शासनाच्या धोरणाविरुद्ध शिक्षक संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन !…

174

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगाव(दि 23ऑक्टोबर):-राज्य शासनाच्या दिनांक ६ सप्टेंबर २०२३ च्या खाजगी कंत्राटदार संस्था पैनल यांना मंजुरी देणे व दिनांक १८ सप्टेंबर २०२३ च्या शाळा दत्तक योजना या निर्णयांमुळे राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे परस्परपूरक गुणवत्तापूर्ण शिक्षण अध्ययन अध्यापनाचे सहसंबंधीत – व्यवस्था विस्कटित झाली आहे बेरोजगार शिक्षक उमेदवार कंत्राटदाराच्या विळख्यात व विद्यमान सेवेत कायम असलेले लक्षावधी शिक्षक अतिरिक्त संवर्गाच्या चक्रव्यूहात अडकण्याची शक्यता असल्याने व्यापक समाज हिताच्या रक्षणासाठी संघटनेने आंदोलन सुरू केलेले आहे.

माननीय तहसीलदार यांचे मार्फत निवेदन देण्यात येऊन सदर शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे तसेच जिल्हा भरातून वीस हजार पालकांचे पोस्ट कार्ड व जिल्ह्यातील सर्व शाळांच्या पालक शिक्षक संघाचे ठराव मा. शिक्षण मंत्री यांचे कडे पाठविण्यात येणार आहेत. उपरोक्त संदर्भिय शासन निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनात बाह्य यंत्रणेद्वारा कंत्राटी पध्दतीने शिक्षक पदे भरण्यासंबंधीचे आदेश रद्द करण्यात यावेत, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद / महानगरपालिका / नगर पालिका शाळांसाठी दत्तक शाळा योजना राबविण्यासंबंधीचा निर्णय रद्द करण्यात यावा., राज्यातील शाळांच्या शैक्षणिक सबलीकरण व संसाधने उपलब्ध करणे यासाठी राज्याच्या अर्थ संकल्पात शिक्षण विभागासाठी राज्याच्या सकल उत्पन्नाच्या किमान सहा टक्के भरीव तरतूद करण्यात यावी. ,विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण अध्ययन अध्यापनाचा लाभ मिळण्यासाठी शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्याचे धोरण रद्द करण्यात यावे, शिक्षणाचे कंपनीकरण व कंत्राटीकरण थांबवून कंपन्यांकडून शासनास अभिप्रेत CSR शासनाकडे जमा करुन राज्यात समन्यायी पध्दतीने वितरीत करणारी स्वतंत्र यंत्रणा शासनाने प्रस्तावित करावी

समूह शाळा विकसित करणारे निर्णय रद्द करुन राज्यातील कमी पटसंख्येच्या वाड्या वस्तीवरील शाळांना संरक्षण देण्यात यावे. आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत.यावेळी माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सी के पाटील, तालुका टीडीएफ चे अध्यक्ष डी एस पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस एस पाटील, ग्रंथालय विभागाचे मोहन नाना पाटील, मुख्याध्यापक डॉ संजीव कुमार सोनवणे, अंग्लो उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख शकील सर,अकील सर, इंदिरा गांधी विद्यालयाचे एन बी पाटील, आर एन पाटील, आर पी पाटील,आदर्श चे एस एस सोनवणे, किरण चव्हाण ,पी आर चे उमाकांत बोरसे,एस के बेलदार,गणेश सिंह सुर्यवंशी, प्रशांत महाजन,आर जे धनगर, महात्मा फुले हायस्कूल चे पी डी पाटील,एस एन कोळी, हेमंत माळी, नाईक संस्थेचे प्रवीण पाटील, फिलिप गावित,तुषार नाईक,पंकज कोळी, संदीप मनुरे यांच्यासह तालुक्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते