, सर्व चराचराच्या चैतन्याचा स्त्रोत असलेला सूर्य जर सर्व प्राणीमात्राबरोबर जनकाप्रमाणे म्हणजे आपल्या बापाप्रमाणे समान नजरेने व्यवहार करत असेल तर आपण आपापसात वेगवेगळे का आहोत? आपला धर्म एकच असायला हवा आणि तो सत्यधर्म असायला हवा.अशाच पध्दतीने आपल्या आणखी काही अखंडांत ते पृथ्वीचे तसेच चंद्राचे उदाहरण देतात व म्हणतात,

निर्मिकाने जर एक पृथ्वी केली,
वाही भार भली सर्वत्रांचा!
तृणवृक्षभार पाळी आम्हासाठी,
फळे ती गोमटी छायेसह!
सुखसोईसाठी गरगर फेरे,
रात्रंदिन सोरे तीच करी!
मानवांचे धर्म नसावे अनेक,
निर्मिक तो एक जोती म्हणे!

या अखंडाचा अर्थ सहज कळण्याजोगा आहे. तो समजून सांगण्याची पण गरज नाही. अशाच अर्थाने आणखी एका अखंडात ते म्हणतात,

निर्मिके निर्मीले मानव पवित्र,
कमी जास्त सूत्र बुध्दीमधे!
पिढीजादा बुध्दी नाही सर्वांमधी,
शोध करा आधी पुर्तेपणी!

माणसांच्या अंगी असलेली कौशल्ये वेगवेगळी असतील, प्रत्येक कौशल्य महत्वाचं आहे. त्याचं सूत्र वेगवेगळं असेल पण काही माणसे जन्मतः बुध्दी घेऊन आलीत आणि काही जन्मतःच ढ आहेत असं मात्र असू शकत नाही.

सर्व माणसे जन्माने समान आहेत, त्यांच्यात भेदभाव नको ही आपली भूमिका आणखी स्पष्ट करताना म. फुले म्हणतात,

सर्वांचा निर्मिक आहे एक धनी,
त्याचे भय मनी धरा सर्व!
न्यायाने वस्तुंचा उपभोग घ्यावा,
आनंद करावा भांडू नये!
धर्मराज्य भेद मानवा नसावे,
सत्याने वर्तावे ईशासाठी!
सर्व सुखी व्हावे भीक्षा मी मागतो,
आर्यास सांगतो जोती म्हणे!

म. फुले यांनी एकमय समाजाची कल्पना मांडलीय. जात, धर्म, वंश, लिंग हे भेदभाव विसरून एकमेकाशी आपलेपणाने वागणारा समाज म्हणजे एकमय समाज. आपल्याला सुखी व्हायचा अधिकार आहे तसा तो इतरांनाही आहे. आपल्यावरून जग ओळखावे अशा आशयाचा त्यांचा एक अखंड आहे.

माझे काही कोणी घेऊ नये जनी,
वसे ध्यानीमनी मानवाच्या!
माझ्या मनी सर्व मजला असावे,
दुज्या का नसावे जगामाजी!
आपल्यावरून जग ओळखावे,
त्यांच्याशी वर्तावे सत्य तेच!
मानवांचा धर्म सत्यनिती खूप,
करी जीवदान जोती म्हणे!

