मुस्लीम-ख्रिश्‍चन जात्यात!…..मग बहुजन सुपात नसतील?

217

दैनिक मुक्तनायकच्या गेल्या रविवारच्या अंकातील ‘जे आहे ते’ या सदरातील ‘दगडात प्राण फुंकणार! माणसांचा प्राण घेणार!!’ हा संपादकीय लेख महाराष्ट्रातील असंख्य वाचकांना पसंतीस आला. काहींनी प्रत्यक्ष भेटीत, काहींनी फोन करून तर काहींनी व्हॉटस अ‍ॅपवर मेसेज करून अभिनंदन केले. संपादकांच्या धाडसाचे विशेष कौतुक केले. राष्ट्रवादीचे आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यानी राम हा मासांहारी होता अशी इतिहासात नोंद असलेली माहिती दिल्यानंतर विशेषतः आरएसएसच्या भाजपसह विविध संघटनातील रामभक्तांनी आक्रस्ताळपणा केला.

आव्हाडांचे पुतळे फुंकले. राम काय पण रामभक्त असलेले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीसांच्या विरोधातही जो कोणी आवाज काढेल त्यांच्या विरोधात मोहिमच उघडली आहे. विशेष म्हणजे 22 जानेवारीला राम प्राण प्रतिष्ठाच्या कार्यक्रमाच्या 24 तास अगोदरच रामभक्तांना न आवडणारे रामाच्या मुर्तीत प्राण प्रतिष्ठाचे विश्‍लेषण करणे कोणा येड्या-गबाळ्याचे धाडस नव्हे, त्यास वाघाचे काळीज लागते. ते महान कार्य प्रस्तुत संपादकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता जे आहे ते मांडणी करून केल्यासंबंधी अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. दै.मुक्तनायक व्हॉटस् अ‍ॅप व अन्य सोशल मिडीयावरून महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील पुरोगामी, परिवर्तवादी, बुध्दिस्ट वाचत आहेत. अनेकांनी आमच्या जिल्हयात मुक्तनायक सुरू करावा अशी मागणी केली आहे.

या सर्वांचे आभार, धन्यवाद. पण केवळ वाचून चालणार नाही, तर दै.मुक्तनायकमधून संपादकीयसह इतर जितकेही प्रबोधनिय लेख प्रसिध्द होतात ते स्वतःमध्ये परिवर्तन करण्यासाठी असतात. वाचकांनी स्वतःला बदलले पाहिजे, तरच मनुस्मृतीचे रामराज्य येणार नाही. संविधानाचे प्रजाराज्य टिकेल. ज्यात शुद्र म्हणजेच बहुजनांची सर्वांग प्रगती होणार आहे. बहुजन ‘राजा’ होणार आहे.

जगात बुध्दांचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या विज्ञानवादी भारतात 22 जानेवारीला धर्मनिरपेक्ष देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दगडात प्राण फुंकला. रामाला जीवंत केले. पण खरेच दगडात प्राण आणला का? प्राण आणला असेल तर कुठे आहे तो राम? आम्हाला त्यास भेटून देणार का? अशी प्रश्‍ने जगातील लोक विचारत आहेत. भारतातील विज्ञानवादी प्रजेने काय उत्तर द्यायचे? माना खाली घालायची वेळ आणली मनुवादी रामभक्तांनी. जर दगडात प्राण आणलाच असेल तर माणसांची प्रेतेही स्मशानात येण्याऐवजी दगडात प्राण फुंकता येतो असा दावा करणार्‍यांकडेच नेली पाहिजे. म्हणजे मेलेल्या मुडद्यातही प्राण फुंकला की खेळ खल्लास. पुन्हा माणसं जीवंत. रडा-रडीची भानगडच नाही. शंभरदा खोटे बोलले की ऐकणार्‍यांना खोटं हळू हळू सत्य वाटू लागते. हे टेक्निक खोटं हे सत्य करणार्‍यांना चांगले माहित आहे. प्राण प्रतिष्ठाच्या अर्थाचा उलघडा करण्याचे काम विशेषतः वर्तमानपत्रे व टिव्हीवर दिसणार्‍या न्यूज चॅलनवाल्यांचे होते. पण जे आरएसएसचा धर्म मानून व सरकारचे बटीक होवून पत्रकारिता करत आहेत त्यापैकी कोणीच त्यावर भाष्य केले नाही. उलट प्राण प्रतिष्ठा हा कसा योग्य शब्द आहे अशा पध्दतीच्या बातम्या पेरल्या. आपले प्रेस रिपोर्टर आयोध्याला बातमीसाठी पाठवले.

