गुणवत्तापूर्वक जीवनासाठी मनाचे व्यवस्थापन महत्वाचे-शिवराज माने

81

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.5जानेवारी ):-“मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ या संत तुकारामांच्या युक्तीप्रमाणे आपले मन प्रसन्न असेल तर आपणाला जीवनानंद प्राप्त करून घेता येतो. आपली बुद्धी ज्याच्या आदेशाचे पालन करते, त्या मनाच्या सौंदर्याकडे, सुदृढतेकडे आपण गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. मन हा अक्षय प्रेरणास्त्रोत आहे. तो अखंड प्रज्ज्वलित राहावा, यासाठी मनावर आलेले अविचारांचे, निराशेचे आणि अगतिकतेचे सावट दूर करायला हवे. मन शांत करण्यासाठी आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायला हवे. त्यासाठी मनाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन मा. श्री शिवराज माने यांनी केले. ते श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे राष्ट्रीय सेवा योजना व रोटरी क्लब ऑफ कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “गुणवत्तापूर्वक जीवनासाठी मनाचे व्यवस्थापन” या विषयावर बोलत होते.  

    महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी अध्यक्षीय मनोगतात म्हटले की “मन हे चंचल स्वरूपाचे असते. त्यामुळे आपणास निर्णय घेणे अवघड होते. त्यासाठी मन स्थिर ठेवावे लागते. कोणतेही कार्य मन स्थिर ठेवून केले तर आपण आपले ध्येय लवकर पूर्ण करू शकतो”.

     सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती डॉ. एस. आर. सरोदे यांनी केले. परिचय प्रा. डॉ. एन ए. पाटिल यांनी करून दिला. तर आभार प्रा. डॉ. डी. पी. जाधव यांनी मानले.सदर व्याखानासाठी  वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड या महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी -विद्यार्थिनी  बहुसंख्येने उपस्थित होते.