म. फुले यांनी आपल्या सर्वांचा निर्माता तो निर्मिक अशी कल्पना मांडली आहे. पारंपारिक ईश्वर या संकल्पनेपेक्षा ही संकल्पना वेगळी आहे. आपल्या सर्वांचा पालनकर्ता तो निसर्ग. निसर्गातील सूर्य, पृथ्वी, चंद्र हे जर माणसामाणसांमधे भेदभाव करत नसतील तर आपण जन्माच्या आधारे कुणीतरी मोठा किंवा कुणीतरी छोटा असं मानणं हे योग्य नाही असं म. फुले आपल्याला बजावतात हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. निसर्गाने आपल्यासाठी निर्मिलेल्या फळ, फळावळ, धनधान्य, खनिजे यांचा न्यायाने उपभोग घ्यावा, जेवढा आपला हक्क तेवढच वापराव, इतरांच्या हक्काचं खेचून घेऊ नये तसच निसर्गाला ओरबाडून खाऊ नये. अशा वागण्याने आपणही आनंदाने जगावे आणि इतरांनाही आनंदाने जगू द्यावे.
म. फुले यांनी खुळचट परंपरा, निरर्थक कर्मकांड यावर शब्दांमधून आणि आपल्या कृतीतून हल्ला चढवलेला आहे. आपल्या गुलामगिरी या ग्रंथात ते म्हणतात, पूरोहित तुम्हाला स्वर्ग-नरक अशा थोतांडाची भिती घालतो, पाप पुण्याची भिती घालतो, आभासी संकटाची भिती घालतो आणि मग त्यातून सुटका करून घेण्यासाठी तो तुम्हाला कधी अभिषेक घालायला सांगतो तर कधी होमहवन करायला लावतो. या असल्या कर्मकांडात काही अर्थ नाही. ही कर्मकांडे म्हणजे पूरोहिताच्या पोटापाण्याचं साधन आहे. आपलं त्यातून काहीही भलं होत नाही. तुम्ही त्यात अडकून विनाकारण स्वताःचं आर्थिक, मानसिक नुकसान करून घेऊ नका. आपण शेजाऱ्यांशी, नातलगांशी, मित्रांशी आपलेपणाने वागणं यातच आपलं हित आहे. ही भूमिका जोरकसपणे घेतल्यामूळे ज्यांचे हितसंबंध दुखावले त्यांनी म. फुले यांचेवर ब्राम्हणद्वेष्टे असल्याचा शिक्का मारला पण ते आजिबात खरे नाही.त्यांची समन्यायी किंवा सर्वसमावेशक भूमिका खालील अखंडातून आपल्याला समजते.

धर्मराज्य भेद मानवा नसावे,
सत्याने वागावे ईशासाठी!
ख्रिस्त महंमद मांग ब्राम्हणासी,
धरावे पोटाशी बंधूपरी!
निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक,
भांडणे अनेक कशासाठी!

कोणाही एका जातीचा द्वेष न करता जे चूक आहे ते चूक आहे ही त्यांची रोखठोक भूमिका होती व ती आवडल्याने म. फुले यांना सर्वच जातींमधून आणि विशेषतः ब्राम्हण जातीतूनही अनेक सहकारी व हितचिंतक लाभलेले आपल्याला दिसतात. म. फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या मोहीमेला पूरोहितशाहीने धर्माचा दाखला देवून हिंसक विरोध केलेला असला तरी मुलींच्या पहिल्या शाळेसाठी तात्यासाहेब भिडे यांनी आपला वाडा वापरायला दिला होता हे कुणीच विसरता कामा नये.
सर्व माणसांना सुखी जीवन जगण्याचा, आनंदाने रहाण्याचा अधिकार आहे असं म. फुले सतत सांगायचे. माणसाच्या सुखाच्या रस्त्यात जसा निरर्थक कर्मकांडाचा अडथळा आहे, पाप-पुण्यावर आधारित दैववादी मानसिकतेचा अडथळा आहे तसाच आपल्या काही वाईट सवयींचाही अडथळा आहे. आपण सतत प्रयत्नवादी असलं पाहिजे. आळस झटकून कामाला लागलं पाहिजे. आपण सतत उद्योगी असलं पाहिजे असं ते म्हणायचे. ते स्वतः यशस्वी उद्योजक होते हे अनेकांना माहित नाही. म. फुले यांनी शेअर बाजारावर पण काही अखंड रचले आहेत. त्यात ते म्हणतात, शेअर बाजार हा केवळ कागदांचा बाजार आहे व तो आळशांचा खेळ आहे. काही कष्ट न करता जगण्याच्या या सवयी चांगल्या नाहीत. ते असं म्हणतात,

शेअर मार्किटात खप कागदाचा,
नफा दलालाचा बुड धन्य!
शेअर कागदास पाहूनी रडती,
शिव्या शाप देती योजी त्यास!
शेअर व्यापाराचा जळो तो उद्योग,
होऊनी निःसंग मुढा लुटी!
आळशाचा खरा नित्य हाच धंदा,
दुरुनच वंदा जोती म्हणे!