त्यापैकी एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीची रिपोर्टर ज्ञानदा कदम ही बाई आयोध्याला बातम्या करायला गेली होती की दगडात प्राण फुंकायला गेली होती? तेथे जावून रामभक्तीपोटी रडायला लागली. तिचं रडणं बघून लोकांना हसायला येवू लागले. मुर्ख लोक पत्रकार असतील तर लोक येडी होवून चिध्यांच फाडत बसणार आहेत. ते मुर्ख तर आहेतच पण एक नंबरचे उंडगे पत्रकार आहेत. स्वतःला धंद्यावर लावणार आहेत आणि त्यांचे वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी पाहण्यार्‍यांनाही धंद्याला लावणार आहेत. खोट्या बातम्या पेरणार्‍या पत्रकारांना उंडगे म्हणायचे नसेल, तर पोटासाठी वारंगणांचा व्यवसाय करते म्हणणार्‍या महिलेलाही उंडगे म्हणण्याचा कुणाला अधिकार नाही. भारताची विज्ञानवादी ओळख पुसून जावू नये यासाठी लोकांनी अलर्ट राहिले पाहिजे. लढण्यास सज्ज झाले पाहिजे.

आमदार जितेंद्र आव्हाड सारख्या अनेक विचारवंतांनी रामाचे विविध पैलू उलगडले. त्यामुळे रामभक्त चांगलेच खवळले. रामाच्या निगेटिव्ह चरित्रावर बोलायचे नाही अशी सक्त तंबीच दिली जात आहे. रामाच्या मंदिरात मांसाहारी लोकांसाठी प्रवेश निषध्द मानल्याने आव्हाडांनी राम शाकाहारी होता की मांसाहारी हा मांडलेला मुद्दा जसा महत्वाचा होता तसे शुद्र (हिंदू धर्मात जातील विभागलेल्या खाटीक, बुरूड, महार, मांग, मांग गारूडी, संत मातंग समाज, चांभार, चर्मकार, संत रोहिदास समाज, भंगी, संत म्हेत्तर समाज, ढोर, वीर ककय्या समाज सारख्या अस्पृश्य (एससी प्रवर्ग) जाती., धनगर, ओतारी सारख्या भटक्या (एनटी प्रवर्ग) जाती, रामोशी, बेरड, कुलगुटकी, कोचीकोरवी, कोरवी, कैकाडी, भाट, कंजराभाट, जोशी सारख्या भटके विमुक्त जमाती समुहातील (व्हीजेएनटी प्रवर्ग) जाती. तसेच लोहार, सुतार, कुंभार, लोणार, सोनार, कासार, न्हावी, शिंपी, परिट, धोबी, कोष्टी, साळी, माळी, गवळी, तेली, वाणी, तांबोळी इत्यादी (ओबीसी प्रवर्ग) शेकडो जाती, सनगर, कोळी, महादेव कोळी सारख्या (एसबीसी प्रवर्ग) जाती. अशा शुद्र, भटक्या व अस्पृश्य, वनवासी मिळून सुमारे 6 हजार सहाशे जातीचे लोक) रामाचा फोटो डोक्यावर घेवून नाचत आहेत, अशाना संागणे महत्वाचे आहे.

