” डॉ.कमलाकर पायस यांचा कै. मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठान तर्फे सत्कार संपन्न “

162

” डॉ.कमलाकर पायस सर एक प्रभावी व्यक्तिमत्त्व ” – प्रा.अरुण बुंदेले

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.21ऑक्टोबर):-” एकविसावे शतक आणि बावीस प्रतिज्ञा,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक दृष्टिकोन, बुद्ध धम्म विचार आणि दृष्टिकोन, आंबेडकर साहित्य समीक्षा,डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अंबादेवी मंदिर प्रवेश सत्याग्रह या प्रकाशित झालेल्या डॉ. कमलाकर पायस यांच्या पुस्तकातून आणि प्रत्यक्ष अनेक व्याख्यानातून त्यांनी तथागत गौतम बुद्ध यांचे मानवतावादी तत्त्वज्ञान आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा समाजापर्यंत पोहोचवून समाजप्रबोधन करण्याचा जो प्रयास केला तो महत्त्वपूर्ण असून आजही सरांचे विविध विषयावरील समाज प्रबोधन आणि विद्यार्थी मार्गदर्शन सुरूच आहे,अशा या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे प्रतिष्ठान तर्फे हार्दिक अभिनंदन .” असे प्रतिपादन अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी केले.

ते तक्षशिला महाविद्यालय, अमरावती येथील प्रभारी प्राचार्य डॉ.कमलाकर पायस यांचा त्यांच्या सामाजिक,साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील भरीवकार्याबद्दल झालेल्या सत्काराच्या प्रसंगी विचार व्यक्त करीत होते.महाबोधी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष,इंडियन नेट सेट असोसिएशन ( I N S A ) महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारधारामध्ये गुणवत्ता यादीत प्रथम येऊन एम.ए.पदवी प्राप्त करणारे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र राज्याचे सदस्य,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल वाचनालयातून ग्रामीण भागातील वाचन संस्कृती समृद्ध करणारे मांजरी म्हसलाचे संस्थापक सचिव,राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील ४१ लघुशोध निबंध प्रकाशित करणारे संशोधक,बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेचे प्रचारक व प्रसारक आणि परिवर्तनवादी लेखक – समीक्षक प्र.प्राचार्य डॉ.कमलाकर पायस सरांचा त्यांच्या सामाजिक,साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांनी शाल,पुष्पगुच्छ,निखारा व अभंग तरंग हे स्वलिखित काव्यसंग्रह आणि दारूनं मेला ओ माय, नळावरची झोंबाझोंबी,भद्याचं लगीन या स्वलिखित सामाजिक एकांकिका भेट देऊन केला.

” विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची प्रेरणा निर्माण करणारे प्रा.बुंदेले यांचे प्रतिष्ठान “
-प्राचार्य डॉ.कमलाकर पायस

सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती डॉ.कमलाकर पायस सरांनी, ” सत्काराबद्दल मी प्रतिष्ठानचा आभारी आहे आणि प्रतिष्ठानतर्फे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रासाठी जे विविध प्रकारचे कार्य सुरु आहे त्याबद्दल कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानला शुभेच्छा देतो. विशेष म्हणजे आपल्या प्रतिष्ठान तर्फे आई – वडिलांच्या नावे प्रा.बुंदेले सर दरवर्षी” कै.मैनाबाई बुंदेले स्मृती पारितोषिक ” व “कै.बाबारावजी बुंदेले स्मृती पारितोषिक ” दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम,सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व पुस्तके सस्नेह भेट देऊन प्रदान करतात.असे विद्यार्थ्यामध्ये अभ्यासाची प्रेरणा निर्माण करणारे प्रा.बुंदेले यांचे प्रतिष्ठान आहे.असेच कार्य त्यांच्या प्रतिष्ठान तर्फे पुढेही होत राहो,ही सदिच्छा.”असे विचार व्यक्त केली.

याप्रसंगी तक्षशिला महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच साहित्यिक – कवी मा.शिवा प्रधान,युवाशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालयातील मराठीचे विभाग प्रमुख डॉ.दिनेश किसनराव राऊत,श्री साहेबराव सैरिसे यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी कवी मा.शिवा प्रधान व प्रा.डॉ.दिनेश राऊत यांनी डॉ.कमलाकर पायस सरांचे अभिनंदन केले आणि मनोगतातून आपले विचार व्यक्त केले.

डॉ.कमलाकर पायस सर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील भाषा अभ्यास मंडळाचे माजी सदस्य आहेत. दीक्षाभूमी स्मारकाचे शिल्पकार : दादासाहेब गवई विशेषांक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेषांक ,बुद्ध जयंती विशेषांकाचे ते संपादक आहेत. साप्ताहिक रिपब्लिकन संदेशचे सर कार्यकारी संपादक आहेत. B.Com. भाग 2 ला ” अनुबंध ” तर B.Com.भाग 3 ला ” आशय ” ही अभ्यासक्रमात असलेली दोन पुस्तके संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने संपादित केलेली आहेत,या संपादक मंडळातील डॉ.कमलाकर पायस सर सदस्य आहेत.अशा या प्रभावी व बहुआयामी व्यक्तिमत्वाचा सत्कार कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानतर्फे झाला. हा सत्कार म्हणजे डॉ.पायस सरांच्या कार्याचा सत्कार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.