आळशाचा धंदा करु नये हे सांगताना जोतीराव हे काय करावे हे ही सांगतात. ते पुढे असं म्हणतात,

सत्य उद्योगाने रोग लया जाती,
प्रकृती ती होती बळकटा!
उल्हासित मन झटे उद्योगास,
भोगी संपत्तीस सर्वकाळ!

नवीन वस्तु निर्माण करणाऱ्या उद्योगाला लागावे, रोजगार वाढवणाऱ्या उद्योगात लक्ष घालावे व ते उद्योग प्रामाणिकपणे करावेत… तिथे कष्ट करायला लाजू नये.

त्यांच्या विचारांमधे श्रमप्रतिष्ठा हा महत्वाचा मुद्दा त्यांनी सतत मांडला आहे. कोणतही काम हलकं नसतं. कष्ट करणाऱ्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे. आणि त्याच बरोबर कष्ट करणाऱ्यांना त्यांचा घामाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. हा सुध्दा म. फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा एक गाभा आहे. आपल्या एका अखंडात ते म्हणतात,

स्त्री-पुरुष सर्व कष्टकरी व्हावे,
कुटुंबा पोसावे आनंदाने!
नित्य मुली मुला शाळेत घालावे,
अन्नदान द्यावे विद्यार्थ्यांना!
सार्वभौम सत्य स्वतः आचरावे,
सुखे वागवावे पंगु लोकां!
अशा वर्तनाने सर्वा सुख द्याल,
स्वतः सुखी व्हाल जोती म्हणे!

एका अर्थाने सुखी जीवनाचा मूलमंत्रच म. फुले यांनी मांडला आहे. कष्ट करावेत, मुला-बाळांना शिकवावे, अडचणीत असलेल्यांना मदत करावी, याने इतरांनाही आनंद मिळेल आणि आपणही सुखी होऊ हेच सार्वभौम सत्य आहे.म फुले, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख यांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, लहुजी वस्ताद यांनी याकामी त्यांना साथ दिली. इंग्रज अधिकारी हंटर यांना म. फुले यांनी बहुजनांच्या मधे शिक्षणप्रसार व्हावा म्हणून सरकारने पुढाकार घेऊन मदत केली पाहिजे यासाठी दिलेले निवेदन महत्वाचे आहे. त्यांनी बहुजन समाजालाही ठणकावून सांगितले की, बाबांनो, शिक्षणाला महत्व द्या, दारूपायी संसाराची धुळधाण करू नका, खोट्या प्रतिष्ठेसाठी, खोट्या बडेजावासाठी फुकट खर्च करू नका, असा खर्च वाचवा आणि पोरापोरींचे शिक्षण चालू ठेवा. त्यांचा एक अखंड आहे,

थोडे दिन तरी मद्य वर्ज करा,
तोच पैसा भरा ग्रंथासाठी!
ग्रंथ वाचिताना मनी शोध करा,
देऊ नका थारा वैरभावा!

ग्रंथ वाचण्याचा सल्ला देताना म. फुले सावध आहेत. त्या काळातील बहुतेक ग्रंथ उच्च वर्णीयांनी लिहीलेले असल्याने त्यात भाकडकथा, मिथके वापरून जातीआधारित विषमतेचा, स्त्री-पुरुष विषमतेचे समर्थन केलेले होते, त्यामुळे ग्रंथ वाचताना आपलं मन जागं ठेवा, आपला विवेक जागा ठेवा आणि कुठल्याही प्रकारच्या वैरभावाला, द्वेषाला थारा देवू नका असं ते आवर्जून सांगतात.

