शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडू नयेत असे साहित्य निर्माण व्हावे – कृषिमंत्री ना धनंजय मुंडे

85

🔹१५ व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन

✒️अहमदनगर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

अहमदनगर(दि.7ऑक्टोबर):- शेतकऱ्यांचे दुःख, वेदना सहन करण्याची ताकद तुमच्या साहित्यातून मिळाली पाहिजे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची मानसिकताच तयार होऊ नये असे साहित्य निर्माण करण्याची शपथ आपण सर्वांनी घेतली पाहिजे. अशी अपेक्षा या संमेलनाचे उद्घाटक राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य व अहमदनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या पद्मश्री कवी ना. धो. महानोर साहित्य नगरीत संपन्न होत असलेल्या १५ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

संमेलनाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर, स्वागताध्यक्ष आमदार संग्रामभैय्या जगताप, आ. अरुण काका जगताप, माजी संमेलनाध्यक्ष आ. लहू कानडे, माजी संमेलनाध्यक्ष कवी इंद्रजित भालेराव, महापौर रोहिणी ताई शेंडगे, उप महापौर गणेश भोसले, एल. अँड टी. चे मुख्य व्यवस्थापक अरविंद पारगावकर, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब भोसले, प्रा. शिरीष मोडक, उद्योजक नितीन दौडकर, सोमनाथ बेंद्रे, सचिन धुमाळ, सुनिल मुनोत, सचिन जगताप, शब्द गंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सचिव सुनिल गोसावी, खजिनदार भगवान राऊत, कार्याध्यक्ष डॉ. अशोक कानडे, संयोजन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे आदी मान्यवर यावेळी विचारपिठावर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना ना. धनंजय मुंडे म्हणाले की, शब्दगंध साहित्य संमेलनाच्या निमित्ताने डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यातील दडलेले साहित्यिक समाजासमोर आले. त्याच बरोबर आ. संग्राम भैय्या जगताप यांनी या संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद स्वीकारले ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. संत ज्ञानेश्वरांनी १६ व्या वर्षी याच जिल्ह्यातील नेवासे येथे ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला.पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू नगरच्या लाल किल्ल्यात बंदिस्त असताना त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान हा ग्रंथ लिहिला. अशी अत्यंत उच्च कोटीची साहित्यिक परंपरा नगर जिल्ह्याला लाभली आहे. तोच वारसा शब्दगंधच्या माध्यमातून पुढे जात आहे. यावेळी त्यांनी कवी इंद्रजित भालेराव यांची गावाकड चल माझ्या दोस्ता, पद्मश्री ना. धो. महानोर यांची या नभाने या भुईला दान द्यावे. तर कवी प्रकाश होळकर यांची शेतकऱ्यांची व्यथा वेदना मांडणारी कविता सादर केली. साहित्यिकांसमोर ए.आय. तंत्रज्ञानाचे मोठे आवाहन असल्याचे त्यांनी सांगितले.

संमेलनाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर म्हणाले की, समाजाचे आरोग्य राखण्याचे काम संत, महंत, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय व्यक्ती बरोबरच साहित्यिकही प्रामाणिकपणे करत असतात. समाज भान ठेवून अनेक साहित्यिक आपले कर्तव्य पार पाडतात. त्यामुळेच माणसांच्या जीवनात आनंद आणि समाधान ही मिळत असते. प्रत्येकाने आपल्यातील दोष, उणीवा बाजूला ठेवून इतरांना मदत करीत एकमेकांच्या साहाय्याने पुढे जात राहिले पाहिजे व मातृभूमीची सेवा केली पाहिजे. शब्दगंध साहित्यिक परिषदेने १५ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाची जब्बादरी दिली त्याबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले. आपल्या भाषणातून त्यांनी अहमदनगर जिल्ह्याचे साहित्यातील योगदान, कला व कलावंत, समाज माध्यमांची जबाबदारी अशा अनेक विषयांवर भाष्य केले. काळोखात रात्रीच्या माझे दिवे माळले मी l असतील जितुके तितुके सारे पाष टाळले मी l या कवितेने त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाचा समारोप केला.

स्वागताध्यक्ष आ. संग्राम भैय्या जगताप म्हणाले की, अहमदनगर जिल्हा ही संत, महंत, साहित्यिक, कलावंतांची पावन भूमी आहे. या भूमीतील साहित्यिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून शब्दगंध साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद आपण स्वीकारले. या संमेलनात साहित्यिक कार्यक्रम बरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत मैफल, लोककला सादरीकरण, एकांकिका, आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्र प्रदर्शन, व छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे असे ते म्हणाले. आगामी काळात समाजाची वाचन संस्कृती टिकविण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे. एक पुस्तक म्हणजे एक विचार असतो. तो विचार पेरण्याचे काम समाजामध्ये पुस्तकांच्या माध्यमातून होत असते. साहित्य क्षेत्रात नवीन पिढी निर्माण व्हावी यासाठी प्रत्येकाने लेखन वाचन केले पाहिजे असे ते म्हणाले.

यावेळी माजी संमेलनाध्यक्ष इंद्रजित भालेराव, आ. लहू कानडे, यांचीही भाषणे झाली. सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब भोसले व प्रा. शिरीष मोडक याना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. स्वागताध्यक्ष आ. संग्राम भैय्या जगताप यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. सुनिल गोसावी यांनी प्रास्ताविक केले. शर्मिला गोसावी व उद्धव काळापहाड यांनी सूत्र संचालन केले.

या कार्यक्रमास साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, साहित्य रसिक, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सकाळी ९ वा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासून लोकसाहित्य जागर यात्रा काढण्यात आली होती. सजवलेल्या पालखी मध्ये भारतीय संविधान, फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांची ग्रंथ संपदा ठेवण्यात आली होती. संमेलनाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर, स्वागताध्यक्ष आ. संग्राम भैय्या जगताप, प्रा. माणिकराव विधाते. हमाल पंचायत चे अध्यक्ष अविनाश घुले, अभिजित खोसे, रेश्मा आठरे, वैशाली ससे, डॉ. प्रमिला नलगे, सरोज आल्हाट, सरला सातपुते, संगीता गिरी, शामा मंडलिक यांच्यासह अनेक मान्यवर या लोकजागर साहित्य यात्रेत सहभागी झाले होते.

भगवान राऊत यांनी या लोकजागर साहित्य यात्रेचे समन्वयक म्हणून काम पाहिले. या लोकजागर यात्रेत वासुदेव, पिंगळा जोशी, गोंधळ पथक, शाहिरी पथक, धनगरी ढोल पथक, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थिनींचे लेझिम पथक सहभागी झाले होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुस्तक मेळा, शब्दगंध चित्र व छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या झाले. उद्घाटन कार्यक्रमानंतर दुपारी ४ वा. कवी संमेलन व कथाकथन झाले.यावेळी प्राचार्य डॉ.जी.पी ढाकणे, प्राचार्य चंद्रकांत भोसले, संदीप गोसावी, संजय खामकर, राजेंद्र पवार, शर्मिला रणधीर, प्राचार्य विलास साठे यांनी विशेष परिश्रम घेतले