” प्रा.अरुण बुंदेले यांची परिवर्तनवादी सत्यशोधक कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड “

161

 

अमरावती ( जि .वा . )
उपेक्षित समाज महासंघ व वऱ्हाड विकास,अमरावतीच्या वतीने दि.२८ नोव्हेंबर २०२३ ला खुले जिल्हा कारागृह,मोर्शी,जि. अमरावती येथे संपन्न होत असलेल्या २१ व्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या परिवर्तनवादी सत्यशोधक कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी परिवर्तनवादी कवी- साहित्यिक-अभंगकार प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांची निवड झालेली आहे.ही निवड महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष व आयोजन समिती प्रमुख सत्यशोधक-समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड, स्वागताध्यक्ष प्राचार्य श्री रामराव वानखडे व सदस्यांनी सर्वानुमते केलेली आहे.
प्रा.अरुण बुंदेले यांनी यापूर्वी
अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन,नांदेड, आंतरराष्ट्रीय ऑनलाइन महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलन,दलित साहित्य संमेलन,विचारयश मासिक साहित्य समूह व शाक्यसिंह बुद्धिस्ट सोसायटी,औरंगाबादच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑनलाईन साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.त्यांचा “निखारा ” या परिवर्तनवादी काव्यसंग्रहाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समाज प्रबोधन काव्यफुले पुरस्कार प्राप्त झालेला असून मातोश्री स्व.सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे वाङमय निर्मिती पुरस्कार सोहळ्यात “निखारा ” या काव्यसंग्रहासाठी उत्कृष्ट वाङमय निर्मिती बदल त्यांना सन्मानित करण्यात आले. प्रा. अरुण बुंदेले यांचा ” अभंग तंरग ” हा दुसरा काव्यसंग्रह व अकरावे पुस्तक दि.१७ फेबुवारी २०२३ ला प्रकाशित झाले आहे. आजपर्यंत नागपूर आकाशवाणी, अकोला आकाशवाणी,ग्रामीण कॉटन सिटी आकाशवाणी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,ग्रामीण दलित साहित्य संमेलन,विदर्भ साहित्य संमेलन , आंबेडकरवादी साहित्य संमेलन,ऑनलाइन साहित्य संमेलन इत्यादी साहित्य संमेलनातील कविसंमेलनामध्ये प्रा.अरुण बुंदेले यांनी आपल्या विविध विषयावरील परिवर्तनवादी कवितांचे गायन व वाचन केलेले आहे.आजपर्यंत त्यांची शैक्षणिक व सामाजिक विषयावरील अकरा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.त्यांना राज्यस्तरीय संत कबीर कविराज पुरस्कारासह आजपर्यंत सामाजिक,
साहित्यिक,शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल एकवीस राज्यस्तरीय व दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे .
प्रा.अरुण बुंदेले यांची २१ व्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनातील परिवर्तनवादी कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.