कवयित्री सरोज आल्हाट ची भावविभोर कविता ‘ अनन्यता’

99

पुस्तकं परिचय : सुनील गोसावी

प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने संधी मिळेल तिथे व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या कल्पना, भावना,आपले विचार हे कवितेच्या माध्यमातून व्यक्त करत असतात.अशीच एक कवयित्री सरोज आल्हाट गेल्या २५ वर्षापासून सातत्याने कविता लिहीत असून अनेक वृत्तपत्र, मासिके , दैनिकांमधून तिची कविता प्रकाशित होत आहेत. जर्नालिम,कम्युनिकेशन, पब्लिक रिलेशन पदविका घेतल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. सामाजिक कार्य करत असताना स्त्रियांच्या व्यथा, वेदना जाणून घेतल्या. कळत्या वयापासूनच त्या आई आणि मावशी सोबत राहातं असल्याने अनेक प्रश्नांना सामोरे जाण्याचा अनुभव त्यांना आला. त्यातूनच त्यांची सामाजिक जाणीव अधिक प्रगल्भ होत गेली.

महिलांच्या व्यथा वेदना कमी करण्यासाठी त्यांनी संस्थेच्या माध्यमातुन प्रयत्न केले. या अनुभवातून सरोज आल्हाट यांची कविता अधिक सकस होत गेली.
पंचवीस वर्षापूर्वी सुरुवातीच्या काळातील त्यांच्या कविता वाचनात आलेल्या होत्या. नंतरच्या काळात आपल्या उद्योग, व्यवसायाच्या निमित्ताने, सामाजिक कामाच्या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातून त्या नाशिक जिल्हात स्थलांतरित झाल्या होत्या. तिथेही त्यांनी आपले काम चालू ठेवले. मागिल वर्षी त्यांनी एकाच वेळी तीन काव्यसंग्रह अश्रूंच्या पाऊलखुणा, सखे,कविता तुझ्या नी माझ्या ही पुस्तक प्रकाशित केले आणि आता नुकताच त्यांचा ‘अन्यनता ‘ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. ” अन्यनता ” खरंतर हा शब्द सर्वसामान्यपणे समजायला किंवा अर्थ लावायला अनोखा किंवा वेगळा वाटत असला तरी जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारा हा शब्द आहे.असे प्रस्तावनाकारांनी म्हटले आहे. सरोज आल्हाट यांचा हा पन्नास पानी काव्यसंग्रह आहे. ज्येष्ठ कवयित्री,पत्रकार नीलिमा बंडेलू काव्यसंग्रहाची पाठराखण करताना म्हणतात,” प्रेम जे सर्व भौतिक नात्यांच्या पलीकडचे आहे, अनन्यता हीच आहे.

ख्रिस्ती हा धर्म नाही, जीवन पद्धती, जीवनाचरण आहे. रोजचे जगणे, प्रेम, शांति,स्नेह, मिश्रता हळवे पण जपणारे आहेत. सरोज च्या व्यक्तिमत्वाची ही स्वभाव वैशिष्ट्ये नैसर्गिकपणे तिच्या कवितेत उतरतात. हा सच्चेपणा केवळ भावनावर आधारित नाही, तर जगण्यात त्या कठोर अनुभवानी आहेत,म्हणजेच सरोज ची कविता ही अनुभवावर आधारित आहे.आई, मावशी, तिच्या स्वतःतील नातेसंबंध आणि यातील विविध भावभावना अधोरेखित करणारा आहे. या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे यांनी केलेले असल्याने या काव्यसंग्रहाचा आलेख अधिकच उंचावलेला आहे.मराठी भाषेतील ज्येष्ठ लेखक, कवी,प्रा.डॉ.मिलिंद कसबे यांनी या काव्यसंग्रहाला प्रस्तावना देऊन आईच्या अस्तित्वाचा ठाव घेणारी अंतस्त कविता सर्वांच्या समोर मांडली आहे.
सरोज अल्हाट यांनी मनोगत व्यक्त करताना ‘ आई… एक महाकाव्य..व्याप्ती इतकी की शब्दलालित्य तोकडे पडाव…तरीही हा अंतरीक प्रयत्न….’ असल्याचे म्हटले आहे. या तिच्या शब्दात अनन्यता अर्थात एकरूपता दिसून येत आहे.