रामाने तुमच्या मूळनिवासी समाजाचा आदर्श ऋषी शंभूकाचा खून का केला? शंभूक हा शुद्र वर्णातील होता. ऋषी शंभुकाने प्राप्त केलेले धर्मशास्त्र रामाच्या धर्मशास्त्र खिलाफ होते. त्याचे ज्ञान ब्राम्हण वर्णासाठी अशुभ आहे. ब्राम्हण वर्णातील एका बालकाला अकाली मृत्यु आला, असे रामाच्या डोक्यात भरवले आणि रामाने शुद्र शंभूकाचा खून केल्याचा काही रामायण ग्रंभामध्ये मांडल्याचा इतिहास व रामाने बहुजन राजा रावणाची बहिणी शूर्पणखा हिचे नाक कापले हा व इतर इतिहास सांगायला नको का? पण सत्य इतिहास सांगितला तर शुद्र जागे होतील. शुद्रांना सत्य इतिहास समजू नये म्हणूनच जितेंद्र आव्हाडसारख्यांना ठार मारण्याच्या धमक्या देवून इतर शुद्रावर दहशत बसवणे. जेणेकरून शुद्रांनी रामालाच मानले पाहिजे, शुद्रांनी आमच्याच धर्मात राहून धर्माचे रक्षण केले पाहिजे. तथापि, शुद्रांना रामाच्या धर्मात कधीच मानाचे स्थान मिळणार नाही. जो कोणी ऋषी शभूंकासारखा शहाणा, विज्ञान होईल त्याचा खून केला जाणार आहे.

क्रांतिबा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जमान्यात भारतात ब्रिटीशांची सत्ता होती म्हणून बरे झाले. अन्यथा क्रां.जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले या शुद्रांनी आपल्या समाज बांधवाना शहाणे करण्याच्या शाळा काढणे हा धर्मशास्त्राचा भंग केला म्हणून, तर मनुस्मृतीमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा अस्पृश्याने उच्च शिक्षण घेणे हा गुन्हा ठरवून त्यांचे प्राण घेतले असते.

बाबरी मशिद-राम मंदिर मुद्दा उकरून काढल्यापासून देश,धर्म व संस्कृतीचा शत्रू मुसलमान व ख्रिश्‍चन असल्याचे बहुजनांच्या डोक्यात भरवले जात आहे. त्यामुळे आजच्या घडीला मुसलमान हाच आपला एक नंबरचा दुश्मन असल्याचे बहुजनांना वाटत आहे. म्हणूनच अधून मधून देशात धार्मिक दंगली होत असाव्यात. राम प्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने देशात अनेक ठिकाणी शोभा यात्रा काढण्यात आल्या. मुंबईतील मीरा भाईंदर येथे काढण्यात आलेल्या शोभा यात्रेतील रामभक्त बहुजनंानी मुस्लीमांची शोधून दुकाने बंद का केली नाहीत म्हणून नासधूस केली. मुस्लीमांना मारहाण केली. त्यामुळे काही मुस्लीमांना संताप येणे सहाजिकच आहे. त्यानी शोभा यात्रेवर हल्ला केला. पण पोलीसांना मुसलमानांचाच हल्ला दिसला. पण त्यानी हल्ला का केला ते जाणून घेतले नाही. पोलीसंानी तत्परता दाखवत हल्ला करणार्‍या संशयित मुसलमानांना अटक केली. त्याच्या पुढे जावून राज्यातील भाजपही असलेल्या सरकारमधील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यानी कारवाई करण्याचे आदेश दिले. स्थानिक महापालिकाने मुसलमानाची रस्त्यावरचे व्यवसाय टार्गेट केलीत.

विनापरवाना व्यवसाय थाटल्याने बुलडोझर लावून व्यवसाय तोडून टाकलीत. उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर व आग्रातील एका मशिदवर रामभक्तांनी आपला भगवा ध्वज लावला. हे गैर कृत्य उत्तर प्रदेशातील भाजप सरकारला दिसले नाही का? आज मुस्लीम, ख्रिश्‍चन हे धर्म परकीय असल्याचे सांगून त्या धर्मातील लोकांना टार्गेट केले जात आहे. मशिद, चर्चवर हल्ला करण्याच्या घटना समोर येत आहेत. अशा हल्ल्यातून मुसलमान, ख्रिश्‍चन धर्मातील लोकांनी हिंदू धर्माचे वर्चस्व मान्य करावे यासाठी खटाटोप सुरू आहे. ब्राम्हण उध्दारक तथा आरएसएसचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांनी 1939 ला लिहिलेल्या ‘वी ऑर अवर नेशनहूड डिफाइन्ड’ पुस्तकात आपल्या धर्म आणि संस्कृतीच्या सरंक्षणासंबंधी काही मते मांडली आहेत.

गोळवलकरांच्या मते, ‘हिंदुस्तान हिंदूंचे आहे आणि त्यामुळे इतर अल्पसंख्याकांना येथे राहायचे असल्यास त्यांनी हिंदूंचे वर्चस्व स्वीकारले पाहिजे.’ एकदा का येथील मुसलमान व ख्रिश्‍चनानी हिंदू धर्माचे वर्चस्व स्वीकारले की मग मात्र मोर्चा हिंदू धर्मातील वर उल्लेख केलेल्या अल्पसंख्यीय जातींच्या बहुजनांकडे वळवला जाईल., जे आज गोळवणकरांच्या विदेशी आर्य धर्माचा झेंडा घेवून थय थय नाचत आहेत.

मनुस्मृती या कायदे कानून ग्रंथात शुद्र म्हणजेच बहुजनासंबंधी कायदे केले आहेत. त्या कायद्यानुसारच हिंदू धर्मात बहुजनांचे स्थान असेल अशी सक्त सूचना आहे. प्रथम बहुजनासंबंधी मनुस्मृतीमधील निवडक कायदे जाणून घेवू. 1.मनात कोणत्याही प्रकारचा किंतु न आणता ब्राम्हणाने शुद्राच्या वस्तु आपल्या ताब्यात घ्याव्यात. कारण स्वतःची चीजवस्तू शुद्राला नसते. तो गुलाम आहे व त्याची जी काही जीचवस्तू असेल तिच्यावर त्याचा हक्क नसतो. त्याच्या धन्याचा असतो (अध्याय-8, श्‍लोक-417), 2.शुद्र धनसंचय करण्याला समर्थ असला तरी त्याने संपत्ती कमावू नये. कारण शुद्राजवळ असलेली संपत्ती पाहिल्याबरोबर ब्राम्हणाच्या चित्ताला वेदना होतात (अध्याय-10, श्‍लोक-129), 3. त्रैवर्णिक (ब्राम्हण, क्षत्रिय व वैश्य) या वर्णात जातीत जन्मलेल्या स्त्रीबरेाबर एखाद्या शुद्राने संभोग केला तर त्या स्त्रीला पालक असो वा नसो त्या शुद्राचे लिंग कापून टाकावे. त्या स्त्रीला पालक नसेल तर त्या शुद्राची सर्व मालमत्ता जप्त करावी व त्याला देहांताची शिक्षा करावी.

(अध्याय-8, श्‍लोक-374), 4.एखाद्या शुद्राने सर्वात वरिष्ठ जी जात आहे त्याच जातीतील मुलीच्या (ब्राम्हण मुलीच्या) प्रेमाची याचना केली तर त्यास देहांताची शिक्षा द्यावी (अध्याय-8, श्‍लोक-366), 5.12. धन्याने शुद्राला स्वतःच्या नोकरीतून मोकळे केले असले तरी तो शुद्र आपल्या गुलामगिरीतून मुक्त होवू शकत नाही. कारण गुलामगिरी ही त्याच्या जन्माची सोबतीण आहे. मग त्याच्यापासून तिला कोण मुक्त करू शकेल? (अध्याय-8, श्‍लोक-412-414), 5.ब्राम्हणाची सेवा करणे हाच शुद्रांचा उत्तमोत्तम धंदा होय, असे सर्वांचे मत आहे. कारण त्या व्यतिरिक्त त्याने दुसरा धंदा केला तर त्यामुळे त्याचा काही फायदा होणार नाही., जो शुद्र आपली सेवाचाकरी करतो, त्याची कुवत, हुशारी आणि कुटुंबस्थिती याबद्दल चौकशी करून त्या मानाने ब्राम्हणांनी घरातील वस्तुतून काही वस्तू त्या शुद्रांचे संगोपन करण्यासाठी दिल्या पाहिजेत., घरात शिल्लक राहिलेले अन्न, जुने कपडे, कुजके धान्य आणि जुनी लोकडी आसने ही ब्राम्हणांनी आपल्या शुद्रास नोकरास द्यावीत. (अध्याय-10, श्‍लोक-121-125) 6.ब्राम्हणाचे मंगलसूचक, क्षत्रियाचे सत्तासूचक, वैश्यांचे संपत्तीसूचक आणि शुद्राचे तिरस्कारदर्शक असे प्रत्येकाचे नाव असावे., ब्राम्हणाचा प्रगतीदर्शक, क्षत्रियाचा सुरक्षादर्शक, वैश्याचा संपत्तीदर्शक आणि शुद्राचा सेवादर्शक असा प्रत्येकाचा उत्कृष्ट गुण असावा. (अध्याय-2, श्‍लोक-31-32). माधव गोळवलकर यांनी लिहिलेल्या ‘बंच ऑफ थॉटस्’ व ‘वी ऑर अवर नेशनहूड डिफाइन्ड’ सारख्या पुस्तकात मांडलेली मते कृतीत आणली जात असतील, तर एकेकाळच्या रामराज्यात तयार केलेल्या मनुस्मृतीचे कायदे पुन्हा रामराज्य आले तर ते लागू होणार. म्हणून ते चुकीचे करत आहेत असे मी अजिबात म्हणणार नाही.

ते लोक त्यंाचा धर्म आणि संस्कृती वाढविण्यासाठी करणे सहाजिकच आहे. म्हणून शुद्रांनी म्हणजेच बहुजनांनी आपल्या विरोधाने भरलेल्या रामराज्याची संस्कृती आणण्यासाठी झटायचे का? याचा पहिला विचार केला पाहिजे. राम प्रतिष्ठा विजय दिन साजरा करणारे सर्वाधिक शुद्रच होते. 26 जानेवारीच्या दैनिक मुक्तनायकमधील प्रस्तुत संपादकांच्या अग्रलेखात उदाहरणदाखल बहुजन समाजातील जातीच्या लोकांनी आपल्या वस्तीत विजय दिन साजरा केल्याचे फोटो प्रसिध्द केलेत. त्या समाजातील रामराज्यला विरोध करणार्‍यांनी आपल्या त्या समाजबांधवांना समजावले का? प्रसंगी त्यांना विरेाध केला का? दोन हात केले का?
एकदा का रामराज्य आले तर मनुस्मृतीचे कायदे नव्या स्वरूपात लागू होणार आहेत. माधव गोळवलकर यानी स्वतंत्र भारतीय संविधान हे पाश्‍चात देशाच्या घटनांचा परिपाक असल्याचे सांगून संविधान नाकारले पाहिजे असे मत मांडले आहे. त्यामुळे आजचे आरएसएसवाले व रामभक्त संविधानाला पर्याय मनुस्मृतीसदृश्य नवीन संविधान लागू करतील. सम्राट अशोक मौर्यानी स्थापन केलेल्या बौध्द संस्थानमध्ये गणराज्य पध्दत होती. सर्वांना समान अधिकार होते. पण ते तत्कालिन माधव गोवळलकराच्या समाज बांधव व विचारधारेंच्या लोकांना मान्य नव्हते. संधी येताच पुष्पमित्र शुंगाने मौर्यांचे संस्थान उलथून टाकले. ब्राम्हण, क्षत्रिय व वैश्यांच्या भल्याचे ‘रामराज्य’ आणले. नरेंद्र मोदींना प्रिय असलेले सरदार वल्लभभाई पटेल हे भाजपत्तर असल्याने त्यांची उत्तर प्रदेशातील उज्जेनमधील मुर्ती तोडायला रामभक्तांनी कमी केले नाही तेथे बहुजनांचे हक्क आणि अधिकार काढून घ्यायला ते मागे पुढे पहाणार नाहीत. त्यांचे संविधान तयार आहे हे आता लपून राहिलेले नाही.

सन 2024 ची लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले तर लोकराज्य नसेल ना निवडणूक मताचा अधिकार. निवडणूक मताचा अधिकार गेला तर मागासांच्या दारात उच्च जातीतील उमेदवार काय पण त्यांचे कुत्रं की मांजरही हागायला येणार नाही. बहुजनांना संविधानाने जितके काही दिले आहे ते यापुर्वी कधीच मिळाले नव्हते. म्हणूनच देश, संविधान व लोकसत्ता टिकवणे काळाची गरज आहे. त्यासाठी छातीचा कोट केला पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे धर्मांतर केले पाहिजे. आपला मूळ बौध्द धम्मात आले पाहिजे. आज ज्यांना आरएसएस, गोळवलकरांचा धर्म, संस्कृती, मनुस्मृती समजली आहे त्यानी ते नाकारले पाहिजे. त्याची सुरूवात दिवाळी, दसरा,शिमगा इ. सर्व सण नाकारून केली पाहिजे. देशाचे राष्ट्रीय सणासह आपले सण साजरे केले पाहिजेत. आपल्या नातेवाईक, मित्रमंडळाना मनुवाद्यांचे धोक सांगितले पाहिजेत. पण गळ्याला आल्याचे आमच्यासारखे कोणीतरी पुराव्या देवून सांगत असताना, दैनिक मुक्तनायक आपले सण साजरे करणे किती महत्वाचे आहे आणि ते कसे साजरे केले पाहिजे इथवर सांगत असतानाही किती बहुजनांनी आपल्या घरात गोळवणकरांच्या धर्माचे सण बंद करून आपले सण सुरू केले? कालच्या प्रजासत्ताक दिनोत्सवाचेच उदाहरण घेवू.

हा राष्ट्रीय सण असताना कित्येक बहुजनांनी त्याच दिवशी मेलेल्या व्यक्तीच्या मातीचा/जलदान विधीचा कार्यक्रम ठेवला होता. गेल्या वर्षी धम्माचे काम करणार्‍या एका प्राध्यापक धम्म विधीकर्त्यांने कोल्हापुरातील एका घरी जलदान विधीचा कार्यक्रम माता रमाई जयंती (7 फेब्रुवारी) दिनी ठेवण्यास त्या दुःखी कुटुंबाला सांगितले. मग बौध्द-बहुजनांच्या घरातून गोळवलकरांच्या धर्माचे सण हद्दपार होतील का? आतातरी वेळीच सावध झाले पाहिजे अन्यथा मुस्लीम, ख्रिश्‍चन आज जात्यात आहेत, भविष्यात सुपात असलेल्या बहुजनालाही जात्यात भरडले जाणार आहे. ते खर्‍या अर्थाने ‘रामराज्य’ असेल.


✒️देवदास बानकर(संपादक दैनिक मुक्तनायक कोल्हापूर)मो:-९२२५८०६९९०