विद्येविना मती गेली,
मतीविना गती गेली,
गतीविना वित्त गेले,
वित्ताविना शुद्र खचले,
एवढे अनर्थ एका अविद्येने केले

ही त्यांची भूमिका शिक्षणाला ते किती महत्व देत होते हे स्पष्ट करणारी आहे.

महात्मा फुले यांनी अशा अनेक अखंडांची रचना केलेली आहे. त्यांनी रचलेल्या अखंडांमधून त्यांच्या विचारांचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला त्याच्यात काही सूत्र दिसतात. पहिलं म्हणजे जन्माच्या आधारे सर्व माणसे समान असतात. जन्माच्या आधारे कुणी छोटा नसतो कुणी मोठा नसतो आणि त्यामुळे केवळ जन्माच्या आधारे माणसांमाणसांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ नये. सर्व माणसांच्या मध्ये काही ना काही एक कौशल्य लपलेलं असतं आणि समाजामधील प्रत्येक व्यक्तीला आपल्या अंतरंगात लपलेलं हे कौशल्य विकसित करण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि त्यातूनच प्रत्येकाला आपलं जीवन आनंदी बनवता आलं पाहिजे. प्रत्येकाला आनंदी बनण्याचा अधिकार आहे. सुखाने जगण्याचा अधिकार आहे हा त्यांच्या विचारांचा महत्वाचा धागा आपल्याला दिसतो. महात्मा फुल्यांनी यासाठी शिक्षण हे फार महत्त्वाचे साधन मानलेले आहे.

शिक्षण सर्वांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे कारण शिक्षणामधूनच आपल्यातल्या सुप्त क्षमता विकसित करण्याची संधी मिळते. म्हणून त्यांनी स्त्रिया आणि शुद्रसमाजातील मुली-मुलांसाठी शाळा काढल्या. शाळा सुरू करणे हे काम आजच्या इतकं त्या काळात सोपं नव्हतं. धर्म व्यवस्थेचा समाजावर पगडा होता. पुरोहित शाही चा समाजावर पगडा होता. आणि धर्म व्यवस्थेचे कायदे सातत्याने असं सांगत होते की स्त्री शुद्रादी शुद्रांना शिक्षणाचा अधिकार नाही त्यामुळे धर्मसत्तेच्या विरोधात जाऊन, पूरोहितशाहीच्या विरोधात जावून शिक्षणाच्या प्रसाराचं काम करणं हा अवघड असा वसा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले त्यांना मदत करणारे लहुजी वस्ताद,फातिमा शेख या सर्वांनी त्या काळात पुढे नेला. महात्मा फुले यांच्या विचारांचा आणखी एक वेगळा पैलू असा दिसतो की स्वर्ग आणि नरक या भ्रामक कल्पना आहेत. पाप-पुण्य हे सुद्धा समाजामध्ये सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांनी रुजवलेला भ्रम आहे. पाप पुण्याच्या दहशतीने, स्वर्ग नरकाच्या भीतीने माणसाने आपल्या आयुष्याचे कुठलेही निर्णय करू नयेत. पूरोहित कर्मकांड करायला लावतात ती कर्मकांड निरर्थक आहेत, विज्ञानाच्या कसोटीवर न उतरणारी आहेत. कष्टाची कामे करावी न लागता पुरोहितांच्या पोटापाण्याची सोय होते यापलीकडे या कर्मकांडाचा आपल्याला काही उपयोग नाही ही भूमिका म. फुले यांनी जोरकसपणे घेतलेली दिसते. श्रमाची प्रतिष्ठा हे एक मूल्य म. फुले यांच्या कामामधून सतत समोर येताना आपल्याला दिसतं.एकूणात म. फुले यांनी आपल्याला आनंदी जगण्याचा मार्ग दाखवला आहे. आपल्या आनंदी जगण्याच्या आड येणारे अडथळे निर्धाराने दूर करण्याचा, टाळण्याचा सल्ला आपल्याला दिला आहे. म. फुले यांच्या जयंतीदिनी एवढेच म्हणूया की,
सत्यशोधक बनूया आणि आनंदी जगूया!

✒️सुभाष वारे(मो:-9325046142)