महागाव तालुक्यात २० क्विंटलपेक्षा अधिक गांजा जप्त

    531

    ?स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    ✒️तालुका प्रतिनिधी(किशोर राऊत)

    महागाव(दि.6ऑक्टोबर):-तालुक्यातील घोणसरा आणि बरगेवाडी या दुर्गम गावाच्या शेतशिवारात चक्क गांजाची शेती करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. २५ ते ५० एकर क्षेत्राच्या परिसरात इतर पिकांमध्ये आंतरपीकासारखी गांजाची लागवड करण्यात आली. या प्रकरणाचा सुगावा लागल्यानंतर यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे जवळपास ५० पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश असलेले पथक आज भल्या पहाटे घोणसरा- बरगेवाडी शिवारात धडकले. शेतशिवाराची झाडाझडती घेताना एक दोन नव्हे तर तब्बल २५ ते ५० एकर क्षेत्रावर अंतरपीकासारखी गांजाची लागवड करण्यात आल्याचे पाहून पोलीस यंत्रणाही हादरून गेली

    काळी (दौलत) सर्कल मधील घोणसरा गावाच्या शेतशिवारात छुप्या पद्धतीने गांजाची लागवड करण्यात येत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. घोणसरा आणि बरगेवाडी येथे कित्येक हेक्टर क्षेत्रावर काही शेतकरी गांजाची शेती करतात हे ऐकूनच स्थानिक गुन्हे शाखेची यंत्रणा चक्रावली होती. गांजाच्या शेतीची माहिती घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून एका आठवड्यापासून अत्यंत गोपनीय पद्धतीने सुगावा घेण्यात येत होता. एलसीबी चे एक-दोन कर्मचारी वेषांतर करून घोणसरा व बरगेवाडी गावशिवारात माहिती घेण्यासाठी फिरत होते.

    ग्राहक बनून गावातील काही लोकांकडून गांजाच्या शेतीची तपशीलवार माहिती एलसीबीच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी गोळा केली व हा अहवाल पोलीस अधीक्षकांकडे देण्यात आला होता, त्यानंतर आज पहाटे घोणसरा- बरगेवाडीच्या शिवारात मोठ्या प्रमाणात धाडसत्र राबविण्याची तयारी केली. पोलीस अधिक्षक डॉ.पवन बनसोड याच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आधारसिंह सोनुने व किमान ५० पोलिस कर्मचार्‍यांचा फौजफाटा रात्री १ वाजताच्या सुमारास पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला.

    एलसीबी पुसद शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल सांगळे,गजानन गजभारे, गणेश वनोरे, विवेक देशमुख, ग्रामीण पो.स्टे.चे ठाणेदार आर.के. राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू आणि पोलीस यंत्रणेला सोबत घेऊन आज सकाळी चार वाजताच्या सुमारास हा लवाजमा घोणसरा येथे धडकला.अधीच्या माहिती वरून घोणसरा येथील गांजा लागवड करणाऱ्या संशयितांना पोलिसांनी आधी ताब्यात घेतले. त्यानंतर विचारपूस करून दुर्गम भागातील शेतशिवारात गांजाच्या शेतीची शोधमोहीम हाती घेण्यात आली. घटनास्थळावरील प्रत्यक्ष गांजाची लागवड पाहून पोलिसांचे डोळेही विस्फारले. २५ ते ५० एकर क्षेत्रात काही या ठिकाणी काही त्या ठिकाणी अशी ठराविक अंतरावर कापूस आणि तूर पिकांमध्ये अंतरपिकांप्रमाणे गांजाची लागवड करण्यात आल्याचे पाहून पोलिसांनाही धक्का बसला. नेमक्या किती एकर क्षेत्रावर गांजाची लागवड करण्यात आली याचा तपास करण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत २० क्विंटल पेक्षा जास्त गांजाची झाडे कापून पोलिसांनी ताब्यात घेतले. अजूनही काही शेतांमध्ये गांजाची लागवड केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून शोध मोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे.

    चौकट

    पाच वर्षापासून केली जाते गांजाची शेती

    घोणसरा, बरगेवाडी आणि काही गावात मागील पाच वर्षापासून छुप्या पद्धतीने गांजाची शेती करण्यात येत होती. चौकशी करताना ही बाब उघड झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांनी उपस्थित पत्रकारांना दिली. ही कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड आज स्वतः घोणसरा शेत शिवारात दाखल झाले होते. दुर्गम भागात असलेल्या शेत शिवारात किमान दोन ते तीन कि.मी.अंतर पायी चालत डॉ. पवन बनसोड यांनी कारवाई बाबत पोलीसांना सूचना दिल्या.

    चौकट

    घोणसरा येथील गांजाचे लातूर-मुंबई कनेक्शन

    घोणसरा- बरगेवाडी शिवारात पिकविण्यात येत असलेल्या गांजाचे थेट लातूर आणि मुंबई येथे कनेक्शन असल्याचे कळते. लातूर येथे हॉटेल व्यवसाय करणारा गनी भाई नामक व्यक्ती गांजाची खेप घेऊन जात असल्याची चर्चा घोणसरा गावात होत आहे. या शिवाय मुंबई येथून काही घाऊक खरेदीदार घोणसरा येथे गांजा खरेदी साठी येत असल्याची कुजबूज नागरिक करित आहेत.