राजमाता माँसाहेब जिजाऊ भोसले

119

जगातील सर्वोत्तम मातृत्व म्हणजे माँसाहेब जिजाऊ. ज्या मातेने या स्वराज्यासाठी एक नव्हे तर दोन – दोन छत्रपती दिले. अशा स्वराज्य संकल्पिका – राष्ट्रमाता – राजमाता – माँसाहेब जिजाऊ यांचा जन्म महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे १२ जानेवारी १५९८ रोजी झाला. महाराष्ट्र राज्यातील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे एक ऐतिहासिक गाव. यादव कुळातील जाधवांचं हे गाव. आज समस्त बहुजनांचे प्रेरणास्थान मातृतीर्थ सिंदखेड राजा म्हणून ओळखले जाते. जिजाऊंच्या वडिलांचे नाव लखुजीराजे जाधव तर आईचे नाव म्हाळसाराणी असे होते. जिजाऊंना चार मोठे भाऊ होते. त्यांचे नाव दत्ताजी, अचलोजी, राघोजी व बहादूरजी असे होते.

चार पुत्रानंतर लखुजीराजेंना कन्यारत्न झाले. मुलगी झाल्याचा आनंद म्हणून गावभर हत्तीवरून साखर वाटण्यात आली. लखुजीराजे सिंदखेडराजाचे जहागिरदार होते. जिजाऊंचं बालपण सिंदखेडराजा येथील लखुजीराजेंच्या राजवाड्यावर गेले. सर्व प्रकारचे शिक्षण याच ठिकाणी बालपणीच जिजाऊंना मिळाले होते. प्राथमिक शिक्षण, तलवार चालविणे, घोड्यावर बसणे, घोड्यावरून रपेट मारणे इत्यादी युद्धविषयक शिक्षणही जिजाऊंना देण्यात आले होते. राजनितीचे धडे व अनेक भाषांचे ज्ञानही जिजाऊंना देण्यात आले होते. मराठी, पारशी, संस्कृत, कानडी, तेलगु, उर्दू, हिंदी अशा अनेक भाषा जिजाऊंना अवगत होत्या.

वयाच्या १२ व्या वर्षी म्हणजे इ.स.१६१० मध्ये जिजाऊंचा विवाह सरदार शहाजीराजे भोसले यांच्यासोबत मोठ्या थाटात संपन्न झाला. शहाजीराजे हे वेरूळच्या मालोजीराजे व उमाबाई यांचे शूरपुत्र होते. जाधव-भोसले ही दोन्हीही तोलामोलाची घराणी. या विवाहामुळे दोन मातब्बर घराणी जोडली गेली. भोसले, जाधव, निंबाळकर, महाडीक, सुर्वे, शिर्के हे अनेक पिढ्यापासून नातेवाईक होते. देवगिरी व विजयनगरचे मराठा साम्राज्य नष्ट झाल्यानंतरही सर्व लढवय्यी मराठा घराणी सोयीनुसार निजामशाही, कुतूबशाही, आदिलशाही, मोगलशाहीमध्ये जहागिरदार सरदार म्हणून सेवेत होते. इ.स.१६२० मध्ये घडलेल्या एका अनाह प्रसंगात नात्यातील एक भाऊ आणि दुसरा एक दीर ठार मारल्या गेले.

परकीय सत्तेसाठी सासर आणि माहेरचं रक्त सांडत होते. मराठ्यांच्या तलवारी मराठ्यांवर चालत होत्या तेव्हा जिजाऊ मनोमन विचार करायच्या की, जाधव-भोसलेंचा इतिहास एकमेकांच्या रक्ताने न लिहिता दोघांच्या रक्ताने स्वराज्याच्या रयतेच्या राज्याचा इतिहास लिहिला गेला पाहिजे. जाधव-भोसल्यांचे रक्त स्वराज्यासाठी कामी आलं पाहिजे.

जिजाऊ- शहाजीराजेंनी स्वराज्य निर्मिर्तीचा निश्चय केला. यासाठी येईल त्या संकटांना सामोरे जायचे ठरवले. स्वराज्याचा लढा उभारण्यासाठी जाधव-भोसले यांनी एकत्र आलं पाहिजे, हा विचार जिजाऊ- शहाजीराजे करू लागले. शहाजीराजे आणि लखुजीराजे हे जावई-सासरे एकत्र आल्यास ते स्वतंत्र राज्य स्थापन करतील, या भितीतून बादशहाने देवगिरी येथे लखुजीराजे यांची तीन मुले आणि एक नातू अशा पाच जणांची कपटाने हत्या केली, एका पाठोपाठ येणारी अशी भयंकर दुःख बाजूला सारून जिजाऊ स्वराज्यासाठी जगत होत्या. माणसं जोडत होत्या. इ.स.१६२१ मध्ये शहाजीराजे जिजाऊंना पहिला पुत्र झाला. त्यांचे नाव संभाजीराजे ठेवण्यात आले.
या देशासाठी सुवर्णदिन ठरतो तो म्हणजे १९ फेब्रुवारी, १६३०. याच दिवशी पुणे जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर राजमाता माँसाहेब जिजाऊंच्या पोटी शिवबाचा जन्म झाला. राजमाता जिजाऊंनी बाल शिवबाला आपल्याला हवं तसं घडवलं. रयतेसाठी आपला जन्म झालेला आहे हे बाल शिवबाच्या मनावर बिंबवलं. शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या संकल्पनेतील स्वराज्य, रयतेचं राज्य, शेतकरी, कष्टकरांचं राज्य निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं.

६ जुन, १६७४ रोजी कुळवाडीभूषण – बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला आणि जिजाऊ – शहाजीराजेंनी संकल्पीलेलं स्वराज्य प्रत्यक्षात आलं. माँसाहेब जिजाऊ या स्वराज्यासाठी एक नव्हे तर दोन – दोन छत्रपती दिले एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व दुसरे स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज या दोघांनाही युद्धनीती, शिवनिती चे धडे माँसाहेबांनी दिले. छत्रपती शिवरायांच्या प्रथम गुरू माँसाहेब जिजाऊ होत्या. शिवराज्याभिषेकानंतर अवघ्या दहा-बारा दिवसांनी राजमाता जिजाऊंनी देहत्याग केला. तो दिवस म्हणजे १७ जून १६७४. रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे राजमाता जिजाऊंची समाधी आहे.

एक आदर्श पत्नी, एक आदर्श माता, एक आदर्श आजी, लेक, सून, सासू अशा सर्वच भूमिका यशस्वीपणे त्यांनी पार पाडल्या. स्वतःच्या कुटुंबापुरता विचार न करता शेवटपर्यंत स्वराज्यासाठी जगणारी एक आदर्श माता म्हणून जिजाऊंचा नावलौकिक आहे.

अशा या स्वराज्यजननी, स्वराज्य संकल्पिका, राजमाता, राष्ट्रमाता, माँसाहेब जिजाऊंना त्रिवार कोटी – कोटी वंदन !…..

✒️मा.पी.डी.पाटील सर(महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव)