“महाजॉब्ज अप्लिकेशन” लॉन्च मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण

15

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.27जुलै):-उद्योग विभागाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या ‘महाजॉब्ज ॲप्लिकेशन’चे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. उद्योग क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांचा भूमिपुत्रांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.

उद्योग, कामगार तसेच कौशल्य विकास विभागाच्या वतीने स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी ६ जुलै रोजी महाजॉब्ज वेबपोर्टलचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

अवघ्या दोन दिवसांत लाखभर तरुणांनी नोकरीसाठी नोंदणी केली होती. तरीही ही प्रक्रिया अधिक सुकर व्हावी व तरुणांना हे पोर्टल सहजपणे वापरता यावे, यासाठी मोबाइल ॲप्लिकेशन विकसित करण्याची सूचना ठाकरे यांनी केली होती.त्यानुसार महाजॉब्ज हे ॲप विकसित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाजॉब्ज ॲपचे अनावरण करण्यात आले.

मोबाइल ॲपमुळे तरुणांना विनासयास नोकरी शोधणे शक्य होईल. आपल्या पसंतीनुसार नोकरीचे ठिकाण देखील निवडता येईल तसेच तरुणांना रोजगारासंबंधी सर्व माहिती आपल्या मोबाइलमधून सहज मिळणार आहे. नोकरी मागणारे आणि देणारे यांच्यातील संवाद यामुळे वाढण्यास मदत होईल, असे ठाकरे म्हणाले.

🔹ॲपमध्ये खालील माहिती भरणे आवश्यक:-

वैयक्तिक माहिती (नाव, जन्म तारीख, सध्याचा पत्ता, कायम पत्ता, इ.)
मोबाइल क्रमांक( आवश्यक)
इमेल आयडी(वैकल्पिक)
अनुभव, कौशल्य आणि बायोडेटा
पॅन क्रमांक (वैकल्पिक, उपलब्ध असल्यास)
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (जोडणे आवश्यक)

 

🔸अशी करा नोंदणी:- 

नोकरी शोधणार्यांनी मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन नोंदणी करू करावी.

ज्यामध्ये त्यांना ओटीपी प्राप्त होईल, आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.नोंदणीनंतर वापरकर्ता मोबाइल किंवा इ मेलद्वारे लॉगिन करून आपले प्रोफाइल भरू शकतात.

महाजॉब्स मोबाईल ‘ॲप’ची वैशिष्ट्ये:-

नोकरी शोधणारे आपला प्रोफाइल आणि बायोडेटा काही सोप्या क्लिकसह अपडेट करून अर्ज करू शकतात. ज्यामध्य वैयक्तिक माहिती, पत्ता, शैक्षणित माहिती, कौशल्य, अनुभव, कोणत्या जिलह्यात काम करण्याची इच्छा आहे. रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करणे आदी सुविधा उपलब्ध आहेत.नवीन कौशल्ये व इतर माहिती तो भरू शकतो. संपूर्ण माहिती भरलेले प्रोफाइल उद्योजकांना दिसतील.

नोकरी शोधक आपले कौशल्ये, शैक्षणिक पात्रता, मागील कामाचा अनुभव, क्षेत्र, प्रोफाइल तपशील, उदयोगाच्या पसंतीनुसार संबंधित नोकऱ्या शोधू शकतात. यासाठी वेगवेगळ्या फिल्टरची सोय दिलेली आहे.

नोकरी शोधणारे उमेदवार अनेक ठिकाणी अर्ज करू शकतात. अर्ज केलेल्या नोकरीची स्थिती सहजपणे पाहू आणि ट्रॅक करू शकतात.

उद्योजकाने त्याला शॉर्टलिस्ट केले असल्याचे तसेच मुलाखतीनंतर निवड केल्यास त्यासंबंधी अलर्ट पाठविले जातील. सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी संगणकावर लॉगिन करून पाहण्याची गरज नाही. त्याऐवजी मोबाइल झटपट पाहता येईल.

फ्रेशर्स तसेच अनुभवी उमेदवार यासाठी नोंदणी करू शकतात. नोंदणी प्रक्रिया सर्वांसाठी विनामूल्य आहे. अँड्रॉइड मोबाइलवर हे ॲप उपलब्ध आहे.