

नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
नागपूर(दि.30जुलै):-चित्रपट निर्माते विपुल शाह व त्यांच्या सहकाऱ्याची पाच कोटी रुपयांनी फसवणूक करणारा महाठक राजेशकुमार तारेकेश्वर सिंग (वय ४५, रा. रांची) याने पत्नीचेही एक कोटी रुपये हडपून दुसरे लग्न केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून राजेशकुमार याचा शोध सुरू केला आहे. रेणुका राजेशकुमार सिंग (वय ४६,रा. भोरलिंगे ले-आऊट, लक्ष्मीनगर) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
राजेश हा काटोल मार्गावरील एका रिसॉर्टमध्ये काम करायचा. याच ठिकाणी रेणुका यांच्यासोबत त्याची ओळख झाली. राजेश याने रेणुका यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यांच्यासोबत मंदिरात लग्न केले. राजेश हा रेणुका यांच्याच घरी राहायला लागला. दरम्यान, रेणुका यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर राजेश याने भाड्याने राहात असल्याचे बनावट दस्तावेज तयार केले. तसेच अन्य दस्तावेजांवर रेणुका व त्यांच्या आईच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. बनावट दस्तावेजाच्या आधारे त्याने बँकेत खाते उघडले. २०१४ मध्ये राजेश याने एक कोटी रुपयांमध्ये रेणुका यांचे घर विकले. ही रक्कम स्वत:च्या खात्यात जमा केली. त्यानंतर राजेश हा नागपुरातून पसार झाला होता.
इंटरपोलचा अधिकारी म्हणूनही वावरायचा!
रांची येथे जाऊन राजेशने एका तरुणीसोबत दुसरे लग्न केले. याबाबत कळताच रेणुका यांनी बजाजनगर पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. राजेश हा गत दहा वर्षांपासून अशाचप्रकारे अनेकांची फसवणूक करीत आहे. त्याने चित्रपट निर्माता विपुल शाह यांच्यासह अनेकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली आहे. बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचा अध्यक्ष, इंटरपोल, सीबीआयचा अधिकारी सांगून तो नागरिकांचीही फसवणूक करतो. शाह यांची फसवणूक केल्याप्रकरणात
आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी राजेश याला अटक केली होती. काही महिन्यांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला आहे.