चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावाला समृद्ध इतिहास आहे-इतिहास संशोधक अमित भगत

130

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.22डिसेंबर):-स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे इतिहास अभ्यास मंडळाच्या वतीने “चंद्रपूर जिल्हाचा इतिहास” या विषयावर इतिहास संशोधक व अभ्यासक अमित भगत यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

या प्रसंगी इतिहास म्हणजे काय?, इतिहास कसा शोधावा?, आपल्या गावातील इतिहासाचे संशोधन कसे करावे? या विषयी मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी सांगितले की, चंदपूर जिल्हा ऐतिहासिक सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे. चंद्रपूर जिल्ह्यात डायनोसॉराचे अवशेष सापडले. पण ते शाकाहारी होते. उमा नदीच्या पात्रातून चिमूर तालुक्यातील संस्कृती बहरत गेली. प्रागैतिहासिक काळापासून ते चिमूर क्रांती चा त्यांनी आढावा घेतला.

भारतात चिमूर क्रांतीची दखल महात्मा गांधी यांनी कशी घेतली तसेच मुंबई येथील बेस्ट बस कामगार यांचा संप, त्या काळचे प्रसिद्ध अभिनेते पृथ्वीराज कपूर यांची चिमूर क्रांतीकारकाविषयी भावना व दिलेली आर्थिक मदत या बरोबर उतर प्रदेशातील उन्नाव व हाथरस या गावाने क्रांतीकारकाविषयी सहानुभूती दाखवून इंग्रज सरकारचा केलेला ग्रामपंचायत निषेधाचा ठराव या बाबत सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ अश्विन चंदेल, उपप्राचार्य तथा लेप्टनट डॉ प्रफुल्ल बन्सोड यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु विशाखा दांडेकर तर आभार इतिहास विभाग प्रमुख डॉ प्रफुल राजुरवाडे यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्याचा उदंड प्रतिसाद मिळाला.