भविष्यात झेरॉक्स मशिन अस्तित्वात राहिल का हो..?

139

[विश्वात पहिले झेरॉक्स मशिन निर्माण दिवस]

एखाद्या प्रक्रियेचे नाव सर्वनाम होणे किंवा क्रियापद होणे, ही त्या प्रक्रियेच्या लोकमान्यतेचीच खूण असते. आज जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात, एखाद्या दस्तऐवजाची आहे तशी प्रत काढणे, याला त्याची झेरॉक्स काढणे असेच म्हटले जाते. इतक्या लोकोपयोगी आणि लोकप्रिय तंत्राचा शोध मात्र केवळ शोधकाच्या गरजेतून लागला. चेस्टर कार्लसन नावाच्या अमेरिकेतील स्वामित्व हक्कनोंदणी कार्यालयात काम करणाऱ्या गृहस्थांना, रोज अनेक कागदांच्या प्रती तयार करायला लागायच्या. कार्लसनला संधिवात असल्याने हे काम त्यांना अतिकष्टदायक होत होते. ते कष्ट कमी करण्यासाठी काही यांत्रिक उपाय शोधावेत म्हणून ते कामाला लागले. घरच्या स्वयंपाकघरात त्यांनी प्रयोग सुरू केले आणि दि.२२ ऑक्टोबर १९३८ रोजी प्रकाशाचा वापर करून प्रती तयार करण्याचे नवीन तंत्र विकसित करण्यात यश मिळविले.

सन १९३९ ते १९४४पर्यंत त्यांनी आयबीएम, जीई यांसारख्या विस कंपन्यांचे उंबरठे झिजवले, पण कुणालाच या यंत्रात काही दम आहे, असे वाटले नाही. अखेर सन १९४७मध्ये हॅलोईड कॉर्पोरेशन या न्यूयॉर्कमधील एका छोट्या कंपनीने यात रस दाखवला आणि या यंत्रांचे व्यावसायिक तत्त्वावर उत्पादन करायची तयारी दाखवली. कार्लसन तोपर्यंत या तंत्रज्ञानाला इलेक्ट्रोफोटोकॉपीइन्ग याच नावाने संबोधत होते. हॅलोईडला हे नाव फार लांबलचक वाटल्याने त्यांनी याला झेरोग्राफी हे नाव दिले. ग्रीक भाषेत याचा अर्थ ड्राय रायटिंग- कोरडे लिखाण असा होतो. या तंत्रावर चालणाऱ्या यंत्रांना त्यांनी झेरॉक्स यंत्रे असे नाव दिले आणि पुढे आपल्या कंपनीचे नावही झेरॉक्स कॉर्पोरेशन असे बदलले.

झेरॉक्स यंत्राची माहिती घेण्याआधी आपण जरा यामध्ये वापरले गेलेले शास्त्र आणि तंत्रज्ञान समजावून घेऊ. आपण सर्वानीच लहानपणी कपड्यावर फुगा घासल्यावर तो कपड्याला चिकटला जाण्याची जादू अनुभवली आहे. याचे शास्त्रीय कारण स्थिर विद्युत असते, हेही शाळेत शिकल्याचे आठवत असेल. पण यात नक्की काय होते ते पाहू. फुगा कापडावर घासल्याने कापडाच्या पृष्ठभागावरील इलेक्ट्रॉन मोकळे होतात आणि फुग्याला चिकटतात. कापडावरील इलेक्ट्रॉन कमी झाल्याने तो घनभारित- पॉझिटिव्ह होतो तर फुग्यावरील इलेक्ट्रॉन वाढल्याने तो ऋणभारित- निगेटिव्ह होतो. दोन विरुद्ध भाराचे पृष्ठभाग एकमेकांसमोर आल्याने ते एकमेकांना चिकटतात. आता याचा झेरोग्राफीशी काय संबंध? तर विद्युत आणि चुंबकत्व या दोन ऊर्जांनी बनलेल्या प्रकाशामुळे कार्यान्वित होणारा प्रकाशवाहक- फोटोकण्डक्टर हा या तंत्रातील महत्त्वाचा घटक होय. जेव्हा कुठल्याही प्रकाशवाहकावर प्रकाश पडतो तेव्हा त्याचा प्रकाशित झालेला भाग विद्युतभारित होतो, हे तत्त्व या तंत्रज्ञानात वापरले गेले आहे.

यंत्रात कार्यप्रणाली अशी चालते- १) प्रभारीकरण- चार्जिंग: प्रकाशवाहक पदार्थाचा थर असलेला दंडगोल उच्च दाबाच्या स्थिर विद्युतभाराने भारित करण्यात येतो. प्रकाश पडल्यावर विद्युतवाहक बनणाऱ्या सेलेनियम नावाच्या अर्धवाहकाचा याकरता उपयोग केला जातो. २) प्रकाशात आणणे- एक्स्पोजर: प्रखर प्रकाशाचा झोत, ज्याची प्रत काढायची आहे त्या मूळ कागदावरून, प्रकाशवाहक दंडगोलावर परावर्तित करण्यात येतो. कोऱ्या भागावरून येणारा प्रकाश त्या भागातील दंडगोलाला विद्युतवाहक बनवतो आणि त्यामुळे त्यातील विद्युतभार जमिनीत जाऊन- अर्थिंग नाहीसा होतो. मूळ कागदावरील मजकूर-चित्रे असलेल्या भागावरून प्रकाश परावर्तित न झाल्याने त्या भागाला सामोरा गेलेला दंडगोलाचा भाग ऋणभारितच राहतो. यालाच स्थिर विद्युत सुप्त- लॅटेंट प्रतिमा म्हणतात. ३) प्रकटीकरण- डेव्हलॅपिंग: प्रतिमा प्रकट करण्यासाठी टोनर- कोरडी रंगीत रासायनिक पूड (शाई नव्हे) वापरतात. ही पूड घनभारित असते. ज्याप्रमाणे फुग्याच्या खेळात फुगा कापडाला चिकटतो, तशीच जेव्हा ही पूड दंडगोलाच्या संपर्कात येते, तेव्हा दंडगोलाच्या ऋणभारित भागावर चिकटते. ४) हस्तांतरण- ट्रान्सफर: दंडगोलावरील ऋणभारापेक्षा जास्त ऋणभार दिलेला कागद जेव्हा दंडगोलाच्या संपर्कात येतो, तेव्हा दंडगोलावर चिकटलेली पूड कागदावर चिकटते आणि या कागदावर मूळ कागदाची हुबेहूब प्रतिमा तयार होते. ५) वितळणे- फ्युजिंग: प्रतिमा उमटलेला कागद दाब देणाऱ्या रोलरमधून पुढे पाठवताना गरम वातावरणाला सामोरा जातो त्यामुळे टोनरची पूड कागदावर वितळून घट्ट चिकटते.

प्रत काढण्याची प्रक्रिया: अ) ज्याची प्रत काढावयाची आहे, तो कागद यंत्रातील काचेवर ठेवला जातो आणि त्यावर झाकण ठेवले जाते. आ) दिव्याचा प्रखर झोत कागदावरून परावर्तित केला जातो. कागदावरील प्रतिमेनुसार कमी-जास्त प्रकाश परावर्तित होतो. जिथे कागद कोरा आहे, तिथून जास्त तर जिथे काही लिहिलेले आहे तिथून कमी किंवा अजिबात नाही. इ) मूळ कागदाची विद्युत छाया सेलेनियम या प्रकाशवाहकाचा थर दिलेल्या सरकत्या पट्टीवर पडते. आधुनिक यंत्रात दंडगोलाऐवजी पट्टा वापरतात. ई) पट्टा सरकताना ही छायाप्रतिमा आपल्याबरोबर पुढे नेतो. उ) टोनरच्या डब्याजवळून जाताना त्यातील पूड पट्टीवर पसरली जाते. ऊ) विद्युतभारित पूड पट्टीवर मूळ कागदाची प्रतिमा बनवते. ए) दुसऱ्या सरकत्या पट्टीवरून कोरा कागद सोडला जातो. या कागदाला विद्युतभारित केले जाते. ऐ) विद्युतभारित कागद पहिल्या सरकत्या पट्टीजवळून जाताना त्यावरील टोनरची पूड या कागदावर खेचली जाते आणि क्षणार्धात मूळ कागदावरील प्रतिमा कोऱ्या कागदावर उमटते. ओ) कागद पुढे दाब देणाऱ्या दोन गरम रोलरमधून सरकताना त्यावरील टोनरचे कण वितळून कागदावर कायमस्वरूपी प्रतिमा तयार करतात. औ) यंत्रातून मूळ कागदाची हुबेहूब- गरमागरम प्रत बाहेर पडते.

रंगीत प्रती छापताना हेच मूलभूत तंत्र वापरले जाते, फक्त मूळ प्रतिमेच्या छायेतील विद्युतभार वाचून त्याप्रमाणे मूळ रंगाच्या विरोधी रंगाची (लाल- सियान, हिरवा- मॅजेन्टा, निळा- पिवळा) पूड योग्य त्या प्रमाणात पट्टीवर सोडली जाते आणि रंगीत प्रकाशचित्र प्रत यंत्रातून बाहेर पडते. ही यंत्रे डिजिटल तंत्र वापरून चालवता यायला लागल्यापासून मूळ प्रतिमा यंत्रात स्मृतीमध्ये साठवली जाते आणि लेसर तंत्राने छापली जाते किंवा प्रत काढली जाते. आता तर संगणक तंत्र अधिक प्रगत झाल्यामुळे कुठलाही कागद वा प्रतिमा सांख्यिकी- डिजिटल तंत्राने संगणकात साठवता येतात आणि त्याच स्वरूपात कुठेही पाठवता येतात. त्यामुळे भविष्यकाळात झेरॉक्स यंत्र असेल की नाही, हा प्रश्नच आहे!

!! झेरॉक्स मशिन निर्माण दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!


✒️श्री कृ. गो. निकोडे, से. नि. अध्यापक.पोटेगावरोड, गडचिरोली, जि. गडचिरोली.भ्रमणध्वनी क्रमांक- ७७७५०४१०८६