आ.डॉ.गुट्टेंच्या मध्यस्थीने ‘त्या’ उपोषणाचा पेच सुटला, पारदर्शी चौकशी होणार

71

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.8नोव्हेंबर):-तालुक्यातील मौजे.झोला पिप्री येथील अनुसयादेवी मठ संस्थानाचे विद्यमान मठाधिपती सुरेंद्रगिरी महाराज यांनी गैरकारभार केल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाचा तिढा सोडवण्यात स्थानिक आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांना यश आले आहे. त्यामुळे त्यांच्या मध्यस्थीने गावकरी समाधानी झाले आहेत.

अनुसयादेवी मठ संस्थानला सुमारे ७०० वर्षांची मोठी परंपरा आहे. श्री माहूरगड मठाधिपतींच्या मार्गदर्शनात आजपर्यंत कारभार सुरू होता. मात्र, विद्यमान मठाधिपती सुरेंद्रगिरी महाराज यांनी मनमानी कारभार केला आहे. गोशाळेतील गायी गुरांची बेकायदेशीर विक्री केली आहे, असे आक्षेप उपोषणकर्त्यांनी घेतले होते. त्यामुळे सर्व ग्रामस्थांच्या वतीने गेल्या आठ दिवसांपासून हे आमरण उपोषण सुरू होते.‌ त्यास भरघोस पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे सर्वत्र त्या उपोषणाची चर्चा सुरू होती.

परिणामी, गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी उपोषण स्थळी प्रत्यक्ष भेट दिली. उपोषणकर्त्यांचे म्हणणे समजून घेतले. तसेच सकारात्मक चर्चा करून पारदर्शी चौकशीचे आश्वासन दिले.‌ त्यामुळे ते आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आले.तब्बल ७०० वर्षांची परंपरा असलेल्या या आध्यात्मिक ठिकाणी असा प्रकार घडणे संयुक्तीक नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी माझ्या विनंतीला मान देऊन सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेतले आहे. उपोषणकर्त्यांनी केलेल्या आरोपाची शासनाने गंभीर दखल घेतली असून लवकरच योग्य ती चौकशी करून कडक कारवाई केली जाईल, असे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले.

यावेळी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, पोलीस उपअधीक्षक डॉ.दिलीप टिपरसे, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे, उपोषणकर्ते अजय भिसे, वैभव कुरुडे, विजय भिसे, सिध्देश्वर भिसे, अच्युत भिसे, रघुनाथ भिसे, मोहन भिसे, कुंडलिक भिसे, बाळू भिसे, भारतराव भिसे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सखोल चौकशी करून योग्य ती पावले उचला आध्यात्मिक स्थळी असा प्रकार घडणे दुर्दैवी आहे. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मात्र, त्यांना संस्थान विषयी श्रध्दा व आस्था आहे. म्हणून त्यांच्या भावनेचा आदर करून आरोपांची सखोल शहानिशा करा. सखोल चौकशी करा आणि योग्य ती पावले उचला, अशी सूचना आ.डॉ.गुट्टे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.