पत्रकारांनी लेखणीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करावे-पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे

266

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.6जानेवारी):-लोकशाही प्रधान भारत देशात पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जात असल्याने पत्रकार बांधवांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करत अन्यायग्रस्तांच्या प्रश्नाला वाचा फोडावी असे अवाहन पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी गंगाखेड येथील शासकीय विश्राम गृहावर तालुका पत्रकार संघ व व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने दि. 6 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या दर्पण दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना केले.

दरवर्षी प्रमाणे तालुका पत्रकार संघ व व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने दि. 6 जानेवारी रोजी तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दगडूसेठ सोमाणी यांच्या अध्यक्षतेखाली येथील शासकीय विश्राम गृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजयकुमार कुलदीपके, गोविंद यादव, शंकर इंगळे, मो. जावेद इनामदार, नारायण मेहता, तुकाराम आय्या, प्रा. गोविंद चोरघडे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय सुपेकर, अन्वर शेख लिंबेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व पत्रकारांना पुष्पगुच्छ, शाल व पेन देऊन सन्मान करत नुकतेच डॉक्टरेट पदवी प्राप्त झालेल्या डॉ. विजयकुमार कुलदीपके यांचा व माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम समता राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गोविंद यादव यांचा शाल, सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. देशात नव्हे तर संपूर्ण जगात पत्रकारितेला विशेष स्थान आणि महत्व असल्याने प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आपल्या समस्या सरकारच्या कानापर्यंत पोहचत असल्याची सर्वांचीच भावना असल्याचे सांगत समाजातील प्रत्येक घटक पत्रकारांकडे मोठ्या अपेक्षेने पाहत असल्याचे यावेळी बोलतांना पो.नि. कुंदनकुमार वाघमारे सांगितले.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार महालिंग भिसे, राजेश कांबळे, उद्धव चाटे, गुणवंत कांबळे, अली चाऊस, भीमराव कांबळे, भागवत जलाले, शिवाजी कांबळे, राहुल साबणे, ज्ञानोबा कदम, राजकुमार मुंडे, मोहसीन खान, रामकृष्ण बचाटे, शेख महेमूद, अनिल साळवे, प्रदीप गौरशेटे, बाळासाहेब जंगले, गोपाळ मंत्री, राम पवार, तुषार उपाध्याय आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अध्यक्ष संजय सुपेकर यांनी केले. सूत्रसंचालन गुणवंत कांबळे यांनी केले तर आभार अन्वर शेख लिंबेकर यांनी मानले.

पत्रकाराला बातमी लेखण करतांना सामाजिक कार्य करण्याची ऊर्जा निर्माण होत असल्याने पत्रकार हा राजकीय क्षेत्रात प्रवेश घेऊन आपला वेगळा ठसा निर्माण करत असल्याचे सांगत पत्रकाराने पत्रकारिता सोडली तरी ही त्याच्या अंगातील पत्रकार हा कायम सजग असतो असे मत सत्काराला उत्तर देतांना गोविंद यादव यांनी व्यक्त केले तर कोविड काळात बातम्यांसाठी फिरत असताना कोणताही हेतू मनात न ठेवता नजरचुकीने बातमी प्रसारित झाल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी कोविड काळात काही पत्रकारांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. आपली बातमी लवकर प्रसारित व्हावी या हेतूने घाई गडबडीत पत्रकारांकडून अनेकदा कोणताही हेतू मनात न ठेवता बातमी प्रसारित केल्या जाते. कोविड काळात ही अनावधानाने अशा प्रकारची चुकीची बातमी प्रसारित झाल्यामुळे बहुतांश पत्रकारांवर गुन्हे केले झालेले आहेत कोविड काळात पत्रकारांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असल्याचे डॉ विजयकुमार कुलदीपके यांनी सत्काराला उत्तर देतांना सांगितले.