“सरोज आल्हाट यांच्या तरल, संवेदनशील कविता विचार करायला लावणाऱ्या आहेत. त्यांचा नवा कवितासंग्रह मानवी नात्याची ओळख वाचकांसमोर मांडत आहे. आई आणि मुलगी यांच अतूट नातं अधोरेखित करणारी कविता अंतर्मुख करणारी आहे. अनन्यता म्हणजे एकरूपता, बायबलचा सार हेच एकेश्वरी तत्त्वज्ञान, आई म्हणजेच ईश्वर असं मानणारी मुलगी इसाई धर्माचा आचरण शब्दात पेरते . ईश्वर आणि माणूस यातल अंतर नष्ट करते आणि प्रेमाने ओथंबलेल्या आईच्या काळजातल्या प्रेमळ प्रभुशी एकरूप होते. हेच सर्वोच्च कवितेचे सार आहे, जीवनाच्या प्रत्येक वळणावर कधी आईची मैत्रीण तर कधी आईची आई बनण्याची भूमिका सरोजनी घेतलेली आहे आणि त्यातूनच जीवनाचे पदर अधिक सक्षमपणे उलगडले आहेत”. आजच्या धावपळीच्या युगामध्ये कोणालाही कोणाकडे लक्ष द्यायला वेळ नसून जो तो आपापले पहात आहे, अशावेळी बाहेर घेऊन प्रबोधनकारी बनण्याचे आवाहन प्रा.डॉ.मिलिंद कसबे यांनी तमाम लेखक कवींना सरोज च्या माध्यमातून केलेले आहे.

ती आपल्या पहिल्याच कवितेत म्हणते,
‘आई,
तुझा रक्त, मांस पेशीत
आकार घेणारी
एक अकल्पित छाया
मौन धारण केलेल्या
साक्षीदारागत
शब्दाविना ….स्तब्ध
अन अचानक आलेल्या तुफानानं
पर्णहिन करावा वृक्ष
तशी गळून पडते
” ती ” तुझ्यातून
रक्ताने वेढलेली !

एकंदरीत महिला आपल्या मुलांना जन्म देते तेव्हापासून ती आईपण अनुभवत असते.मुलांच्या जनमानेच ती आई बनते. आपल्या मुलाबाळांना पाळण्या पासून चालण्यापर्यंत,शाळेत जाण्यापर्यंत आईच्या बोटाला धरून विश्वासान दमदार पावले टाकत टाकतच आपलं आयुष्य पुढे जात असते. आई आपल्या बाळासाठी अंगाई गात असते. अशाच अंगाई बद्दलच्या आठवणी सरोजच्या कवितेत येतं आहेत.

ती एका कवितेत म्हणते,
आई,
स्वच्छ, शुभ्र
काचेच्या ग्लासातल
नितळ पाणी…..
आई बद्दलच्या नितळ अर्थ भावना अनेक कवींनी आपल्या कवितेतून व्यक्त केलेले आहेत पण ही भावना अतिशय वेगळी आहे.
आपल्या प्राणेश्वरावरा बद्दल लिहिताना त्यांनी म्हटले आहे की,
प्राणेश्वर…. तू गिटारच्या तारेवरची
एक मधूर ट्यून,
माऊलपणानं सुरांना संमोहित करावी तशी……!
तुझ्या उमद्या बाहूवर विसावले कायमचीच…. मुहूर्तमण्यासह….
तर आपल्या मावशी बद्दलच्याही काही कविता तिने शब्दबंद्ध केलेल्या असून ती म्हणते,
‘ममासाठी मार्थेची मार्या, अन माझ्यासाठी
माझ्यासाठी कल्पतरू… अश्रयदाता.. फेरिस्ता…. असेही तिने आपल्या कवितेत मावशीसाठी म्हटले आहे. आपल्या सर्वच कविता कवयित्रीच्या मनातील भावबंद असून वाचक एका बैठकीत त्या सर्व वाचू शकतात, अनेकांना आपले पूर्व आयुष्य या कवितांच्या माध्यमातून आठवेल. म्हणूनच ही कविता अधिक सक्षम झालेली आहे.कवयित्री सरोज अल्हाट यांच्या पुढील काव्यलेखनास शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
*सुनील गोसावी*
संस्थापक सचिव,
शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य.
मो ९९२१००९७५०

काव्यसंग्रह – *अनन्यता*
कवयित्री – *सरोज आल्हाट*
एकूण पृष्ठे. – *५०*
मुखपृष्ठ – *श्रीधर अंभोरे*
प्रस्तावना. – *प्रा.डॉ.मिलिंद कसबे*
किंमत – *पैश्यात तोलन नाही*